जिवंत कलेचे स्पंदन

जागतिक रंगभूमी दिन हा २७ मार्च रोजी सर्व जगभरात साजरा केला जातो. आपल्याकडे मराठी रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी साजरा होतो. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जागतिक रंगभूमी नेमकी कुठे कुठे पसरलेली आहे? आज रंगभूमीच्या विश्वपटलावर कोणत्या देशातील रंगभूमी ही 'जागतिक' रंगभूमीचा एक भाग म्हणून मानली जाते? नेमकी कोणकोणत्या प्रकारचे आशय-विषय मांडले जातात? हे पाहण्याचा हा प्रयत्न.
जिवंत कलेचे स्पंदन
जिवंत कलेचे स्पंदन
Published on

विशेष

राजीव जोशी

जागतिक रंगभूमी दिन हा २७ मार्च रोजी सर्व जगभरात साजरा केला जातो. आपल्याकडे मराठी रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी साजरा होतो. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जागतिक रंगभूमी नेमकी कुठे कुठे पसरलेली आहे? आज रंगभूमीच्या विश्वपटलावर कोणत्या देशातील रंगभूमी ही 'जागतिक' रंगभूमीचा एक भाग म्हणून मानली जाते? नेमकी कोणकोणत्या प्रकारचे आशय-विषय मांडले जातात? हे पाहण्याचा हा प्रयत्न.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाचे प्रतिबिंब आणि अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम राहिले आहे. जागतिक रंगभूमीचा विचार करताना प्रामुख्याने अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांसारख्या पाश्चात्य देशांची नावे अग्रक्रमाने समोर येतात, जिथे नाट्यसंस्कृती केवळ टिकूनच नाही, तर अत्यंत आधुनिक रूपात बहरत आहे. मात्र, आशिया खंडाचा समृद्ध वारसा पाहता भारत, जपान आणि इंडोनेशिया या देशांमधील रंगभूमीचा उल्लेख केल्याशिवाय जागतिक नाटकाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक देशाची आपली एक स्वतंत्र ओळख, शैली आणि सादरीकरणाची पद्धत आहे, जी तिथल्या मातीतील संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे.

आशिया खंडातील नाट्यपरंपरेकडे वळल्यास जपानचे नाव आदराने घेतले जाते. जपानमध्ये 'काबुकी' हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि रंगतदार नाट्यप्रकार आजही तितक्याच उत्साहाने सादर केला जातो. त्याचप्रमाणे 'एनओएच' (नोहा) हा अत्यंत शिस्तबद्ध आणि गंभीर असा पारंपरिक प्रकार तिथल्या रंगभूमीचे वेगळेपण अधोरेखित करतो. जपानी साहित्यातील 'राशोमान' या नाटकाने तर जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली असून, त्यावर आधारित चित्रपटही जगभरात गाजला आहे. शेजारील चीनमध्ये 'बीजिंग पेकिंग ऑपेरा'ला सुमारे दोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा आहे, जो आपल्या गायन, नृत्य आणि वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहे.

इंडोनेशियामध्ये 'शॅडो पपेटिंग' अर्थात सावल्यांच्या बाहुल्यांचा खेळ आणि 'बारोंग' सारखे विधीनाट्य प्रकार आजही प्रेक्षकांना आकर्षित करतात, तर बर्मामध्ये विधीनाट्याची परंपरा जपली गेली आहे. युरोपीय रंगभूमीचा विचार करताना इटलीचे योगदान विसरता येणार नाही. सोळाव्या शतकात तिथे 'कॉमेदीआ देलार्त' म्हणजेच सुखात्मिकेचा उगम झाला, ज्याने संपूर्ण युरोपला हसवले. इटलीतील 'ऑपेरा' आजही जागतिक संगीताचा मानबिंदू मानला जातो. फ्रान्सला कलेचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला असून, तिथे ऑपेरा आणि नाटकांसोबतच 'बॅले' थिएटरला विशेष महत्त्व आहे. पॅरिसमधील बॅले आणि ऑपेरा थिएटरला शासनाचे भक्कम पाठबळ लाभलेले असून, त्याद्वारे तिथे एक मोठी रंगमंचीय चळवळ अव्याहतपणे चालवली जाते.

जर्मनीमध्ये तर नाट्यकलेला सर्वाधिक सबसिडी देणारा देश म्हणून जगात ओळखले जाते. तिथल्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरात परफॉर्मन्सेस चालू असतात आणि सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे तिथे नवनवीन प्रयोग करणे कलाकारांना सहज शक्य होते. पोलंडमधील 'ग्रैंड थिएटर' ही तिथल्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देते. तुर्कस्थानमध्ये राजकीय परिस्थिती जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आव्हानात्मक असली, तरी तिथली रंगभूमी आजही एक सशक्त माध्यम म्हणून आपली भूमिका बजावत आहे.

अटलांटिक महासागराच्या पलीकडे अमेरिकेतील 'ब्रॉडवे' आणि 'ऑफ ब्रॉडवे' या दोन प्रकारच्या रंगभूमींनी जागतिक व्यावसायिक नाटकाचे समीकरणच बदलून टाकले आहे. 'हॅरी पॉटर', 'विक्ड', 'लायन किंग' यांसारखी महाकाय नाटके तिथे वर्षानुवर्षे हाऊसफुल्ल चालतात, ज्यांना जगभरातून आलेला उत्तम प्रेक्षकवर्ग लाभतो. ब्रिटनमध्ये शेक्सपिअरचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे. लंडनच्या रंगभूमीवर 'माऊसट्रॅप', 'ड्रॅक्युला' आणि 'विटनेस फॉर द प्रोसिक्युशन'सारखी नाटके आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजही प्रेक्षकांचे रंजन करत आहेत. स्कॉटलंडमधील 'नॅशनल थिएटर ऑफ स्कॉटलंड' हे त्यांच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी जगप्रसिद्ध आहे.

या जागतिक रंगभूमीला एकत्र आणण्याचे काम विविध आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव करतात. रशियाचा 'थिएटर ऑफ नेशन्स', फ्रान्समधील 'अविग्न', स्कॉटलंडमधील 'एडिनबर्ग फेस्टिव्हल', ग्रीसमधील 'अथेन्स फेस्टिव्हल' आणि सर्बियातील 'बेलग्रेड इंटरनॅशनल फेस्टिव्हल' हे रंगकर्मीसाठी तीर्थक्षेत्राप्रमाणे आहेत. इटली आणि अमेरिकेतील 'स्पोलेतो' महोत्सवातून जागतिक स्तरावरील उत्तमोत्तम कलाकृतींचे आदानप्रदान होते. आजच्या काळात जागतिक रंगभूमीवर हाताळले जाणारे विषयही खूप बदलले आहेत. चित्रपट, इंटरनेट आणि ओटीटीच्या युगातही जिवंत कलेचे आकर्षण कमी झालेले नाही. सध्या जागतिक स्तरावर जेंडर आयडेंटिटी, विषमता, स्वातंत्र्य आणि महानगरीय जीवनातील एकाकीपण (अर्बन लोनलीनेस) या विषयांवर अधिक भाष्य केले जाते. मानसिक आरोग्य आणि आयसोलेशन यांसारख्या समस्यांना नाटकांतून वाट करून दिली जात आहे. आधुनिक नाटकांमध्ये 'हायब्रीड फॉर्म'चा वापर वाढला असून, डान्स, म्युझिक, पोएट्री आणि व्हिज्युअल आर्ट यांचे एक सुरेख फ्युजन पाहायला मिळते. मर्डर मिस्ट्री, डिटेक्टिव्ह स्टोरीज आणि वेगवान (फास्ट पेस) नाटकांना प्रेक्षक पसंती देत आहेत.

रंगभूमीच्या या जागतिक प्रवाहामध्ये 'ब्लॅक बॉक्स' चळवळीने एक नवे दालन उघडले आहे. छोट्या जागेत, कमी खर्चात पण अत्यंत प्रभावीपणे नाटकाचे प्रयोग करणे या संकल्पनेला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात प्रदीप वैद्य यांचे 'ब्लॅक बॉक्स' आणि कणकवलीतील 'ब्लू बॉक्स' हे याचेच उत्तम उदाहरण आहे. प्रयोगशील रंगकर्मीसाठी हे व्यासपीठ वरदान ठरत आहे. भारतामध्येही 'भारंगम', 'पृथ्वी थिएटर फेस्टिव्हल', 'प्रतिबिंब' आणि 'मेटा' यांसारख्या महोत्सवांतून भारतीय नाटकांची उंची वाढत आहे. २०१८ मध्ये प्रा. वामन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या 'वर्ल्ड थिएटर ऑलिम्पिक्स' ने भारताला जागतिक नाट्य नकाशावर एक मानाचे स्थान मिळवून दिले.

मराठी नाटकांच्या जागतिक सफरीचा इतिहासही तितकाच रंजक आहे. विजया मेहता दिग्दर्शित 'अजब न्याय वर्तुळाचा' आणि 'मुद्राराक्षस' या नाटकांचे जर्मनीतील प्रयोग असोत किंवा 'घाशीराम कोतवाल'चे युरोप-अमेरिकेतील दौरे असोत, मराठी नाटकाने नेहमीच सातासमुद्रापार आपली कीर्ती पसरवली आहे. सतीश आळेकर यांच्या 'बेगम बर्वे' सारख्या नाटकांचे प्रयोग जॉर्जिया विद्यापीठात होणे किंवा मोहित टाकळकर यांच्या नाटकांचे शारजाह महोत्सवात सादरीकरण होणे, ही मराठी रंगभूमीसाठी अभिमानास्पद बाब आहे. व्यावसायिक स्तरावर मोहन वाघ, सुधीर भट आणि प्रशांत दामले यांसारख्या दिग्गजांनी कुवेत, दुबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनपर्यंत मराठी नाटकाचा झेंडा फडकवला आहे. आज नीता अंबानी कल्चरल सेंटर किंवा एनसीपीएसारख्या वास्तूंतून विदेशी नाटके भारतात येत आहेत, ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या कलाकृती घरबसल्या पाहायला मिळत आहेत.

एकूणच, जागतिक रंगभूमी ही एक प्रवाही आणि चैतन्यमय संकल्पना आहे. जिथे 'माऊसट्रॅप' सारखे नाटक सात दशके अखंडपणे चालू शकते, तिथे आपली मराठी रंगभूमीही प्रयोगशीलतेच्या बाबतीत कोणापेक्षाही कमी नाही. आपली हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी सर्वाधिक प्रयोग करणारी रंगभूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, हे यश केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न ठेवता, आपली नाटके अधिक प्रमाणात परदेशात पोहोचणे आवश्यक आहे. जेव्हा मराठी नाटकांचे प्रयोग जगभरातील प्रमुख शहरांत नियमितपणे होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली रंगभूमी 'जागतिक आघाडीची रंगभूमी' म्हणून अधिक ठळकपणे नावाजली जाईल. आजची ही रंगमंचीय चळवळ उद्याच्या जागतिक कलेचा कणा ठरेल यात शंका नाही.

लेखक/नाट्यसमीक्षक

logo
marathi.freepressjournal.in