- खुल जा सिम सिम
- ज्योती कपिले
Hi friends! कसे आहात? सुट्टीत काहीतरी नवीन गंमत करण्याचे प्लॅन्स करत असाल. हो ना? तर चला, मी तुमच्यात सामील होते आणि काही गोष्टी सुचवते. बघा, तुम्हाला आवडल्या तर जरूर तसं करा.
तुम्हाला कधी असं जाणवतं का? तुमच्या कपाटात पटकन काही सापडत नाहीए. मग ते पुस्तक असो वा कपडे. तुम्ही खूप शोधता आणि मग ती वस्तू सापडते. आता पाहिजे ती वस्तू मिळाली की तुम्हाला हायसं वाटणारच. पण त्यासाठी किती वेळ लागला, हे तुम्ही विसरून जाता. असा वेळ फुकट दवडून आहे का काही उपयोग? अरे! म्हणजे या दृष्टीने तुम्ही काही विचारच नव्हता केला? ठीक आहे. आता हा महत्त्वाचा विचार करूया. आपलं दप्तर, आपलं कपाट, आपल्या टेबलाचा खण नीट व्यवस्थित आवरून ठेवूया का? काय म्हणता, तुम्ही लागलात पण तयारीला? शाब्बास! अशा प्रकारे आईला घरही आवरायला मदत करा. तिला तुमचा अभिमान वाटेल.
आपली शाळा आपल्याला खूप प्रिय असते. तिकडेही स्वच्छता अभियान राबवायला हवं. वाहते नळ बंद करायला हवेत आणि शाळेच्या बाथरूममध्ये पाण्याचा योग्य तो वापर करायला पाहिजे. नाहीतर अत्यंत घाणेरडा वास येतो. म्हणून बरेच विद्यार्थी शाळेत असताना बाथरूमचा वापर करत नाहीत आणि मग त्यांचं पोट बिघडतं. शिवाय वर्गही स्वच्छ ठेवायला हवेत. खास करून मधली सुट्टी संपल्यावर. डब्यातील भाजीपोळी किंवा काही खरकटं अन्न पडलं तर लगेचच्या लगेच उचलून ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायला हवं आणि रस्त्यावर तर हमखास केळ्याच्या साली पडलेल्या असतात. त्यावरून पाय घसरला तर..? तेव्हा काय हाल होतात ते तर तुम्ही जाणताच. तेव्हा कृपया, आपली सोसायटी, गल्ली-रस्ते आणि शहरही स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. खास करून ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा काढा.
ओला कचरा म्हणजे उरलेलं अन्न, खराब झालेली फळं, भाज्या, त्याची सालं, मांस, गवत आणि इतर सेंद्रिय कचरा, तर सुका कचरा म्हणजे प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कागद, धातू. मात्र फुटलेली काच असेल तर ती तशीच कचऱ्यात टाकू नका. तिचं वेगळं पॅकिंग करून त्यावर लाल खूण करून ठेवा. म्हणजे त्याचं वेगळं विभाजन करता येतं. मुख्य म्हणजे कचरा वेचणाऱ्या व्यक्तीच्या हाताला अथवा कचरा खाणाऱ्या प्राण्यांना जखमा होणार नाहीत.
या जखमांवरून आठवलं. तुम्ही नदी, तलाव, समुद्रकिनारा इथे फिरायला जात असालच. आता सुट्टीतही जाल. तेव्हा खाऊ बरोबर असेलच. त्या खाऊची प्लास्टिकची वेष्टनं तिकडे समुद्रकिनारी तशीच सोडून येता का? म्हणजे तुम्ही मुद्दाम नाही करणार. पण चुकून कधी असं झालं असेल तर? आता मात्र अशी चूक करू नका. आपले नदीकिनारे, समुद्रकिनारे, तलाव आपण जाणीवपूर्वक स्वच्छ ठेवायला हवेत. आता का म्हणून काय विचारता? प्लास्टिकमुळे भयानक जल प्रदूषण होत आहे आणि पाण्यातील छोटे-मोठे मासे आणि इतर जलचर जखमी होत आहेत. कारण काय, तर कोणीतरी वेफर्स खाऊन रिकामं झालेलं पाकीट तिकडेच टाकलं किंवा ते रिकामं पाकीट उडून पाण्यात पडलं, तर माशांना वाटेल की ही चमचमती वस्तू म्हणजे खायचा पदार्थ आहे की काय. त्यांनी ते खायचा प्रयत्न केला आणि ते प्लास्टिक चावलं तर त्यांच्या तोंडात भयानक जखमा होतात. ते आपल्याला लवकर समजत नाही. त्यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार होत नाहीत.
कधीतरी समजतं की, प्लास्टिक खाल्ल्यामुळे काही जलचर जखमी झालेत, मरण पावले आहेत…वाचून डोळ्यात टचकन पाणी येतं. हो ना? तेव्हा पटकन ‘स्वच्छता अभियान’ सुरू करा. किनाऱ्यावर जर कोणी कचरा, खास करून प्लास्टिकचा कचरा टाकला असेल तर त्यांना सौम्य भाषेत अर्थात गोड बोलून तो उचलायला सांगा. त्यांना समज द्या की प्लास्टिकचा कचरा जलचरांच्या पोटात गेला तर त्यांच्या जीवाला धोका असतो. तुम्ही ‘डिस्कवरी चॅनेल’ बघत असाल तर तुम्हाला हे माहिती असेलच. नसेल माहिती तर ‘डिस्कवरी चॅनेल’वर बघा. आता वेळ आली आहे कृती करण्याची. एक चांगली कृती तुमच्या गावाच्या, राज्याच्या, देशाच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. पण अशी अनेक पावलं तुम्हाला चालायची आहेत हे ध्यानात ठेवा.
तुम्हाला असं वाटू शकतं की, मीच का या अभियानात सहभागी व्हायचं? तर charity begins at home. सुरुवात ही नेहमी स्वतःपासूनच करावी लागते. Ok? मग करून बघा, तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. हा देण्याचा आनंद कधीही कमी न होणारा. बाकी तुम्ही वाचणारी मुलं हुशार आहातच. आता वळूया आजच्या रेसिपीकडे.
jyotikapile@gmail.com