जागर गांधी विचारमूल्यांचा! 
अक्षररंग

जागर गांधी विचारमूल्यांचा!

शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात नवी दिल्लीच्या जंतरमंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर निवडणूक व्यवस्थेतील गैरकारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी गांधी जयंती दिनी म्हणजे येत्या २ ऑक्टोबर रोजी मुंबईत जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात नवी दिल्लीच्या जंतरमंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर निवडणूक व्यवस्थेतील गैरकारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी गांधी जयंती दिनी म्हणजे येत्या २ ऑक्टोबर रोजी मुंबईत जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मीरा-भाईंदरमध्ये सामाजिक बंधुभाव, जातीय सलोखा राखण्याच्या उद्देशाने गांधी जयंती दिनीच ‘वॉक फॉर पीस’ आयोजिण्यात आले आहे. हा जागर आहे महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि अजरामर आचार-विचारांचा.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदाची १५७ वी जयंती आहे. गांधी हत्या होऊन तब्बल ७८ वर्षे झाली आहेत. एवढा प्रदीर्घ काळ उलटूनही गांधी मिटलेले नाहीत की गांधी विचार संपलेले नाहीत. कारण गांधी विचार आहेत शुद्ध सात्विक. त्यात कमालीचा साधेपणा आहे. सच्चेपणा आहे. प्रामाणिकपणा आहे. सकारात्मकता आहे. मुख्य म्हणजे नैतिकता व विवेकवाद आहे. बदलत्या काळात गांधी विचार तेजाने अधिक तळपून निघाले आहेत. म्हणूनच ते अजरामर आहेत, अनुकरणीय आहेत व तितकेच वंदनीयसुद्धा आहेत. गांधी विचारांना आहे माणुसकीच्या आचार विचारांची विलक्षण अनुभूती. म्हणूनच भारत हा गांधींचा देश असल्याचा डंका अवघ्या विश्वात वाजत, गाजत, गर्जत आहे. त्यापुढे भल्याभल्यांना झुकावे लागत आहे. हीच गांधी विचारांची थोरवी आहे. या विचारांना सत्य-अहिंसेसोबतच शांतता, सलोखा, सद्भावना, सहिष्णुता, समंजसपणा, सहनशीलता व विवेकाची जोड आहे. म्हणूनच गांधी विचार हा सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मतेच्या धाग्यात गुंफून ठेवणारा देशहिताचा मार्ग ठरला आहे.

सध्याच्या भ्रष्टाचार व वशिलेबाजीने बरबटलेल्या महागड्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवर छेडलेल्या अभूतपूर्व आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या बलाढ्य शिक्षण मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. या आंदोलनापाठोपाठ आता निवडणूक आयोगाच्या अंदाधुंद कारभाराविरूद्ध दीपके यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. या हाकेला देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतच खोट असल्याने देशभरातील जवळपास १३ कोटी मतदारांची नावे या ना त्या कारणावरून मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच, मतदार यादी नोंदणीसाठीच्या नमुना ६ अर्जामधील ऑनलाईन बदलांवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला असून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे (एसआयआर) तरुण मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यातच, मतदारांचा डेटाबेस हाताळण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरून काढून दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे केंद्रित केले गेल्याने स्थानिक पातळीवरील मतदार याद्यांमधील चुका दुरुस्तच करता आलेल्या नाहीत, असा आरोप आहे. यासंदर्भात गेल्या १० महिन्यांत मतदार याद्यांशी संबंधित विविध निर्णयांवर आम्ही किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्याला अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केंद्रीय निवडणूक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू यांनी केल्याचे वृत्त प्रसारीत झालेले आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सीजेपीचे अभिजीत दीपके यांच्यासह देशभरातील प्रमुख राजकीय पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून देशाचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतांच्या मुद्यावरील जनआंदोलनाचा हा गांधी मार्ग देशात नवे मन्वंतर घडवून आणेल यात काही शंका नाही.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात लेझर लाईट डीजेचा दणदणाट करून रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या करणाऱ्या उपद्रवखोरांविरुद्ध विद्यानंद बापट नावाच्या तरुणाने आवाज उठवला नाही तर व्यवस्थेला कठोर पावले उचलण्यास भाग पाडले. समाजातील अंधश्रद्धे विरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेऊन शांततापूर्ण सहजीवनाचा पुरस्कार केला. त्यांच्या या भूमिकेला जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय, निसर्ग संपन्न लडाखला वाचवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अलीकडे जोरदार आंदोलन छेडले. अभिजीत दीपके असोत, सोनम वांगचुक असोत की विद्यानंद बापट असोत, त्यांचा लढा शांततापूर्ण संविधानिक व लोकशाही मार्गाने उचललेले शैक्षणिक, सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे सुधारणावादी पाऊल आहे. त्यांच्या या आंदोलनामागील प्रेरणा आहे अर्थातच महात्मा गांधी.

देशात सध्या महागाईने कहर केला आहे. बेरोजगारीने सामान्यांना जीव नकोसा केला आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. शिक्षण महागले आहे. आरोग्य सेवांवरील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. नव्या करप्रणालीने पगाराला कात्री लावून सामान्य माणसाला त्राही भगवान करून सोडले आहे. वशिलेबाजीला ऊत येऊन सार्वजनिक सेवांचा दर्जा कमालीचा घसरला आहे. मुळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे, देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे सत्ताधाऱ्यांचे वायदे हवेत विरले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाने नीचांकी पातळी गाठली असून देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, जातीय तेढ, धार्मिक विद्वेष निर्माण करून सत्ता टिकवण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सामान्यांना जगण्याचे सामर्थ्य देतात ते गांधी विचार.

एकेकाळच्या हरित मीरा-भाईंदरवर भूमाफियांची वक्र नजर पडली. मग त्यांनी आपल्या स्वार्थासाठी सारी हिरवाईच नष्ट करून सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारले. जमेल तेवढी जमीन हडप करून आपले स्वार्थी इमले उभारले. या शहरात अनधिकृत बांधकामाचे अवैध धंद्यांचे भ्रष्टाचाराचे पेव फुटले. त्यावर पांघरून घालण्यासाठी व आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी काही भूमाफियांनी राजाश्रय मिळवला. मग त्यांनी शिक्षण आरोग्य व अन्य सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा क्षेत्रात अक्षरशा धुडगूस घातला. आपल्या काळ्या कारनाम्यांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून कधी जातीयवाद, कधी धार्मिक विद्वेष पसरवून प्रांतवादाला खतपाणी घातले. शाळेत मेथीची भाजी नेणाऱ्या विद्यार्थ्याला दंड ठोठावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली. मुळात कोण कुठला, कुठल्या जातीचा, प्रांताचा, धर्माचा यावरून भेदाभेद करणे सर्वथा गैर आहे. एखाद्याचा पेहराव, त्याची खाद्यसंस्कृती यासारख्या किरकोळ मुद्यावरून एखाद्याला अपमानित करणे त्याहून गैर आहे. ही बाब माणुसकीला कलंकित करणारी आहे. सत्ताधाऱ्यांचा हा अहंकार, भेदाभेद व स्वार्थ लक्षात घेता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मीरा-भाईंदरला ‘वॉक फॉर पीस’चे आयोजन करण्यात आले आहे. या मार्चच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात गांधी विचाराचा जागर होतो आहे तो असा.

देशात सध्या जातीय तेढ, धार्मिक विद्वेष, प्रांतीय अहंकार ,वर्गीय श्रेष्ठत्व व सत्ताधाऱ्यांचा माज वाढत चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या, नोकरशहांच्या मनमानीविरुद्ध देशातील तरुणाई रस्त्यावर उतरून असामान्य कर्तृत्व गाजवू लागली आहे. सत्य, अहिंसा, सामाजिक बंधुभाव, सर्वधर्मसमभावाचा डंका सर्वत्र नव्याने वाजवला जात आहे. त्या मागची प्रेरणा आहे अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अजरामर विचारांची.

prakashrsawant@gmail.com

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

मराठा आरक्षणाचे आंदोलनस्थळ ११२३ दिवसांनंतर अखेर रिकामे; मंडप, व्यासपीठ हटवले

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष