डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
धनु
शिस्तबद्ध रहा
धनु राशीचे चिन्ह धनुष्यबाण घेतलेल्या व मानवाच्या कमरेवरील डोक्यापर्यंतचा अर्धा भाग हे मानवाचे शरीर असलेला आणि कमरेपासून पायापर्यंतचा अर्धा भाग घोड्याचे शरीर असलेला किंवा अशा प्रकारची आकृती ही दोन शरीरे धारण करणारी म्हणजेच द्वि देहधारी राशी आहे. धनुर्धारी क्षत्रियाप्रमाणे विपणनांचे रक्षण करणे, दलितांचे दुःख दूर करणे, शौर्य गाजवणे, धैर्य धारण करणे, दान देणे वगैरे क्षत्रियांचे प्रमुख गुण तसेच समरभूमीत विजय मिळवणे, राज्य करणे, प्रजेचे पालनपोषण करणे, प्रजेला शिक्षण देणे अशा प्रकारचे क्षत्रियांचे गुण या धनुर्धारी मानवात उपजत आहेत.
शिक्षण : शिक्षणासाठी फारसे अनुकूल वातावरण नसेल. जर आपल्याला उज्ज्वल यश प्राप्त करायचे झाल्यास आपल्याला जास्त कष्ट घेणे, परिश्रम घेणे याची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता अथवा वेळ वाया न घालवता तसेच कसोशीने कुसंगत टाळून अव्यहत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी आपल्याला इतरांची मदत घ्यायला हरकत नाही. प्रामाणिकपणे घेतलेल्या कष्टामुळे अपेक्षित यश प्राप्त होईल.
पारिवारिक : परिवारामध्ये काही वेळेस निरनिराळ्या कारणांवरून वादविवाद घडून कलहसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे भावंडांमधील मतभेद सुद्धा निर्माण होऊ शकतात. लहानसहान कारणांवरून होणारे गैरसमज टाळता आल्यास ते हिताचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे प्रमुख समस्या अथवा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यांचा सल्ला उपयोगी पडू शकतो, तसेच कुटुंबातील मुला-मुलींकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. खर्चामध्ये वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे कुटुंबातील महिलांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. सर्व कार्य नियमित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज राहील. आर्थिकदृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे.
नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीत सावधानतेबरोबरच शिस्तबद्ध राहा तेच हिताचे ठरणार आहे. ग्रहमान नैसर्गिक पाठबळ देणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पाऊल शांतपणे व विचार करूनच टाकावे लागेल. मात्र तरुण-तरुणींचा आशावाद वाढतच राहील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाहविषयक प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे नोकरी मिळू शकते. मात्र सार्वजनिक जीवन सांभाळा, निरनिराळ्या स्वरूपाच्या कटकटी समोर उभ्या राहू शकतात. त्यामुळे आपल्या पूर्वीच्या नियोजनात बदल करावा लागू शकतो. इतरांची मदत घ्यावी लागू शकते व ती जरूर घ्या. अशी मुदत उपलब्ध होऊ शकते. चालू नोकरीमध्ये आपल्या कामाच्या ज्ञानाबाबत अद्यावत राहण्याची गरज आहे तसेच कोणत्याही कामांमध्ये चालढकल नको, वरिष्ठांबरोबर विनयशीलतेने वागा. आपले काम आपण स्वतःच करा. इतरांवर अवलंबून राहू नका. नुकसान होऊ शकते.
शुभ दिनांक : 6, 7, 9, 10, 11, 14, 17, 19, 24, 25, 26, 28
अशुभ दिनांक : 5,13,16,18,21,23, 30
मकर
संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा
मकर राशीचे चिन्ह हरणाचे तोंड असलेले, पाठीमागील भाग मगरीचा असलेले ही मकर रास आहे. हे चिन्ह मकर राशीचे आहे. पहिल्या पंधरा अंशापर्यंतच्या भागात निरुपद्रवता, संतोषीवृत्ती, स्वच्छंदी विचार, हे हरणाच्या अंगी असलेले गुण आढळतात. मकर राशीचे बाकीचे शरीर मगरीचे आहे. मकर राशीच्या १६ ते ३० अंशापर्यंतच्या भागात दुर्बलांवर आक्रमण प्रबलांशी नमते घेणे, संधी साधून कार्य करणे, आपल्या घरी बलवान असणे, स्वश्रेयाने बलवान ठरणे अशा प्रकारचे मगरीचे प्रमुख गुण हे मकर रास असलेल्या जातकांमध्ये आढळतात. मकर रास ही मध्यम प्रसव राशी आहे. ही राशी पृथ्वी तत्त्वाची तसेच अर्थ तत्त्वाची राशी आहे.
शिक्षण : सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान असणार आहे. त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. आपल्या मनाप्रमाणे काही वेळा वागणे नुकसानकारक होऊ शकते. स्वतःवरती बंधने ठेवा तसेच कुसंगत टाळा, व्यसनांपासून दूर राहा. इतरत्र वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन व कुटुंबातील व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील अभ्यास करताना मन अभ्यास केंद्रित रहावे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागते. त्यामुळे मन शांत व स्थिर करणे आवश्यक आहे. ग्रहमान चांगले आहे.
पारिवारिक : काही वेळेस कुटुंबातील सदस्यांमध्ये असमंजसपणा वाढू शकतो. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्याचा आपल्या नातेसंबंधांवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याकारणाने आपण सर्व सदस्यांना समजावून घेणे आवश्यक राहील. कुटुंबातील सर्व कामे वेळेवर व नियमित होणे व ज्याची त्याने करणे महत्त्वाचे ठरेल. वादविवादांना स्थान देऊ नका. लहानसहान वादविवाद निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कुटुंबातील शांतता टिकण्यास मदत होईल. आपण पुढाकार घ्या. आर्थिकदृष्टीने ग्रह अनुकूल आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : हा कालावधी आपल्याला सावधानतेचा इशारा देत आहे. आपल्या व्यवसाय, धंद्यात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात कोणताही आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात संशयास्पद, आर्थिक व्यवहार टाळणे हिताचे राहील. नुकसान होऊ शकते. या काळामध्ये शेअर मार्केट, सट्टा बाजार तेजी-मंदी संबंधित व्यवहार करणे टाळलेले बरे. नवीन गुंतवणूक नको, इतरांच्या गोड बोलण्याला फसवू नका. त्याचप्रमाणे महिन्याच्या पूर्वार्धामध्ये असंगाशी संग टाळणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे व्यसनांपासून दूर राहा. मित्रमंडळींच्या वर्तुळात जपून राहा. वादविवादांची शक्यता. तसा हा कालावधी मिश्र फळे प्रतिपादित करू शकतो. त्यामुळे सावध राहणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात काही वेळेस वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आपण स्वतः शांतपणे परिस्थिती समजून घेऊन त्यावर व्यक्त व्हा. विशेषतः जोडीदाराबरोबर संबंध सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करा.
शुभ दिनांक : 9,10,11,14,25,26,28
अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30, 31