स्मरण
दीपाली दोंदे
लोकभावनेला आत्यंतिक महत्त्व देणारा, लोकांमध्ये राहणारा-वावरणारा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा असा कलावंत म्हणजे झुबिन गर्ग. त्याने आसामच्या लोकांसाठी सरकारी यंत्रणांशी लढा दिला. झुबिन आसामींचा तर प्राण होताच पण ईशान्य भारत, बंगालसहित जगात झुबिनचे चाहते आहेत. संपूर्ण ईशान्य भारत सध्या शोकमग्न आहे. उर्वरित भारताला मात्र ‘झुबिन कोण?’ हा प्रश्न पडला आहे.
सप्टेंबरला प्रसार माध्यमांकडे एक बातमी आली - आसामी जनतेचा लाडका गायक-संगीतकार झुबिन गर्ग याचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करत असताना अपघाती मृत्यू झाल्याची. वृत्तवाहिन्यांनी ‘आसामवासीयांसाठी ‘या अली’ फेम झुबिनचा केवळ ५२ व्या वर्षी अपघाती मृत्यू होणं किती धक्कादायक आहे’, अशा आशयाची एक पठडीतील बातमीही चालवली, हळहळ व्यक्त केली.
त्याच्यानंतर जे झालं, ते अविश्वसनीय होतं. आसाममध्ये झुबिनच्या मृत्यूची बातमी पसरली आणि सबंध आसाम आपल्या लाडक्या झुबिनसाठी रस्त्यावर उतरला. आसामचं जनजीवन ठप्प झालं. लोकांनी कार्यालयं, दुकानं बंद ठेवली. झुबिनचा मृतदेह विमानाने आणला गेला, तेव्हा १५ लाख लोकांनी अंत्ययात्रेला हजेरी लावली. त्यांना फक्त त्यांच्या लाडक्या ‘झुबिनदा’चं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं. कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांना हाक दिली नव्हती. ते उत्स्फूर्तपणे आलेले. त्यात आबालवृद्ध होते, हातावर पोट असणारे कष्टकरी होते, जमिनीच्या तुकड्यावर वर्षभर राबूनही दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेले शेतकरी होते, गुवाहाटीच्या कॉलेजांमध्ये शिकणारे अल्ट्रा-मॉडर्न जेन-झीचे तरुण-तरुणी होते...सगळे उर फुटेस्तोवर रडत होते. ‘जय झुबिनदा’चे नारे देत होते. झुबिनची ‘मायाविनी’सारखी प्रसिद्ध गाणी एका सुरात गात होते. जणू आसामने आपला कर्तबगार, कर्तव्यतत्पर मोठा मुलगा गमावला होता. स्वतः मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा जातीने अंत्ययात्रेच्या तयारीकडे लक्ष देत होते. झुबिनचा मृतदेह विमानातून उतरवण्यात आला, तेव्हा हेमंत बिस्वा शर्मांनी गुडघ्यावर बसून साश्रू नयनांनी झुबिनचं अंत्यदर्शन घेतलं.
झुबिन गर्ग म्हणजे ‘या अली’ गाण्याचा गायक एवढीच झुबिनची ओळख असलेल्या मुख्य धारेतील प्रसार माध्यमांना, सर्वसामान्य माणसांना एक कोडं पडलेलं - एका स्थानिक कलावंताच्या अंत्ययात्रेला एवढे लोक कसे काय येतात? झुबिनची अंत्ययात्रा आतापर्यंत इतिहासात जगातील चौथ्या क्रमांकाची विशाल समुदाय एकवटलेली अंत्ययात्रा होती आणि भारतातील पहिलीच.
झुबिनच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर म्हणजे अलीकडच्या काळातील स्वयंघोषित नेत्यांना एक जबरदस्त चपराक आहे. प्रेम, आदर आपल्या विचारांतून, कृतीतून कमवायला लागतो, विकत घेता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
झुबिनच्या लोकप्रियतेचं रहस्य शोधायचं झालं तर झुबिन नावाच्या कलाकाराचीही ओळख करून घ्यायला पाहिजे आणि झुबिन गर्ग या अजब रसायनापासून घडलेल्या माणसालाही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
झुबिनची सांगीतिक कारकीर्द बघितली तर त्याने आसामीसहित एकूण ४० भाषांमध्ये ३८,००० गाणी म्हटली. तो फक्त गायक नव्हता, तर गायक-संगीतकार-गीतकार-अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अशी चौफेर कामगिरी त्याच्या नावावर जमा आहे. झुबिन हा भूपेन हजारिकानंतर संगीतक्षेत्रातला सर्वात जास्त मान मिळवणारा आसामी कलाकार होता. हिंदीतील ‘या अली’ या लोकप्रिय गाण्याचाच त्याच्या संदर्भात उल्लेख होतो, पण झुबिनने ‘गँगस्टर’खेरीज ‘गद्दार’, ‘दिल से’, ‘डोली सजाके रखना’, ‘फिजा’, ‘काँटे’, ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या आणि अशा आणखीही काही हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली होती. त्याने हिंदीत अल्बम्स आणि रिमिक्स गाणीही केली. तो मुंबईमध्ये राहूनच बॉलीवूडमध्ये करियर करू शकला असता, पण हिंदीमध्ये काम मिळत असूनही त्याने २०१३ मध्ये आसामला परतायचा निर्णय घेतला. तो म्हणायचा, “सिंहाने आपल्या जंगलातच राहायला पाहिजे.”
झुबिन हा आसामींचा आवाज होता, त्यांचा हुंकार होता. त्याने लोकांच्या हितासाठी सरकारी यंत्रणांशी संघर्ष केला. त्याने वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या मूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही. त्याचे आसामवर, आसामच्या संस्कृतीवर, आसामच्या लोकांवर मनापासून प्रेम होतं. त्याने आसामच्या लोकांवरच नाही, तर तिथल्या निसर्गसंपत्तीवर, प्राण्यांवरही प्रेम केलं. गरजवंतांना भरभरून मदत केली. उदयोन्मुख कलाकारांनाही त्याने वेळोवेळी पाठिंबा दिला. आपल्या दाराशी मदतीची आशा घेऊन आलेल्या कुणालाही त्याने विन्मुख पाठवले नाही. झुबिनने लोकांना मदत केल्याच्या असंख्य कहाण्या आहेत. त्याच्या गाण्यांमधूनही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं, त्यांच्या सुख-दुःखांचं प्रतिबिंब होतं. तो नियमितपणे ‘बिहू’ महोत्सवात आणि आसामच्या इतर सांस्कृतिक महोत्सवात भाग घ्यायचा.
त्याचे फक्त सूरच सच्चे नव्हते, तर त्याचं मनही निर्मळ होतं. त्याने कायम आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते केलं. राजकारण, जात, धर्म याच्याशी त्याला काही देणं-घेणं नव्हतं. पण आसामींच्या हितासाठी तो ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला विरोध करण्यासाठी आंदोलनात सामील झाला. एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आसाममध्ये कोविडच्या खूप केसेस दाखल झाल्या. तेव्हा झुबिनने आपलं गुवाहाटीतील दुमजली घर कोविडग्रस्तांच्या उपचारासाठी सरकारला दिलं. त्याने फुटबॉलच्या मॅचेस खेळून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी जमवला. ‘कलागुरू आर्टिस्ट फाऊंडेशन’ या आपल्या सामाजिक संस्थेमार्फत तो अनेक सामाजिक कामांसाठी निधी द्यायचा.
१८ नोव्हेंबर १९७२ला मेघालयमधील तुरा येथे जन्मलेल्या झुबिनला संगीताचा वारसा त्याच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. झुबिन बोरठाकूर असं मूळ नाव असलेल्या झुबिनने ‘गर्ग’ हे त्याच्या गोत्राचे नाव पुढे वापरले. झुबिनचे वडील मोहिनी मोहोन बोरठाकूर मॅजिस्ट्रेट होते, ते गीतकारही होते. त्याची आई ईली बोरठाकूर एक गायिका होत्या. विख्यात संगीतज्ञ झुबिन मेहता यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे नाव झुबिनला देण्यात आले. गायकीचे कुठलेही रीतसर शिक्षण झुबिनने घेतले नव्हते. तो लहान वयापासूनच गायला लागलेला. मात्र, तो अकरा वर्षं तबल्याचे शिक्षण घेत होता. १९९२ साली ‘युवा महोत्सवा’त झुबिनला त्याच्या एकल पाश्चिमात्य गायनासाठी सुवर्णपदक मिळालं आणि बी.एस्सी.चं शिक्षण मध्येच सोडून त्याने संगीतातच करियर करायचं ठरवलं. एकोणिसाव्या वर्षी झुबिनचा पहिलावहिला आसामी अल्बम ‘अनामिका’(१९९२) बाजारात आला. तो रॉक, मेटल संगीतापासून लोकसंगीतापर्यंत सर्वच गायनप्रकार लीलया गाऊ शकणारा गायक होता. झुबिन १२ वाद्यं वाजवू शकायचा. झुबिनच्या ‘एकोज ऑफ सायलेन्स’ या नॉन फिल्मी गटातल्या चित्रपटाला २००९ च्या ५५ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘उत्कृष्ट संगीतकारा’चा पुरस्कारही मिळाला होता. गेल्याच वर्षी मेघालय सरकारने झुबिनला मानद ‘डी.लिट्.’ पदवी प्रदान केली होती.
झुबिन खूप मनस्वी होता. वादग्रस्त विधानांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. त्याच्या व्यावसायिक कामावरही त्याचा थोडाफार परिणाम झालाच, पण, झुबिन आपल्या मतांवर, आपल्या भूमिकांवर ठाम राहिला. झुबिनची नाळ त्याच्या मातीशी, त्याच्या माणसांशी इतकी घट्ट जुळली होती की वादग्रस्त विधानं करूनही आसामच्या जनतेने त्याच्यावर कायम तसंच प्रेम केलं.
झुबिन तरुणाईचा आयडॉल होता, फॅशन आयकॉन होता. झुबिन वेगवेगळ्या फॅशन्स करायच्या. अनेकदा तो बोहेमियन लूक्समध्ये दिसायचा. तो होताही विलक्षण देखणा. पन्नाशीतही त्याने आपला फिटनेस टिकवला होता.
असामान्य आवाजाच्या जादूने आणि आपल्या लोकांवर भरभरून केलेल्या प्रेमाने फक्त आसामच नाही, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल ज्याने जिंकला....तो झुबिन गर्ग...उर्वरित भारताला त्याच्याबद्दल काही माहीतच नव्हतं किंवा फारच कमी माहिती होती. हे कसलं लक्षण आहे? मुंबई-दिल्ली-बंगळुरू- हैद्राबाद-चेन्नईच्या पलीकडेही भारत आहे की नाही..? मेनलँडमध्ये राहणारे लोक आणि ईशान्य भारतीय जनता फक्त नकाशावरच एका देशाचे नागरिक आहेत का?... ईशान्य भारतातील निसर्गनिर्मित, मानवनिर्मित संकटांशी आपल्याला सोयरसुतक नाही, ज्या आसामच्या सुपुत्राला अखेरचा अलविदा करायला संपूर्ण आसामने उत्स्फूर्त बंद पाळला, त्या झुबिनबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. ‘पॅपोन’ हे माणसाचं नाव आहे की एका शहराचं, याबद्दल काहींच्या मनात गोंधळ असतो (विश्वास ठेवा, हे खरं आहे), आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदकं जिंकून देणाऱ्या ईशान्य भारतीय खेळाडूंची नावं आपल्याला एकतर माहीत नसतात, लक्षात राहात नाहीत किंवा नीट उच्चारता पण येत नाही. ‘मेरी कोम म्हणजे तीच ना, जिच्यावर सिनेमा निघाला आणि ज्याच्यात प्रियांका चोप्राने तिचा रोल केला होता’, अशा निर्लज्ज प्रतिक्रिया सर्रास ऐकायला मिळतात.
झुबिन एक वादळ होतं....झंझावात होता. हे वादळ आता शमलं आहे. झुबिनच्या चितेची राख विझली आहे, पण आसाम मूकपणे रडतोय आजही.. राजकारण्यांच्या, धनाढ्यांच्या मर्ज्या राखण्यासाठी मन मारणाऱ्यांच्या, स्वाभिमान विकणाऱ्यांच्या भाऊगर्दीत एक झुबिन गवसावा, ही अप्राप्य गोष्ट आहे. स्वप्नवत आहे. हे स्वप्न सत्यात उतरलेलं आसामच्या जनतेनं याचि देही याचि डोळा बघितलं. एक अत्यंत दुर्मिळ असा हिरा होता...आणि आसामवासीयांना त्याची कल्पनाही होती.
झुबिनला फक्त त्याच्या गाण्यांसाठी नको आठवूयात...आठवणीत राहण्यासारखं खूप काही देऊन गेला आहे तो...त्याच्या निडरपणाला आठवूयात...अनेक स्थानिकांच्या मनात स्वाभिमान आणि अस्मिता फुलवणाऱ्या त्याच्या शब्दांना आठवूयात...कामाचा ध्यास घेऊन एका रात्रीत ३६ गाणी रेकॉर्ड करणाऱ्या त्याच्या मेहनतीला आठवूयात... सत्ताधाऱ्यांसमोर, दहशतवाद्यांसमोरही न झुकणाऱ्या त्याच्या निग्रही स्वभावाला आठवूयात...सत्ता, पैसा, प्रसिद्धी, पद यांच्यापेक्षा माणुसकी, मातीचं ऋण यांची किंमत खूप मोठी आहे, याचा वस्तुपाठ देणाऱ्या अफाट माणसाला आठवूयात...देणाऱ्याची झोळी कधीच रिती होत नसते, याची साक्ष मरणानंतरही तो देऊन गेला...त्याच्या दिलदारपणाला आठवूयात...
मुक्त पत्रकार आणि विविध स्वयंसेवी संस्थांसोबत काम