निरोपाचे बफरिंग 
अक्षररंग

निरोपाचे बफरिंग

‘निरोप’ हा शब्द उच्चारला की मनाच्या एखाद्या कोपऱ्यात अलगद हळवी तार छेडली जाते. बाप्पांच्या विसर्जनाचा क्षणही असाच डोळ्यांत पाणी आणि ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा विश्वास ठेवून येणारा. कारण निरोप म्हणजे केवळ दूर जाणं नसतं; तो सोबत जगलेल्या क्षणांना आठवणींच्या कप्प्यात अलगद ठेवण्याचा क्षण असतो.

नवशक्ती Web Desk

विशेष

गीतेश गजानन शिंदे

‘निरोप’ हा शब्द उच्चारला की मनाच्या एखाद्या कोपऱ्यात अलगद हळवी तार छेडली जाते. बाप्पांच्या विसर्जनाचा क्षणही असाच डोळ्यांत पाणी आणि ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा विश्वास ठेवून येणारा. कारण निरोप म्हणजे केवळ दूर जाणं नसतं; तो सोबत जगलेल्या क्षणांना आठवणींच्या कप्प्यात अलगद ठेवण्याचा क्षण असतो.

गणपती बाप्पा आले आणि त्यासोबत रिल्सचा पाऊसही पडू लागला. तसंही अनेक इनफ्लून्सर्ससाठी सण-उत्सव म्हणजे आपले फॉलोअर्स आणि व्ह्यूज वाढवण्याची एक आयती संधीच असते. त्यामुळे गणपती येण्याआधीच कोणी विविध मूर्तीकारांकडे जाऊन नवीन आकार-उकारातले बाप्पा दाखवत होतं, तर कोणी आगमन सोहळा आपल्या मोबाईल अथवा प्रोफेशनल कॅमेऱ्यात टिपून गणेशोत्सवाची उत्सुकता वाढवत होतं. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे आणि मंडळाच्या तीव्र स्पर्धेपोटी काही बॅलन्सिंग मुर्त्यांचा तोल गेलाच. तसंही यंदा डीजेच्या दणदणात मिरवणूक निघणार की, विद्यानंदच्या प्रबोधनाचा आवाज सरस ठरणार अशीही एक उत्सुकता होती. तरीदेखील सर्वांच्या उत्साहानं डेसिबल मर्यादेचं उल्लंघन केलंच. पण त्यात आणखी भर पडली ती समाजमाध्यमांवरील रिळांच्या संख्येची. अचानक या ‘धरतीवरी, घरोघरी, रिळानंद झाला...’ की काय असं मला वाटू लागलं.

काही रिळांत नैवेद्यामधील, उकडीचे की तळणीचे मोदक सरस? असेही वाद चवीचवीनं रंगले. आणि बघता बघता अनंत चतुर्दशीचा दिवस कधी येऊन ठेपला हे कळलंच नाही. तशी या मधल्या दिवसांनी विसर्जनाची चाहूल लागलीच होती आणि मन निरोपाची तयारी करू लागलेलंच. या विसर्जनाच्या रिल्समध्येही कोणी ढोल ताशांच्या गजरात, तर कोणी गणपती बाप्पालाच आपल्या डोक्यावर घेऊन बॅलन्स करत नाचत होतं. कोणी रडत होतं, तर कोणी बाप्पांच्या कानात आपली इच्छा सांगताना भावुकही झालेलं दिसत होतं. एका रिलमध्ये तर एक बाप आपल्या तरुण मुलाच्या हाती गणपती सोपवत होता. नकळतपणे या परंपरा, संस्कृती आणि सगळं काही अपलोड करण्याच्या नादात आपल्या भावनांचं बफरिंग तर होत नाहीये ना असं कुठेतरी मला जाणवलं. त्यापेक्षा आठवणींच्या अल्बमसाठी तो पुरवून पुरवून वापरलेला ३६ फोटोंचा कोडॅकचा रोल मला जास्त जवळचा वाटतो. रिकाम्या मखराकडे आणि पाटाकडे पाहिलं तर तिथे बाप्पा नव्हते. पण मनात एक विश्वास होता की, निरोप घेताना बाप्पा कुठेच जात नाहीत; ते फक्त मूर्तीच्या रूपातून आठवणींच्या रूपात आपल्या मनाच्या मखरात येऊन विराजमान होतात.

तरीही निरोप हा शब्द कानावर पडला तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक हळवी तार छेडली जाते. हा तीन अक्षरी शब्द वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. तो आयुष्याच्या पुस्तकातील एका अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या नव्या कोऱ्या पानाची सुरुवात असतो.

आपण जन्माला आल्यापासूनच निरंतन निसटणाऱ्या या प्रवासात निरोपाचे कितीतरी प्रकार अनुभवत असतो. कधी आईचं बोट सोडून पहिल्यांदा शाळेच्या गेटमधून आत जाताना दिलेला बालपणीचा निरोप, तर कधी आयुष्याचे सुवर्णक्षण सोबत जगलेल्या मित्रांना शाळेच्या शेवटच्या दिवशी दिलेला अश्रूंचा निरोप. कॉलेजमधले ते खोडकर दिवस असो की कट्ट्यावरच्या गप्पा आणि शेवटी 'पुन्हा भेटू' असा दिलेला तो आवंढा गिळणारा निरोप... प्रत्येक निरोपाला एक वेगळीच किनार असते. जसं इतकी वर्षं आणाभाका घेत सोबत चालल्यावर अचानक तिची पत्रिका आपल्या हाती पडते किंवा फेसबुक प्रोफाइल लॉक होऊन डीपीवर तिच्या लग्नातला फोटो अपलोड होतो, तेव्हा डोळ्यांतील पाण्यानं नजर धूसर होते आणि मग आपसूकपणे

ओळी सुचतात-

'निरोपाच्या मजकूराने

नात्यालाही बसली खेच

डोळ्यांमधली नदी खारी

उंबर्‍यापाशी दुखरी ठेच...'

मात्र निरोप हा केवळ दोन व्यक्ती किंवा जागांमधील अंतराची खूण नसते, तर ती आठवणींच्या साठवणीची एक नवीन सुरुवात असते. जर निरोप घेताना डोळे साचले नाहीत, तर त्याच्या किंवा तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांची खोलीच फिकी वाटू लागते. त्यामुळेच बहुदा, निरोप घेताना लागणारा तो थोडासा चटकाच त्या माणसाचं, त्या जागेचं महत्त्व आपल्या आयुष्यात अधोरेखित करत असतो. लहानपणी मला वाटायचं की, निरोप देणं म्हणजे सर्वकाही संपणं. पण वयानुसार जसजशी समज वाढत गेली, तसतसं उमजलं की निरोप हा अंत नसून नव्या वाटचालीची नांदी असते. झाडावरून गळणारं पिवळं पानही झाडाला एकप्रकारे निरोपच देत असतं, पण ते गळाल्याशिवाय तिथे नवीन हिरवीगार पालवी फुटू शकत नाही. तसंच आयुष्यातही काही जुन्या गोष्टींना, टप्प्यांना किंवा अगदी काही आठवणींनासुद्धा निरोप द्यावाच लागतो, तेव्हाच नवीन अनुभवांना कवेत घेण्याची ताकद आपल्यात येते. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की,

'झडलेल्या पानातून

झाड चरित्र सांगते

निरोपाचे मजकूर

पैलतीरास सांगते'

पण सगळ्यात कठीण निरोप कोणता असेल, तर तो न सांगता घेतलेला निरोप. काही माणसं आपल्या आयुष्यातून अशी तडकाफडकी निघून जातात की, त्यांना शेवटचं एकदा मनापासून 'थँक्यू' किंवा 'बाय' म्हणायची संधीही मिळत नाही. अशा वेळी मनात राहिलेली ती अपूर्णता आयुष्यभर डाचत राहते. जसे माझे मावसाजी; अरविंद अचानक काका गेले ती बोच मला आजही सलते आहे. म्हणूनच वाटतं की, कुणाचा निरोप घेण्याची वेळ कधी येईल हे माहीत नसल्याने ज्या भावना व्यक्त करायच्या असतात त्यावेळीच त्या व्यक्त कराव्यात त्यात दिरंगाई नको.

परंतु निरोप या शब्दांत दुःखाचा सूर असला तरी त्यात एक आशेचा किरण लपलेला असतो. तो असतो पुन्हा भेटण्याचा, नव्या आठवणी रचण्याचा आणि जुन्या आठवणींचा दरवळ हृदयात जपून ठेवण्याचा.

शेवटी निरोप म्हणजे कायमचा प्रवास नव्हे, तर तो पुन्हा भेटण्याच्या आशेनं घेतलेला एक छोटासा विरामही असतो. मात्र प्रत्येक निरोपाचा रंग वेगळा, त्याचा स्वर वेगळा आणि त्याचा सलही वेगळाच! सांजवेळी जेव्हा सूर्य क्षितिजाआड जातो, तेव्हा तो अंधाराला बिलगताना आकाशात रंगांची उधळण करतो. तो निरोप दुःखद नसतो, तर ती उद्याच्या नव्या पहाटेची काव्यात्म अभिव्यक्ती असते. पावसाच्या थेंबांनी मातीचा निरोप घेताना तिच्यात सोडलेला तो गंधाळलेला सुवास, म्हणजेच निरोपाचं ते पत्र ज्यात पुढल्या भेटीचं आश्वासन असतं; जसा आपण प्रत्येक विसर्जनाच्या वेळी जयघोष करतो, 'पुढल्या वर्षी लवकर या!' अगदी तसंच...

geeteshshinde@gmail.com

लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत

लोकप्रतिनिधींच्या वेतनात ५० टक्के कपात करा! महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी

BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले

डिजिटल माध्यमातून सिनेमा पाठवला तरी तो सॉफ्टवेअर नाही! धर्मा प्रॉडक्शनला हायकोर्टाचा दिलासा

एसटीमध्ये NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच मिळणार

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही