डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
कोकणातील रत्नागिरी ते गणपतीपुळे दरम्यानचा आरेवारेचा रस्ता म्हणजे निसर्गाच्या कुशीतली एक विहंगम सफर. या मोहक रस्त्यावर वसलेल्या आणि मनाला शांतता देणाऱ्या दोन निसर्गरम्य ठिकाणांची ही भटकंती!
रत्नागिरीतील आरेवारेचा रस्ता म्हणजे एक सुंदर मार्ग. रत्नागिरी आणि गणपतीपुळे या कोकणातील प्रसिद्ध स्थळांना जोडणारा हा रस्ता. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांच्यासाठी तर हा रस्ता म्हणजे पर्वणीच.. वळणे वळणे घेत जाणाऱ्या या रस्त्यावरून समुद्राची विहंगम दृश्य दिसतात. आपण समुद्रापासून बरेच वर असतो, त्यामुळे जाताना समुद्राची निळीशार अथांगता, त्यावर उमटणाऱ्या फेसाळ लाटा हे सारे गाडीच्या खिडकीतून पाहतच प्रवास करत असतो. बऱ्याच पर्यटकांना इथे थांबण्याचा मोह व्हायचा. त्यामुळे या मार्गावर काही खास पॉईंटसुद्धा तयार झाले आहेत. पण याच रस्त्यावर सुंदर गावं, किनारे आहेत. रत्नागिरी आणि गणपतीपुळे भटकंतीत या रस्त्यावरच्या दोन विलक्षण सुंदर ठिकाणांना भेट दिली.
ही भटकंती करण्यासाठी मी माझा मुक्कामच आरे वारे जवळच्या एका गेस्ट हाऊसमध्ये केला होता. तिथून मला रत्नागिरी आणि गणपतीपुळे सारख्या अंतरावरच होतं. दोन दिवस तिथे मुक्कामाला होते. पोहोचल्यावर संध्याकाळी गणपतीपुळ्याला जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रत्नागिरीतील पर्यटनस्थळं बघितली. आणि त्या संध्याकाळी गणपतीपुळ्यानजीक असणाऱ्या पण फारशा परिचीत नसणाऱ्या भंडारपुळे या किनाऱ्याकडे जायचं ठरवलं. या किनाऱ्याची रचना पाहिली तर या किनाऱ्याला लागूनच गणपतीपुळ्याचा किनारा आहे फक्त मध्ये एक मोठा कडा येतो. किनाऱ्याला जाण्यासाठी गावातून रस्ता आहे, पण मला तो मार्ग गवसलाच नाही. पण अशा परिस्थितीत एक असा मार्ग सापडतो जो एक अनोखा अनुभव देऊन जातो. गाडी रस्त्याकडेला पार्क केली. समुद्रापासून काही फूट उंचावर होते. तिथून किनाऱ्याकडे जाण्यासाठी सुंदर पाखाडी होती. पाखाडी म्हणजे जांभ्यात बांधलेली किंवा घडवलेली पायऱ्यांची वाट. बहुतांश लोक पाखाडीच्या १०-१२ पायऱ्या उतरून, तिथल्या पॉईंटवर थांबून दृश्य बघतात. पण किनाऱ्यावर उतरत नाहीत. मला मात्र किनाऱ्यावरच जायचं असल्याने ५०-६० पायऱ्यांची पाखाडी उतरले. जातानाच समुद्रकिनाऱ्याची विस्तीर्णता समोर दिसत होती. फारच मोहक दृश्य होतं. अगदी पाच ते आठ मिनिटांत किनाऱ्यावर उतरले आणि पाहते तर तिथे फक्त मी, माझा नवरा आणि फक्त चार ते पाच पर्यटक होते. बाकी किनारा असा रिकामा होता. सोनेरी वाळूचा विस्तीर्ण असा हा किनारा आहे! हा भंडारपुळेचा किनाराही गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यासारखा लांबलचक पसरला आहे. किनाऱ्यावर मग छान फिरायला सुरुवात केली. वारा तर जबरदस्त सुटला होता. केसात खारा वारा शिरत होता. नंतर मी पाण्यात पाय भिजवले, लाटांसोबत छपछप खेळले. किनाऱ्यावर अगदी मनमुराद बागडले. या किनाऱ्याच्या एका बाजूला दगडात नैसर्गिकरित्या गुहेसारखा भाग तयार झाला आहे. काही सपाट दगड तिथे आहेत. ओहोटीच्या वेळी मेडिटेशन करण्यासाठी मस्त जागा वाटली. मी किनाऱ्यावरच पाय सोडून आरामात बसले. आणि समोर होणारा सूर्यास्त बघितला. भंडारपुळ्याची ही भटकंती आनंददायी आणि सोबतच निवांत क्षणांनी भरलेली होती.
सूर्यास्ताचे मोहक वातावरण तर अनुभवलं पण सुर्योदयाचे जादुई वातावरण बघण्यासाठी तिसऱ्या दिवशी पहाटेच एका गावाकडे जायचा प्लॅन केला. अगदी पहाटे उठून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने प्रवास केला. साधारण अर्ध्या तासाने आमच्या गाडीने मेन रस्ता सोडून एक जबरदस्त Pin bend Turn घेतला आणि कमानीतून आम्ही समुद्रकिनारी वसलेल्या गावी पोहोचलो. या गावाचे नाव आहे काळबादेवी. गावात पोहोचल्यावर दोन गाड्या जातील अशा अरुंद पण सरळसोट रस्त्याने जाऊ लागलो. काळबादेवी गावाची रचना थोडीफार देवबागसदृश आहे. रस्त्याच्या एका बाजूला समुद्रकिनारा आहे आणि एका बाजूला खाडीचे पात्र. आणि गावाच्या टोकाशी संगम पॉईंट आहे. मी त्या पॉईंटवर नंतर जाणार होते. सगळ्यात आधी गाडी खाडीच्या दिशेने वळवली आणि एका मंदिरापाशी पोहोचलो. खाडीच्या काठाशी दगडांच्या बांधावर दोन मंदिरे उभी आहेत. एक आहे श्री देव रामेश्वर यांचे मंदिर आणि दुसरे आहे श्री कालिकादेवीचे मंदिर. मंदिरांचा परिसर प्रशस्त आहे. एका बाजूला रामेश्वर आणि कालिकादेवी विराजमान आहेत आणि एका बाजूला खारफुटीच्या रूपात निसर्गदेवता. मंदिराच्या बाजूला खाडीचे पात्र निरखत बसण्यासाठी कट्टे आणि बेंच केले आहेत. सुर्योदयाचे अप्रतिम दृश्य तिथे बसून पाहत होते. समोरच्या टेकडीमागून सूर्यदेव जस जसे उगवत होते, तसा त्यांचा सोनेरी प्रकाशरूपी आशीर्वाद सबंध परिसरावर अगदी अलवार पसरत होता. धुक्याच्या कणकणात हा सोनेरी अंश मिसळत होता, खाडीच्या पात्रात चमकत होता. झाडांच्या शेंड्यावर लखलखत होता. आम्हीही हात जोडून मनोभावे त्यांना नमस्कार केला. आमच्या चेहऱ्यावरूनही मायेने त्यांनी आशीर्वादरुपी हात फिरवला आहे असं वाटत होतं. आमचे चेहरेही त्या सोनेरी प्रकाशात उजळले होते. खरंच तो अगदी जादुई अनुभव होता.
सूर्यदेवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पहिल्यांदा रामेश्वर मंदिरात जायचं ठरवलं. रामेश्वरांचे हे मंदिर कौलारू कोकणी पद्धतीचे आहे. खाडीपात्राच्या जवळ असल्यामुळे कदाचित जोत्यावर बांधले असावे. पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला. आटोपशीर सभामंडप होता. बाजूने भिंतीची अशी रचना होती की भिंती अर्ध्या उंचीपर्यंत बांधल्या होत्या. बसायला कट्टा होता. वरचा अर्धा भाग खुला होता. म्हणजे त्या कट्टयावर बसलं की, खाडीचे पात्र दिसत राहायचं. त्यानंतर दर्शनासाठी मंदिराच्या आत गेले.. तिथे एक भलीमोठी घंटा दिसली. ही पोर्तुगीजकालीन पितळी घंटा आहे, असं समजलं. त्यावर १७३७ साल कोरलेले दिसलं. चित्त अगदी शांत आणि प्रसन्न झालं. रामेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतलं. नामजप केला आणि प्रसन्न भावाने मंदिरातून निघाले. बाजूलाच कालिकादेवीचे मंदिर आहे. तिथे कालिकादेवीची काळ्या पाषाणात मूर्ती आहे. मूर्ती बघून अंगावर शहारा येतो. देवीचेही मनोभावे दर्शन घेतलं. इथला प्रात:काळीचा प्रहर अद्भुत होता. मी अगदी तोडक्यामोडक्या शब्दात तिथला अनुभव मांडला. पण हा प्रहर तिथे जाऊन प्रत्येकाने अनुभवावा.
काळबादेवी, भंडारपुळे यासारखी अनेक सुंदर ठिकाणे या वाटेवर आहेत. आता रत्नागिरी, गणपतीपुळे प्लॅन करताना या वाटेवर असणाऱ्या ठिकाणांनाही भेट द्यावी. म्हणजे अगदी आरे वारे समुद्रकिनाराही एक्सप्लोअर करावा. या रस्त्यावरून दिसणाऱ्या दृश्यांचा आनंद तर घ्यावाच पण वेळ असेल तर वाट थोडी वाकडी करून जवळ जाऊनही ही ठिकाणं बघावीत आणि अनुभवावीत.
जवळील बस स्थानक - गणपतीपुळे, रत्नागिरी
जवळील रेल्वे स्टेशन - रत्नागिरी
स्वतःच्या गाडीने प्रवास केल्यास थांबून छान अनुभव घेता येईल.
प्रवासासाठी मार्ग - मुंबई गोवा महामार्ग
भेट देण्यासाठी उत्तम काळ - ऑक्टोबर ते फेब्रुवारी
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com