झऱ्याची काठची निवांत सुट्टी

उन्हाळ्यात उकाड्यापासून दूर हिरवाई, झरे आणि शांतता शोधायची असेल तर कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे हे निसर्गरम्य गाव उत्तम पर्याय ठरते. माड-पोफळीच्या बागा, खळखळणारे झरे आणि निवांत फार्मस्टे अनुभवामुळे इथली सुट्टी मनाला वेगळाच गारवा देते.
झऱ्याची काठची निवांत सुट्टी
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

उन्हाळ्यात उकाड्यापासून दूर हिरवाई, झरे आणि शांतता शोधायची असेल तर कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे हे निसर्गरम्य गाव उत्तम पर्याय ठरते. माड-पोफळीच्या बागा, खळखळणारे झरे आणि निवांत फार्मस्टे अनुभवामुळे इथली सुट्टी मनाला वेगळाच गारवा देते.

उन्हाळ्यात आपण अशी ठिकाणे शोधत असतो जिथे हिरवाई असेल, नद्यांचे, झऱ्यांचे सान्निध्य असेल, शीतलला असेल. असे गाव आपल्या कोकणात आहे. कोकणात उन्हाळ्यात उकाडा फार असतो; पण या गावात आल्यावर नजर जाईल तिथपर्यंत माड-पोफळीच्या हिरव्यागार बागा दिसतात. केवळ या बागांचीच नव्हे तर जंगलमय डोंगरांची साथही या गावाला लाभलीये आणि इथल्या जमिनीला पाण्याचा स्पर्श सदोदित झऱ्यांच्या रूपात होत राहतो. हे गाव आहे निसर्गसंपन्न दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे.

या गावात मी बागायतीत बांधलेल्या मातीच्या घरात राहिले होते. चारी बाजूंनी उंच उंच वाढलेली माड-पोफळीची झाडे आणि त्यांच्या छायेखाली विसावलेले कौलारू टुमदार घर. हा बागायतदार फार्मस्टे आहे. पूर्णपणे मातीचे बांधलेले हे घर आहे. त्यामुळे बाहेर कितीही कडकडीत उन्ह असले तरी आतमध्ये मात्र जीवाला शांत करणारा थंडावा असतो. इथे आले की मामाच्या गावी आलोय याची आठवण येत राहते. घरासमोर शेणाने सारवलेले अंगण म्हणजेच खळे आहे. सुबकसे तुळशी वृंदावन आहे. या खळ्यात बसले की समोर फक्त नारळ-सुपारीच्या बागांची हिरवाई दिसते आणि या हिरवाईतून झऱ्याचा आवाजही येतो. एक नितळ पाण्याचा झरा झुळझुळत या बागायतीतून वाहतो.

इथली सकाळ एकदा अनुभवली की, लवकर उठायचा कंटाळा करणारा माणूसही सूर्याच्या स्वागताला उठेल. घराचे दार उघडले की सूर्याची किरणे नारळाच्या झावळ्यांमधून वाट काढत जमिनीवर उतरततात. कितीही मोठी झाले तरी सूर्यकिरणांच्या कोवळ्या कांबी झेलण्याचा खेळ खेळणं मी विसरत नाही. झाडालाही कुठे खोडावर, पानावर किरणे स्पर्श करत राहतात. या कोवळ्या प्रकाशाचा परीसस्पर्श सृष्टीला लाभलाय आणि पाने, झाडे, जमीन सोनेरी झालीय असे वाटत राहते. रस, खापरोळी या गोड पदार्थाचा आस्वाद घेत मी निसर्गसोहळा बघत बसले.

मन मात्र आता कुळागराकडे आणि झऱ्याकडे धावत होते. मनाचे ऐकले आणि कुळागरात गेले. इथे फक्त माड-सुपारीची झाडे नसतात तर मिरी, वेलची, जायफळ अशी मसाल्याची झाडेही असतात. मिरीच्या वेली तर सुपारीच्या झाडांना वेटोळे घालत चढल्या होत्या. हिरव्या मिरीचे घोस पाहिले की, हिरवे मोती लगडलेत असे वाटते. इथे केळीची झाडे तर माड-सुपारीशी स्पर्धा करत उंच वाढत होती. कुठे कुठे हळदीचे, सुरणाचे कंद लावलेले दिसत होते. इथली खास गोष्ट अशी, की जंगलातील भलीथोरली झाडे जपतच ही माडबागायती केली होती. हे कुळागर एक फूड फॉरेस्ट आहे. आपल्या डोळ्यांना जसे ते तृप्त करते तसेच आपल्या गरजाही भागवते.

या कुळागराच्या सावलीतून बागडत झऱ्याकडे गेले. पाहते तर उन्हाळ्यातही झरा अगदी खळखळ वाहत होता. स्वच्छ पाण्याचा. इतका नितळ की, खालचे दगडगोटे दिसत होते आणि इतका थंड, की पाय बुडवल्यावर अंगावर काटा आला. याचा उगम पाठच्या डोंगरावर एका झाडाच्या मुळातून होतो आणि मग हा झरा दोन्ही बाजूला असणाऱ्या माडबागायतीला पोसत पुढे वाहत राहतो. इथे या झऱ्यावर सुपारीच्या झाडाचा साकव म्हणजेच पूलही बांधला आहे. मेलेले सुपारीचे झाड इथे टाकून देत नाहीत. त्याचा साकव बांधतात. इथे झऱ्यात उतरून पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला. त्याच्या काठी दगडावर बसून ध्यानधारणा केली. साकवावर बसून झऱ्याची खळखळ ऐकत बसले. इथे शांत बसले की शेकरू, धनेश यांचे दर्शनही घडते आणि निसर्गदेवता आशीर्वाद देत आहे असे वाटते.

इथे जेवणाला पारंपरिक कोकणी पदार्थ केले जातात. याच कुळागरातील कच्ची केळी तोडून त्याचे आज काप करण्याचा बेत होता. केळीची साले काढून, केळीचे काप करून त्याला मालवणी मसाला, हळद, मीठ लावले आणि रव्यात घोळवून फ्राय केले. त्याच्या सोबत जेवणाला लाल गावठी भात, कुळीथचे सार, लाल माठाची भाजी होती आणि गावठी रायवळ कैरीचे लोणचे होते. गोडासाठी शाबू, चण्याची डाळ नारळाच्या दुधात शिजवून गुळ घालून मणगणे केले होते. असाच झकास बेत इथे असतो.

पोटभर जेवून दुपारची डुलकी काढली आणि पाच वाजता साधारण वीस मिनिटांवर असणाऱ्या हनुमंतगडाकडे गेले. वळणावळणाचा रस्ता पार करत गडाच्या जवळ पोहोचले. दहा मिनिटे गड चढल्यावर गडाचे अवशेष दिसू लागले. प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडला आणि सोनसळी गवताने भरून गेलेला सपाट भाग दिसला. वाऱ्याने गवत असे डोलत होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्यांना मनोभावे वंदन केले. इथून एका बाजूने घारपी, आंबोलीपर्यंत दृश्य दिसते. दुसऱ्या बाजूने दोडामार्ग ते गोव्याचा भाग दिसतो.

सूर्य उतरू लागला आणि गार वारा सुटला. इतके बरे वाटले तिथे!! मग तिथेच सूर्यास्त बघत बसले. इतके शांत वातावरण, केवळ गवत हलण्याचा आवाज ऐकू येत होता आणि समोर तो तेजोमय गोळा केशरी रंगाचा झाला होता. तिथले दृश्य डोळ्यात साठवले आणि वन्यप्राणी येण्याआधी गड उतरले. हो!! इथे गवे, बिबट्या अगदी मुक्तपणे फिरत असतात. तिथून उतरताना आम्हाला सांबर दिसलेच.

फार्मस्टेवर पोहोचून कोरा चहा घेतला. तिन्हीसांज झाली. तिथे जवळ असणाऱ्या दत्तमंदिरातून आरतीचा आणि घंटानादाचा आवाज कानी पडला. समाधान वाटले अगदी. दत्तमहाराजांना मनोमन नमस्कार केला. रात्री मग कुलथाची पिठी आणि भात असे जेवण झाले. झोपायच्या आधी चांदणे बघत बसले. खळ्यात येऊन मग पाय पसरून निवांत बसले. किरकिर किड्यांचा आवाज वातावरणात गुंजत होता. घुबडाचे घुत्कार ऐकू येत होते. उशिरा झोपणाऱ्या माझ्यासाठी ही रात्र हळू आवाजात अंगाई म्हणत होती. माझे डोळे जड झाले. खोलीत येऊन गुडूप झोपले अगदी. अशी गाढ झोप कित्येक वर्षांनी लागली होती आणि पुन्हा सकाळी सूर्यदेवाच्या स्वागताला खळ्यात जाऊन उभी राहिले.

उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की धमाल आठवते. पण या सुट्टीमध्ये असे काही शांततेचे, निवांतपणाचे क्षण असायचे आणि ते क्षण मनावर अगदी कोरले गेलेले असतात. ते क्षण इथे आल्यावर पुन्हा एकदा जगता आले. इथली खास आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फार्मस्टे ओंकार गावडे नावाचा २४ वर्षांचा युवक सांभाळतो. त्याला जंगलाची आणि सेंद्रिय शेतीची आवड आहे. तो बागायती सांभाळत हा फार्मस्टे सक्षमपणे आणि आनंदने चालवत आहे. स्वतःहून तो दोडामार्गमधील ठिकाणे फिरवून आणतो, माहिती देतो. जंगलात असूनही इथे सुरक्षित वाटते.

अशी शांत, शीतल नारळ-सुपारीच्या बागेतल्या, झऱ्या काठच्या सुट्टीसाठी झोळंबे गावाचा आणि बागायतदार फार्मस्टेचा नक्की प्लॅन करा.

  • इथे पोहोचण्यासाठी- आंबोलीमार्गे आणि तिलारीमार्गे गाडीने येता येते. अंधार पडण्याच्या आधी पोहोचलेले उत्तम राहील.

  • जवळचे बस स्थानक - बांदा बस स्थानक आणि दोडामार्ग बस स्थानक.

  • जवळचे रेल्वे स्टेशन - सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन

  • Airport - मोपा एअरपोर्ट, गोवा

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ - ऑक्टोबर ते मे. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येईल. पाऊस इथे भरपूर असतो. त्याप्रमाणे अंदाज घेऊन प्रवास करावा.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in