ममदानी यांचा विजय - 'जनकेंद्री मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानी'

धर्म, वंश, पंथ यापुढे जात आपले जगणे सुलभकरण्याची भाषा करणारा नेता न्यूयॉर्कच्या लोकांना आश्वासक वाटला, हाच जोहरान ममदानी यांच्या विजयाचा लसावि आहे. धर्मवादी, वंशवादी राजकारणापेक्षा जनकेंद्री मुद्दे लोकांना अधिक भावले.
ममदानी यांचा विजय - 'जनकेंद्री मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानी'
Published on

नोंद

कौस्तुभ पटाईत

धर्म, वंश, पंथ यापुढे जात आपले जगणे सुलभकरण्याची भाषा करणारा नेता न्यूयॉर्कच्या लोकांना आश्वासक वाटला, हाच जोहरान ममदानी यांच्या विजयाचा लसावि आहे. धर्मवादी, वंशवादी राजकारणापेक्षा जनकेंद्री मुद्दे लोकांना अधिक भावले. मूठभरांच्या हातात केंद्रित झालेल्या भांडवलशाहीला समाजवादी विचारांनी फटकारले, हेच या विजयाने अधोरेखित केले आहे.

महासत्ता, नव उदारमतवादी धोरणांची पंढरी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची एकाधिकारशाही असलेल्या अमेरिकेत न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी जोहरान ममदानी हा तरुण निवडून आला आहे. ५ नोव्हेंबरच्या या घटनेने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगाचे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या या शहरातल्या निवडणुकीचे मुद्दे होते - परवडणारी घरे, आरोग्य सुविधा, मोफत आणि जलद वाहतूक व्यवस्था आणि परवडणाऱ्या जीवनोपयोगी वस्तू ! 'परवडणारे जीवनमान' हे ममदानी यांच्या निवडणूक प्रचाराचे घोषवाक्य. त्यांच्या या घोषणेला न्यूयॉर्कर्सनी भरभरून प्रतिसाद दिला. कुठल्याही कॉर्पोरेटचा पाठिंबा नसताना, आपल्याच पक्षातले मोठे नेते आपल्या बाजूला नसताना आणि देशाचा राष्ट्राध्यक्ष विरोधात असतानाही जोहरान ममदानी महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. या विजयामुळे दैनंदिन जगण्याचे प्रश्न किती गंभीर झाले आहेत आणि ते सोडवणे किती तातडीचे झाले आहे, हेच अधोरेखित होते.

न्यूयॉर्क हे जगातल्या श्रीमंत शहरांपैकी एक शहर आहे. मोठमोठ्या वित्तीय संस्था असलेले न्यूयॉर्क हे जगात सर्वात जास्त अब्जाधीश असणारे शहर आहे. मात्र या शहरात राहणे सर्वसामान्यांना परवडत नाही. गेल्याच महिन्यात वाढत्या घरभाड्याच्या विरोधात न्यूयॉर्कवासी रस्त्यावर उतरले होते. गेल्या काही वर्षांत न्यूयॉर्कमधील घरभाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. नवीन घर बांधण्याचा विचार मध्यमवर्गीय, श्रमिक वर्ग करू शकत नाही. तीच गत आरोग्य सेवांवरील वाढता खर्च, प्रवासाचा खर्च याची आहे. थोडक्यात न्यूयॉर्क शहर श्रमिक वर्गाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एकीकडे प्रचंड संपन्नता आणि दुसरीकडे सामान्य जनतेला आपल्या आवश्यक गरजा सुद्धा पूर्ण करणे शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे. विकासाच्या भांडवली मॉडेलमुळे संपत्ती तर निर्माण झाली, पण ती सर्वसामान्य माणसाच्या हातात आली नाही. इथल्या नागरिकांची क्रयशक्ती म्हणजे वस्तू, सेवा विकत घेण्याची क्षमता खालावलेली आहे. विकासाचा हा पॅटर्न फक्त न्यूयॉर्क, अमेरिकेतच फसला आहे असे नाही, तर संपूर्ण जगातच भांडवली विकासाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

वीज, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक या गोष्टीही नफा कमावण्याचे साधन बनल्यामुळे या अत्यावश्यक गरजा पूर्ण करणेही लोकांना शक्य होत नाही. पण नव उदारमतवादी धोरणांना चिकटून असणारे सरकार यावर कुठलाही उपाय शोधत नाही. सगळे काही बाजाराच्या भरवशावर सोडून देण्यात आले आहे. परिणामी लोकांची खालावलेली क्रयशक्ती आणि अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किमती यामुळे सामाजिक असमतोल निर्माण होत आहे. यामुळे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाला तर नवल वाटायला नको. हीच गोष्ट अमेरिकेत घडत आहे. लोकांच्या प्रश्नांची दखल न घेता त्यांच्या असंतोषाला योग्य बाजूने वळवले नाही तर लोक आकर्षक घोषणांना आणि भूलथापांना भुलू शकतात. अमेरिकेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनाला अमेरिकन जनता अशीच बळी पडली. दुसऱ्या बाजूला लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, मतदान करण्यासाठीही लोक उत्सुक नसतात. न्यूयॉर्कच्या मागच्या दोन निवडणुकांमध्ये हेच दिसून आले आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत २०१७ ला केवळ २५ टक्के तसेच २०२१ ला २३ टक्के मतदान झाले. नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कमी झाल्याचेच हे द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर जोहरान ममदानी यांच्या विजयाकडे पाहायला हवे.

ममदानी यांनी लोकांना त्यांच्या मूळ प्रश्नांकडे खेचून आणले. निवारा, आरोग्य, वाहतूक, सुरक्षा, किराणा सामान या लोकांच्या अत्यावश्यक गोष्टींना निवडणुकीचा मुद्दा बनवले. आपण निवडून आलो तर घरभाड्याचे दर स्थिर करू, बस मोफत आणि जलद करू, बालसंगोपन मोफत करू, पुढच्या पाच वर्षांत दोन लाख नवीन घरे बांधू, अन्नधान्य, किराणा सामान वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी सार्वजनिक मालकीचे किराणा दुकान सुरू करू, श्रीमंतांवरल्या करांवर दोन टक्के वाढ करू, अशा घोषणा ममदानी यांनी आपल्या निवडणूक प्रचारात केल्या. आपल्या सोशल मीडिया फ्रेंडली प्रचार मोहिमेद्वारे ते तरुणांशी थेट जोडले गेले. 'श्रमिकांना परवडण्याजोगे न्यूयॉर्क बनवू' हा विश्वास त्यांनी लोकांना दिला. त्यामुळे ममदानी यांना लोकांचा विशेषतः तरुण मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण ते जे बोलत होते ती लोकांची इच्छा होती. लोकांना या गोष्टी खरोखर हव्या होत्या. धर्म, वंश, पंथ यापुढे जात आपले जगणे सुलभ करण्याची भाषा करणारा नेता लोकांना आश्वासक वाटला. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्तीस स्लिवा आणि अपक्ष उमेदवार अँडू क्युमो यांना नाकारत लोकांनी जोहरान ममदानींना निवडून दिले. लोकांचा उत्साह मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत दिसून येतो. यावर्षी महापौरपदाच्या निवडणुकीत ४० टक्के मतदान झाले. गेल्या ५० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. ममदानी यांनी इस्रायलविरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यहुदी धर्मीयांना ममदानी यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी कुठल्याही भावनिक मुद्द्यापेक्षा रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांना महत्त्व दिले. ममदानी यांच्या विजयी सोहळ्यात सहभागी झालेला यहुदी धर्मीय मतदार बेन हा ट्रम्प यांच्या आवाहनाला अतर्क्स म्हणतो. न्यूयॉर्क शहर सर्वांसाठी असावे, हे शहर परवडण्याजोगे करावे, इथे एक सन्मानजनक आयुष्य जगता यावे, हीच त्याची नवनिर्वाचित महापौराकडून अपेक्षा आहे. ममदानी यांनी ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली त्या डेमोक्रॅटिक पक्षाची लोकप्रियता घटल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. अशा काळात ममदानी यांचा उदय डेमोक्रॅटिक पक्षाला नवसंजीवनी देणारा ठरेल का, हेही पहावे लागेल. जनकेंद्री घोषणा करून जोहरान ममदानी निवडून आले असले तरी त्या पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षालाच त्यांची धोरणे मान्य नाहीत, असे दिसते. न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी श्रीमंतांवर कर वाढवण्याच्या धोरणाला आपला विरोध असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान ममदानी यांच्यासमोर आहे. आपण लोकशाही समाजवादी असल्याचे ममदानी यांनी ठासून सांगितले आहे. ही बाब त्यांच्या घोषणांमधूनही प्रतिबिंबित झाली आहे. समाजवाद, मार्क्सवाद, साम्यवाद या नावांचा तिटकारा असलेल्या अमेरिकेत 'समाजवादी' म्हणवून घेणे आणि लोकांचा पाठिंबा मिळवणे हे आजही आश्चर्यजनक मानले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी हे कम्युनिस्ट आहेत, असे सांगत लोकांना त्यांची भीती घालण्याचा प्रयत्न केला. ते निवडून आले तर न्यूयॉर्कला निधी देणार नाही, अशी धमकीही दिली. आता ममदानी निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांना कितपत सहकार्य करतील ही शंका आहे. या सगळ्या अडचणींचा सामना करत जोहरान ममदानींना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे त्यांची वाट सोपी बिलकुल नाही. तशातही ते टिकून राहिले, यशस्वी झाले तर ते डेमोक्रॅटिक पक्षाला लोककल्याणकारी, समाजवादी वळण लावण्यात यशस्वी होतील आणि अमेरिकेत जनकेंद्री राजकारणाचे पुनरुज्जीवन करतील, अशी आशा आहे. शेवटी जोहरान ममदानी यांच्या विजयाचा धडा हाच आहे की, लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवणे ही अत्यंत तातडीची गरज आहे. फक्त हे प्रश्न सुटू शकतात हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणे आणि या मुद्द्यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे.

राजकीय अभ्यासक व भाष्यकार

logo
marathi.freepressjournal.in