गोव्याच्या अंतरंगातील लक्ष्मीआई 
अक्षररंग

गोव्याच्या अंतरंगातील लक्ष्मीआई

गौरी-गणपती सण जवळ आला की, मन गोव्याच्या नगरगावातील त्या अविस्मरणीय भटकंतीत रमून जातं. लक्ष्मीआई हरवळकर यांच्या फुगडी, धालो आणि लोकगीतांतून अनुभवलेला गोव्याचा अस्सल सांस्कृतिक वारसा आजही मनात दरवळतो.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

गौरी-गणपती सण जवळ आला की, मन गोव्याच्या नगरगावातील त्या अविस्मरणीय भटकंतीत रमून जातं. लक्ष्मीआई हरवळकर यांच्या फुगडी, धालो आणि लोकगीतांतून अनुभवलेला गोव्याचा अस्सल सांस्कृतिक वारसा आजही मनात दरवळतो.

गौरी-गणपतीचा सण जवळ आला की, माझं मन भुर्रकन उडून गोव्यातील नगरगावामध्ये जातं. तिथली गोव्याची सांस्कृतिक बाजू उलगडत केलेली भटकंती आठवत राहते. साधारण ३ ते ४ वर्षांपूर्वीची गोष्ट. गोव्याची अनवट भटकंती करायची आणि तिथले अस्सल पैलू पहायचे असं ठरवलं होतं. गोव्यात पर्यटकांना असे सुंदर अनुभव देणारी एक कंपनी आहे- Soul Travelling. गोव्यातील अनवट वाटांवर नेत; संस्कृती दाखवणाऱ्या त्यांच्या काही सुंदर टूर्स-ट्रेल्स आहेत. त्यातली त्यांची गोव्याचे लोककला प्रकार उलगडणारी ट्रेल अगदी अविस्मरणीय अशी होती.

सकाळी आम्ही बाइकवरून गार वारा झेलत सत्तरी तालुक्यात असणाऱ्या नगरगावाकडे जायला निघालो. नगरगाव हे गोव्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि भर जंगलात असणारं छोटेखानी सुंदर गाव आहे. भवताली जंगलाने वेढलेले डोंगर दिसतात. त्याच्या कुशीत पारंपरिक राहुट्या, घरं बांधली होती. अशाच एका घरात गोव्याची लोककला जपणारी तेजस्वी स्त्री राहते. आम्ही एका मोठ्या पारंपरिक घरात प्रवेश केला. घराच्या अंगणात नारळाच्या झावळ्याचा वापर करून मोठा असा मांडव बांधला होता. मोठं असं तुळशी वृंदावन खळ्यात होतं. कुंपणावर मोगरा, अबोली, जास्वंदी, सुवासिक फुलझाडं बहरली होती. शेणाने सारवलेल्या त्या खळ्यात त्यांचा सडा पडला होता. गोव्याची रोषणाई असलेली बाजू नेहमी प्रकाशात राहिली आहे; त्यामुळे मी जे गोव्याचं रूप पाहत होते त्यावर माझे डोळे पटकन विश्वास ठेवत नव्हते. पण गोव्याच्या अगदी अंतरंगात आलोय, अस्सल गोवा पाहतोय याची सुंदर जाणीव झाली. माझे डोळे तिथला निसर्ग टिपत होते, घरं पाहत होते. तिथलं वातावरण जितकं स्वतःमध्ये झिरपवता येईल तितकं मी झिरपवत होते. माझी नजर हे सारं टिपता टिपता घराच्या दाराकडे गेली. घरातून सत्तरी पार केलेली एक वृद्ध स्त्री झपझप पावलं टाकीत आली. त्यांनी सोन्यासारख्या पिवळ्याधम्म रंगाची नऊवारी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्या खणखणत होत्या. त्यांच्या लंबगोल सावळ्या चेहऱ्यावर रुपयाएवढं ठशीव कुंकू होते आणि केसाचा अंबाडा बांधून त्यावर शेवंतीच्या टपोऱ्या फुलांचा गजरा माळला होता. त्या गजऱ्यालाही मध्ये मध्ये गुलाब, केवडा लावून सुगंधित आणि सुशोभित केलं होतं. त्यांचं रूप पाहून साक्षात समोर लक्ष्मी उभी ठाकलीय असं वाटलं आणि त्यांचं नावही लक्ष्मी हरवळकर होतं. आमचं हळदकुंकू लावून स्वागत केलं. मायेने गालावर हात फिरवला आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मला माझ्या आजीची आठवण आली. त्यांच्या या प्रेमामुळे सगळे त्यांना लक्ष्मीआई अशी हाक मारतात.

लक्ष्मीआई गोव्यातील प्रसिद्ध लोककलावंत आहेत. गोव्यात खास करून चतुर्थीला सादर होणारे धालो, फुगडी असे लोककला प्रकार त्या सादर करतात. हे पारंपरिक कलाप्रकार त्यांनी अगदी मनापासून जपले आहेत. नगरगावामध्ये त्यांचा गट आहे जो हे कलाप्रकार सादर करतो. त्यांचे सादरीकरण बघण्यासाठी मी अगदी आतुर झाले होते.

लक्ष्मीआईंच्या घरी गोव्याचे पारंपरिक पदार्थ बनवण्याचा बेत ठरला. त्यांनी गोड पदार्थ ‘डोणे’ बनवण्यासाठी विळीवर खोबरं खवून त्यात गूळ आणि वेलची घालून सारण तयार केलं. त्यानंतर फणसाच्या पानांना काडी टोचून कोन तयार केले आणि त्यात तांदळाच्या उकडीचा पातळ थर लावून सारण भरलं. हे सर्व कोन पातोळी किंवा मोदकाप्रमाणे एका मोठ्या भांड्यात वाफवायला ठेवले. जेवणात गावठी भात, जायफळाचं व करमळाचं लोणचं आणि खतखतं या अप्रतिम पदार्थांची मेजवानी होती. शेवटी वाफवलेले, फणसाच्या पानाची चव उतरलेले त्रिकोणी आकाराचे गरम गरम ‘डोणे’ पानातून वेगळे करून खाल्ले; त्यांची चव आणि खाण्याची पद्धत खरोखरच अविस्मरणीय होती. जेवून झाल्यावर काही वेळ विश्रांती घेऊन लक्ष्मीआईंनी आम्हाला अंगणात बोलावलं. झिम्मा कसा खेळतो तसा फेर धरायला लावला. त्यासोबतीला त्या लोकगीतं म्हणू लागल्या. खेळता खेळता धालो, फुगडी प्रकाराची त्यांनी ओळख करवून दिली. नंतर आम्हाला खुर्च्यांवर बसवलं आणि त्यांच्या गटासोबत त्यांनी धालो, फुगडी सादर करायला सुरुवात केली. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा अवघड फुगड्या त्या घालत होत्या. जोरात गिरक्या घेत होत्या. सोबतीला त्या लोकगीतं, ओव्या म्हणायच्या तेव्हा त्यांचा आवाज अख्ख्या गावात घुमत असायचा. त्यांना लोककला सादर करताना पाहून त्यांचं वय खरंच सत्तरी पार आहे का, असा प्रश्न पडला. त्यांनी गायलेल्या ओव्या माझ्या अत्यंत आवडत्या आहेत. यातील अनेक लोकगीतं, ओव्या त्यांनी स्वतः रचल्या आहेत. त्याभोवती सादरीकरण त्यांनी गुंफलं आहे. त्यांच्या गाण्यातून गोव्याच्या मातीचा गंध येतो, माहेरवाशिणीची आर्तता येते, निसर्गवर्णन करणाऱ्या कोवळ्या मुलीचे अल्लड बोलही ऐकू येतात. हे लोककला प्रकार सादर करताना लक्ष्मीआईच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत असतं. लक्ष्मीआईचं वाक्य माझ्या मनात घर करून आहे- “मला फुगडी घालताना, ओव्या म्हणताना खूप आनंद मिळतो. हा आनंद मी वाटते. आपल्याला ज्यातून आनंद मिळतोय, तो आनंद सर्वांसोबत वाटायचा” आणि खरंच; आनंद वाटणारी माणसं कायम चिरतरुण राहतात.

या भटकंतीतून केवळ गोव्याची सांस्कृतिक बाजू बघितली नाही तर आपलं आवडतं काम सातत्याने करत राहण्याची, त्यातलं वेगळेपण जपत राहण्याची आणि मुख्य म्हणजे सर्वांसोबत कलेतील आनंद वाटत राहण्याची प्रेरणा मिळाली. अजूनही लक्ष्मीआईंचा तेजस्वी चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि त्यांच्या केसातील केवड्याचा गंध चटकन मनात दरवळून जातो.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

टॅक्सी, रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारने वर्षभराची मुदत दिल्याचे न्यायालयाचे मत

Mumbai : स्थानकांवर थुंकल्यास हजार रुपये दंड; न भरल्यास प्रवाशाला न्यायालयात उभे करणार

मुद्रांक कायद्यातील मुदतीबाबत तिढा; प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग

'समृद्धी' महामार्गावर दरोडा! गाडी थांबवून वकिलाला लुटले; कुटुंबाला मारहाण करत १८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून