डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ
आत्मविश्वासात जबरदस्त वृद्धी
कुंभ रास ही शनीची रास आहे. कुंभ राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे धनिष्ठा नक्षत्र. शततारका नक्षत्र, पूर्वा, भाद्रपदा नक्षत्र ही नक्षत्र आहेत. धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे. शतकारक नक्षत्र राहूचे नक्षत्र आहे. पूर्वा भाद्रपदा हे गुरूचे नक्षत्र आहे. त्याचप्रमाणे धनिष्ठ हे नक्षत्र राक्षसगणी आहे. शततारका हे सुद्धा राक्षसगणी नक्षत्र आहे. पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे धनाढ्य, शूर, खादाड, दुष्ट, गायनप्रिय, साहसी, हिंसक, निर्लज्ज, चंचल, धर्मप्रेमी, धनलोभी, पराक्रमी, मित्र कमी, स्त्रियांचा द्वेष करणारा, अविचारी, दुःख भोगणारा असा असतो. शततारका नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे जातक व्यसनी, स्पष्टवक्ता, शत्रुघाती, साहसी, कोणत्याही लोभाला बळी न पडणारा, सौंदर्य कमी असलेला, विद्या बेताची असणारा, मद्य, मांस, पशुपक्षी यांचा व्यापार करणारा असतो.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान असले तरी अभ्यासाचा कंटाळा करू नये. वेळेचे नियोजन करावे. अभ्यासात सातत्य टिकवून ठेवणे. महत्त्वाचे ठरेल असे न केल्यास शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यश मिळणे कठीण जाऊ शकते हे लक्षात ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी काही वेळेस अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न करा. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास यश मिळू शकते.
पारिवारिक : कुटुंबामध्ये काही वेळेस लहानसहान कारणांवरून मतभेद निर्माण होऊन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भावंडांबरोबर वादविवाद होऊ शकतात. ते टाळणे कुटुंबातील शांततेसाठी हितावह ठरेल. आपल्याला हे वादविवाद शमविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे मतभेद कमी होतील. आपल्याला समाजामध्ये मानसन्मानाचे योग आहेत.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपले आजूबाजूचे वातावरण सकारात्मकतेने व्यापलेले असेल, प्रत्येक लहानमोठ्या कार्यात सहजी यश मिळत असल्याचे अनुभवून आपल्या आत्मविश्वासात जबरदस्त वृद्धी होईल. हातात घेतलेली कामे झटपट पूर्ण करून नवीन कामे हाती घ्या. नवी उमेद, उत्साह, चैतन्य आपल्यामध्ये येईल, मात्र पूर्वार्धामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या हे एक प्रमुख कारण असू शकते. त्याचप्रमाणे वैयक्तिक बाबींवर सुद्धा खर्च होईल. व्यवसाय, धंद्यात आयत्या वेळेस खर्चिक गोष्टी अचानक उद्भवू शकतात, यंत्रसामग्रीवर सुद्धा खर्च होऊ शकतो, त्याचबरोबर काही वेळेस अनावश्यक खर्चही होईल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे श्रेयस्कर ठरेल. व्यवसाय धंद्यात उसनवारी टाळा. त्यामध्ये वाढ नको. व्यवसाय-धंद्यात व्यावसायिक यंत्रे, वाहने आणि कामगार इत्यादीमधून मनस्ताप घडण्याची शक्यता. त्यामुळे शांतपणे निर्णय घ्या. घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. कुटुंबात वैवाहिक सुख मिळवून मोठा आनंदोत्सव साजरा करू शकाल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे मंगलकार्य ठरू शकते.
शुभ दिनांक : २, ३, ५, ६, १०, १९, २०, २६, २८
मीन
बलवत्तर विवाह योग
मीन रास ही गुरूची रास आहे. या राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा व रेवती नक्षत्र आहेत. उत्तरा भाद्रपदा हे शनि महाराजांचे नक्षत्र आहे. रेवती हे बुधाचे नक्षत्र आहे. पूर्वा भाद्रपदा हे शनीचे नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा मनुष्यगणी नक्षत्र आहे. रेवती हे देवगणी नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असलेला जातक भाषाचतुर, सुखी, जास्त संतती सौख्य लाभलेला, शत्रूवर विजय मिळवणारा, धार्मिक, संपन्न, परोपकारी, श्रद्धावान, कमी केस असलेला, उतावळा व बोलका असतो. पूर्वा भाद्रपदा असलेला जातक उद्विग्न, स्त्रीवश, धूर्त, श्रीमंत, निपुण, विद्या व्यासंगी, संशोधक, लबाड, शास्त्रज्ञ, कठोर अंत:करणाचा असतो. रेवती नक्षत्राचा जातक, सुंदर, सर्व अवयव मनोहर, ठेंगू, निर्मळ मनाचा, धनवान, बुद्धिवान, स्त्रीवर प्रेम करणारा, पुष्कर मित्र, नि:स्वार्थी, लोकप्रिय, सामाजिक कामं करणारा, कायदे पंडित, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा, सत्कर्मी असतो. पूर्वा भाद्रपदाचा प्रथम चरण, उत्तरा भाद्रपदाचे चार चरण व रेवती नक्षत्राचे चार चरण मिळून तयार होते.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु काही वेळेस आपला आत्मविश्वास कमी पडल्यामुळे आपल्याला आत्मबळ वाढवणे गरजेचे आहे. आत्मबळ उपासनेने वाढू शकते. अभ्यासात सातत्य पाहिजे व योग्य दिशेने प्रयत्न केल्यास चांगले यश मिळवू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळेल. अनेक संधी चालून येतील व आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. अनुकूल ग्रहमान असल्याने योग्य संधीचा फायदा घ्या व आपले भविष्य उज्ज्वल करा.
पारिवारिक : परिवारातील सदस्यांच्या मागण्या वाढल्यामुळे तसेच काही वेळेस अचानक कौटुंबिक खर्चाच्या काही बाबी समोर आल्यामुळे आर्थिक नियोजनाची गरज लागेल. वाढीव खर्च होईल. विनाकारण वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आपण आपल्या सकारात्मक विचारांनी असे वादविवाद निर्माण करणारे प्रसंग टाळू शकता. त्यासाठी आपल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद साधणे गरजेचे आहे. खर्च वाढले असले तरी धनप्राप्ती चांगली होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : या कालावधीमध्ये परिवारातील तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. आत्तापर्यंत विवाह ठरण्यामधील अडचणी येत होत्या अथवा जे विवाह लांबलेले होते अशा अडचणी अथवा समस्या दूर होऊन त्यांचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह होतील, प्रेमात यश लाभेल, चालू प्रेमप्रकरणात मात्र मर्यादेचे उल्लंघन करू नका. समज-गैरसमजाने नात्यावर परिणाम होऊ शकतो. परिवारात मंगलकार्य ठरेल अथवा मंगलकार्याचे नियोजन होईल. कुटुंबातील तरुण- तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न मिटतील. पण प्रयत्न मात्र प्रामाणिक हवेत. ओळखी-मध्यस्थींचा उपयोग होईल. कलाकार, खेळाडूंना नवनवीन संधी उपलब्ध होतील. ते आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतील. त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक उत्कर्ष होईल. प्रसिद्धीसुद्धा मनाप्रमाणे मिळेल. भागीदारीच्या व्यवसायामध्ये विशिष्ट लाभ मिळेल.
शुभ दिनांक : २, ३, ५, ७, १०, २०, २२, २८