कृत्रिम सौंदर्याचा ऑक्टोपस
समाजमनाच्या ललित नोंदी
लक्ष्मीकांत देशमुख
सुंदर दिसण्याची, तरुण राहण्याची न संपणारी हाव म्हणजेच ययाती सिंड्रोम. आज या ययाती सिंड्रोमने सगळ्यांना ग्रासले आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रिया या सिंड्रोमला अधिक बळी पडत आहेत. बाजारकेंद्रित व्यवस्था याला अधिक उत्तेजन देत आहे.
दोन दशकांपूर्वी ‘कांटा लगा’ या रिमिक्स फिल्मी गाण्यावर मादक नृत्य करून भारतीय तरुणांची राष्ट्रीय ‘क्रश’ बनलेल्या शेफाली जरीवाला या चित्रतारकेचं अलिकडेच अचानक वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झालं. शेफाली आपलं वाढतं वय दिसू नये, चेहरा सुरकुत्याविरहित राहावा, रुपेरी पडद्यावर आपली त्वचा ‘टाईट व फ्रेश’ दिसावी म्हणून तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला न घेता जाहिराती बघून अँटीएजिंगची औषधं गेली काही वर्षं सातत्याने घेत होती, असं सांगितलं जातं. त्यातील घातक रसायनांनी तिचा रक्तदाब एकदम कमी होऊन तिला तीव्र स्वरुपाचा हार्ट अटॅक आला असण्याची शक्यता काही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यावर गेले काही दिवस प्रसार माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे.
शेफालीसारखी अनेक उदाहरणं आजूबाजूला आहेत. आपलं वाढतं वय ग्रेसफुली स्वीकारणं अनेक स्त्रीपुरुषांना कठीण जातं. मग तरुण राहण्यासाठी अवाजवी सौंदर्यप्रसाधनांबरोबरच ही अशी चिरतरुण राहाण्यासाठीची औषधंही घेतली जातात. माझ्या मते ही मंडळी ‘ययाती सिंड्रोम’ किंवा ‘ययाती गंडा’चे बळी आहेत. त्यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. कारण आज या सामाजिक समस्येची व्याप्ती जगभर बरीच वाढली आहे.
‘ययाती सिंड्रोम’ ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती समजण्यासाठी ययातीची कथा माहीत असायला हवी. ती दोन ज्ञानपीठकार लेखक वि. स. खांडेकर आणि गिरीश कार्नाड या दोघांनीही महाभारतातल्या ‘ययाती’ या व्यक्तिरेखेवर लिहिले आहे. खांडेकरांनी कादंबरी लिहिली तर कर्नाडांनी नाटक. त्यामुळे ही व्यक्तिरेखा सर्वसामान्यांपर्यंत पोहचली. ययाती हा शृंगाराचा आकंठ उपभोग घेणारा विलासी राजा होता. पण काळाच्या ओघात एका शापाने तो जख्ख म्हातारा बनतो. पण शरीराला वृद्धत्व आलं तरीही त्याच्या मनाची देहसुखाची लालसा कमी झाली नव्हती. तेव्हा ययाती राजा उ:शाप मिळवून आपला आज्ञाधारक पुत्र पुरुकडून त्याचं तारुण्य मागून घेतो व पुन्हा तरुण बनतो. यानंतर पुन्हा तो दीर्घकाळ देहसुख उपभोगतो.
मानवी जीवनाच्या बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व अशा तीन नैसर्गिक अवस्था असतात. पण त्यातली तारुण्यावस्था संपू नये व आपण प्रौढ किंवा वृद्ध झालो तरी तसे दिसू नये, शक्य ते उपाय व उपचार करून होईल तेवढं तरुण आणि सुंदर दिसावं...ही मानसिकता म्हणजे ‘ययाती सिंड्रोम’.
आज भारतात तसेच संपूर्ण जगात हा ‘ययाती सिंड्रोम’ विशेषत: स्त्रीवर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण आजही जग पूर्वी इतकंच पुरुषप्रधान आहे व पुरुषांच्या लेखी, वाचताना थोडसं ग्राम्य वाटेल, पण त्या बहुचर्चित ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ गाण्याप्रमाणे स्त्री म्हणजे फक्त एक चीज आहे, सुंदर देह आहे. हा स्त्रीदेह तरुण व पश्चिमी सौंदर्याच्या मापदंडात बसणारा आणि प्रथम दर्शनी पुरुष नजर सुखावणारा असावा, हा पूर्वीपासूनचा अलिखित संकेत आहे. आजच्या बाजारप्रधान अर्थव्यवस्थेच्या उपभोगवादी काळात तो अधिकच दृढ झाला आहे. त्याला आजचा सुशिक्षित स्त्रीवर्गही बळी पडताना दिसत आहे. आपण म्हणजे केवळ देह नाही, तर मन, बुद्धी व कर्तृत्व आहोत, याचा आजच्या स्त्रीला विसर पडत चालला आहे की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे. जणू स्त्री जीवनाचं सार्थक पुरुषांच्या नजरेत आपण सुंदर व तरुण दिसण्यात आहे, अशी मानसिकता आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा आपल्या स्त्रीत्वाचा अवमान आहे आणि तो आपणच करून घेत आहोत, याचा विवेक स्त्री वर्गाच्या एका मोठ्या घटकास न राहणं हे अतिशय खेदजनक आहे.
आजच्या जनरेशन झेनच्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्रीची देहयष्टी ‘बिकिनी फिट’ आणि ‘झिरो फिगर’ असणं म्हणजे सुंदर असणं आहे. त्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचे कारखानदार, फॅशन उद्योग, सिनेजगत, लोकल ते ग्लोबल व्याप्तीच्या सौंदर्य स्पर्धा आणि मुख्य म्हणजे उच्चभ्रू, चकाचक असणारं कॉर्पोरेट विश्व...या साऱ्यांनी आज स्त्रीचं वस्तुकरण, कमॉडीफिकेशन करून टाकलं आहे. या पुरुषी उपभोगवादी मानसिकतेने एक प्रकारे लादलेल्या या नव-परंपरेच्या रूढीला स्त्री वर्ग, खास करून शहरी अपवर्डली मोबाईल वर्ग आधुनिकतेच्या नावाने विचार न करता स्वीकारत आहे. विमान सेवेतली हवाई सुंदरी, प्रसार माध्यमातील अँकर/ प्रेसेंटर, रिसेप्शनिस्ट म्हणून कोण दिसतं? ठराविक कालावधीने त्या का बदलल्या जातात, त्यांच्या जागी नवे चेहरे का येतात? यामागचं कारण स्पष्ट आहे. कोणत्याही मेट्रो शहरातील नामांकित कॉलेजेस पहा की मॉल्स पहा, तिथे होणारं फॅशनेबल वस्त्रातील तारुण्यसंपन्न स्त्रीदर्शन ययाती सिंड्रोमने आजची स्त्री किती मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे, याची प्रचिती देतं.
आणि मग (पुरुषी द्दष्टिकोनाने) सामान्य रंगरूपाच्या मानल्या जाणाऱ्या, पण कर्तृत्वसंपन्न, बौद्धिक तेज आणि ज्ञानदर्शक संभाषणचातुर्य असणाऱ्या स्त्रियाही या सगळ्या दबावाला बळी पडून सुंदर व तरुण दिसण्यासाठी आपली त्वचा अधिकाधिक सुंदर व्हावी म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. काही जणी विपरीत साईड इफेक्ट असणारी अँटी एजिंग औषधं घेऊ लागतात. हा ययाती सिंड्रोम किंवा ययाती गंड नाही का? हा सिंड्रोम नैसर्गिक नसून बाजारप्रधान औद्योगिक जगताने तो नफ्यासाठी घडविलेला आहे. स्वतंत्र, विचारी, विवेकी आणि सर्व स्तरावर पुरुषांइतकीच समता मागणारी आणि स्वकर्तृत्वावर ती मिळवणारी स्त्री घडवण्यासाठी ज्या स्त्रीवादी चळवळीने गेली अनेक वर्ष संघर्ष केला, ती चळवळही आज क्षीण झालेली आहे. हे सारे पाहून विचारी स्त्री आणि हो, पुरुष वर्ग पण व्यथित आहे.
मला वाटतं, आज स्त्री म्हणजे केवळ वस्तू, स्त्री म्हणजे फक्त रूप आणि तारुण्य या बाजारकेंद्री व्यवस्थेने तयार केलेल्या स्त्री सौंदर्याच्या व्याखेला तिखट व भेदक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सुंदर स्त्री म्हणजे विशिष्ट रंगरूपाची, ठराविक मापाची आणि पुरुष नजरेला सुखावह वाटणाऱ्या अशा तोकड्या, फॅशनेबल वस्त्रांमधील स्त्री, या पश्चिम देशांच्या भांडवली, बाजारी अर्थव्यवस्थेने प्रसृत व दृढमूल केलेल्या सौन्दर्यवादाला सुरुंग लावण्याची आणि पुन्हा एकदा स्त्रीला या सौन्दर्य व तारुण्याच्या ययाती सिंड्रोममधून मुक्त करण्याची वेळ नक्कीच आली आहे
या विश्वाच्या निर्मिकानं निर्माण केलेला प्रत्येक माणूस हा खास व वेगळा आहे. जसं सप्तरंगांनी सुंदर इंद्रधनुष्य बनतं, विविध रंग व आकारांच्या फुलांनी आकर्षक गुलदस्ता बनतो तसाच विविध रंग, उंची आणि ठेवण असणारा स्त्री व पुरुष देह आहे. त्यात भेद करीत हा किंवा ही सुंदर आणि तो किंवा ती कुरूप मानणं, हा त्या निर्मिकाचाच अपमान आहे.
सिमोन द बुआनं ‘सेकंड सेक्स’या पुस्तकात ‘वन इज नॉट बॉर्न, बट रादर बिकम्स ए वूमन’ असं म्हटलं आहे. त्याप्रमाणेच विशिष्ट प्रकारची सुंदरता ही जाणीवपूर्वक भांडवलशाही बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने घडविलेली आहे. तिचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे त्या निकषांमध्ये न बसणाऱ्या स्त्रियांना न्यूनगंड देऊन, त्याआधारे आपली उत्पादनं विकणं आणि नफा कमवणं.
म्हणून आता गरज आहे ती स्वार्थी हेतूने रुजवलेली सौन्दर्यांची आणि तारुण्याची परिभाषा बदलण्याची. त्यासाठी भारताचे सर्वश्रेष्ठ लेखक प्रेमचंद यांनी साहित्यातील रंजनवादी सौन्दर्यबोध नाकारत “हमे खुबसूरती का मेयार( मापदंड) बदलना होगा” असं सांगत साहित्यातले नवे सौंदर्य काय हे सांगितलं. प्रेमचंदांचे सौंदर्याचे मापदंड त्यांच्यात शब्दात सांगायचे झाले तर असे आहेत, “ज्या लेखक/ कवीला कष्टकरी स्त्रीच्या रापलेल्या तळहातावरच्या रेषांतील नक्षीमध्ये सुंदरता दिसत नसेल व तिच्या घामाचा सुगंध जाणवत नसेल तर त्यानं स्वतःला लेखक/कवी म्हणवून घेऊ नये. तो निव्वळ अभिजन वर्गासाठी लिहिणारा बौद्धिक भांडवलदार आहे, असं मी मानतो!” प्रगतीशील लेखक चळवळीच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी या आशयाचं भाषण केलं होतं. त्यांच्या या अध्यक्षीय भाषणानं भारतीय साहित्याला नवं वळण दिलं. त्याचंच अनुकरण करीत स्त्रीवादी चळवळीने स्त्रीसौंदर्य हे तिच्या उत्तम कामात असतं, तिच्या उंच भरारीत असतं आणि तिच्या प्रेम, जिव्हाळा, करुणा आणि काळजी घेणं या गुणात
असतं, अशी स्त्रीसौंदर्याची नवी व्याख्या स्त्रीमनात आणि पुरुष विचारांमध्ये पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक रुजवली पाहिजे.
तारुण्य हा जीवनाचा एक नैसर्गिक टप्पा आहे, तो संपून वृद्धवस्था प्रत्येकाला येतच असतं. पण वृद्धत्वपण सुंदर देखणं असतं, ते उत्तम आरोग्य, शांत व समंजस मन आणि अखंड कार्यमग्नतेनं सुंदर होतं. म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाने एजिंग म्हणजे वाढतं वय ग्रेसफुली स्वीकारलं पाहिजे.
ययातीचं मागून घेतलेलं तारुण्य जसं संपलं, तसंच चिरतारुण्याच्या शक्य नसलेल्या ‘ययाती सिंड्रोम’ मधून स्त्री आणि पुरुष दोघांनीही मुक्ती मिळवण्याचा व हा ययाती सिंड्रोम नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कोणत्याही न्यूनगंडाविना प्राप्त जीवन आनंदात जगलं पाहिजे.
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष.