अक्षररंग

बिया पेरणारे हात व्हा...

झाडं वाढली की जंगल परिसर वाढत राहील आणि… आणि बिबट्याला शहरात यायची गरजच भासणार नाही. माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोडीचे काम करत आहे. खरंतर माणसाला मेंदू आहे, पण तो त्याचा कमी वापर का करतो याची कल्पना नाही.

नवशक्ती Web Desk

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

Hi friends!

कसे आहात? मला खात्री आहे की तुम्ही वर्तमानपत्र वाचत असालच. त्यामुळे तुम्हाला आपल्या अवतीभवती काय काय चालू आहे हे नक्कीच माहिती असेल. आताशा काहीनाकाही कारणे झाडं तोडली जात आहेत आणि जंगल कमी होत आहे. बरोबर ना? पण तुम्ही झाड लावण्याचे किंवा बिया पेरण्याचे नेक काम करत रहा.

झाडं वाढली की जंगल परिसर वाढत राहील आणि… आणि बिबट्याला शहरात यायची गरजच भासणार नाही. माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोडीचे काम करत आहे. खरंतर माणसाला मेंदू आहे, पण तो त्याचा कमी वापर का करतो याची कल्पना नाही. कदाचित, विचार न करणारी माणसं पुस्तकं वाचत नसल्याची मला दाट शंका येते. बरोबर ना? थांबा, तुम्हाला एक कविता वाचायला देते. तिचं शीर्षक आहे ‘जंगल दंगल’

“प्राणी नि माणूस समोर पाहून

एकमेकांवर आले धावून

आमच्या हद्दीत आलात कसे

दोघांचेही प्रश्न एकमेका पुसे

दोघांमध्ये झाली भांडणे सुरू

घुसखोरी सारी आम्ही दूर करू

वाघ-सिंहाची मोठी डरकाळी

माणसांच्या हाती बंदुकीची नळी

प्राणी-माणसांत पेटली दंगल

मोठाले आवाज घाबरले जंगल

चिंतेत पडले सगळेच प्राणी

माणसांशी बोलणी करेल का कोणी ?

कामी आली मग कोल्ह्याची अक्कल

सशाला पाठवू, लढवली शक्कल

सशाच्या हातात खाजखुजली

माणसांच्या अंगाला हळूच चोळली

माणसे लागली खाजवाया अंग

बंदूक पळविण्या प्राणी झाले दंग

पेटलेली दंगल झाली बघा शांत

माणसे नि प्राणी झाले हो निवांत...”

आवडली ना कविता? बघा, प्राण्यांनी कशी शक्कल लढवली आणि माणसाला कशी अक्कल आली. ही छानशी कविता कोणी लिहिली माहिती आहे? व्यवसायाने इंजिनिअर असलेले लेखक शिवाजी चाळक यांनी ती लिहिली आहे. ते जुन्नरजवळ चाळकवाडी येथे राहतात आणि त्यांनी आपल्या नातवासाठी काही कविता केल्या. त्याचाच ‘जंगल दंगल’ हा बालकविता संग्रह होय. यातल्या कविता म्हणजे आजोबा आणि नातवाचा मनभावन संवाद आहे. खेडेगावात राहण्याचा एक फायदा हा आहे की, निसर्गासोबत प्राणी-पक्षी यांचे जीवन जवळून बघायला मिळतं आणि ते जीवन, ती अनुभूती काव्याचे रूप घेते. आपल्या नातवाला तसेच बालवाचकांना लेखकाने निसर्गाचे दालन उघडून दिलं आहे.

शिवाजी चाळक यांची आजवर बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली असून साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी विविध संस्था, साहित्य महोत्सव सुरू केले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ‘शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शाळा आणि वसतिगृह सुरू केलेले आहेत.

ज्ञानदानासारखे दुसरे मोठे दान नाही! शिवाय विविध प्रकारच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.

लेखक शिवाजी चाळक यांना वाटतं की, खेळल्याने किंबहुना मातीत खेळून मुलांची सर्जनशीलता वाढते. तर या पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या लेखिका, कवयित्री आसावरीताई काकडे म्हणतात की, “म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण! आजी-आजोबा झाल्यावर तर हे बालपण नातवंडांच्या रूपात साक्षात डोळ्यांसमोर बागडू लागतं. निवृत्त झाल्यावर मोकळीकही असते. नातवंडांशी खेळताना, त्यांच्या कुतूहलमिश्रित प्रश्नांना उत्तरं देताना, त्यांचे निरागस हावभाव निरखताना चाळकआजोबांची अनुभुती, त्यांचा आत्मीय आनंद या कवितेत उतरला आहे.

त्यांच्या ‘मासा’ या कवितेत ते लिहितात,

“इवलासा मासा, पोहतो कसा?

पाण्यामधला राजाच जसा!”

तर ‘गरीबाची गाय’ या कवितेत त्यांनी शेळीवर कविता लिहिली आहे.

“घरात सर्वांना आवडते शेळी

जरी आहे ती रंगाने काळी

तिला दोन पिल्ले बोकड,

पाठ उड्या मारत घेतात भेट

कोवळे झाड खुडते ती शेंडा

मागे शिल्लक ठेवते दांडा

तिला आवडतो बाभळीचा पाला

कशी नाही भीती काट्याची तिला?

तिच्याजवळ जाते लाडं लाडं आई

चोळून घेण्याची शेळीला घाई

तिला म्हणतात गरिबाची गाय

चवदार असते दूध आणि साय”

शेळी मुंबईला कमीच दिसते. पण कवीच्या कवितेमुळे शेळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. मोर, ससा, पाखरांची शाळा, जंगलसभा, शर्यत अशा वेगवेगळ्या विषयांवरील छान छान कविता आपलं मन जिंकून घेतील. यातली चित्रंही प्रदीप खेतमर यांनी मस्तच काढलेली आहेत.

ह्या कविता वाचून तुम्हाला तुमचे आजी-आजोबा आठवले असतील, हो ना? मग त्यांना यशोदीप पब्लिकेशन निर्मित, प्रकाशित ‘जंगल दंगल’ कवितासंग्रहाची ओळख वाचायला द्या. शिवाय आईबाबा, फ्रेंड्स ह्यांनाही दाखवा. अगदी प्रत्येकाला आवडतील अशा कविता आहेत ह्या पुस्तकात. चांगली पुस्तकं नेहमी शेअर करायला हवीत. कारण शेअरिंग is always केअरिंग!

बालसाहित्यिक व ललित लेखक

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात