टपल्या आणि ठोसे
दे.दे. ठोसेकर
सरकारी आदेशांमुळे सामान्यांच्या घरात उडालेला कौटुंबिक गृहकलह आणि नेत्यांच्या छुप्या मनसुब्यांवर फिरलेले पाणी यावर प्रकाश टाकणारा खुसखुशीत उपरोध.
बाबुराव भगवे कपाळावर हात मारत दिवाणखान्यात बसले होते. काटकसरीची पंचसूत्री ऐकल्यापासून त्यांच्या चौकोनी कुटुंबात वादाचा अश्वमेध चौखूर उधळला होता. नवी कोरी मोटार खरेदी करायची नाही अन् तीही वर्षभर! भगव्यांची पत्नी लालबुंद झाली होती.
स्वयंपाकघरातील भांडी आपटून आणि यूट्यूबवर जोरकस स्वरात गाणी वाजवून त्यांनी संपूर्ण घर डोक्यावर घेतले होते. भगव्यांचा सुपुत्र विदेश दौरा टाळण्याच्या निर्देशावरून पिसाटला होता. ज्युनियर भगव्याने थायलंडला जाऊन सर्वांगसुंदर मसाजच्या पाहिलेल्या गोड-गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. भगव्यांचे कन्यारत्न वर्षभर दागिने खरेदी करायचे नाही या कल्पनेनेच गोरीमोरी होऊन रुसली होती. नवे दागिने केले नाही तर आपलं लगीन यंदा व्हायचं नाही या कल्पनेने ती नुस्ती स्फुंदत होती. बाबुराव काकाजींचे खंदे समर्थक होते. मागील बारा वर्षे त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या आघाड्यांवर काकाजींची पाठराखण केली होती. एखादी काकाजींविरोधातील पोस्ट पाहताच बाबुराव झुरळ दिसताच झाडू हातात घेऊन त्याचा चेंदामेंदा करावा त्या त्वेषाने तुटून पडायचे. कुणी लॉजिकल युक्तिवाद करायला लागल्यावर फेक फॅक्टरीतील पोस्टचा रतीब घालून चर्चा हाणून पाडत होते. कुणी अंगावर आलाच तर त्याला शिंगावर घेण्याकरिता चाचा, बापू, नेताजी, सरदार वगैरे अनेक इतिहासपुरुषांना बाबुराव मोहरा बनवायचे. पण आज कुटुंबात झालेल्या 'मणिपूर'ने ते हबकले. काटकसरीच्या आदेशामुळे उठलेले कौटुंबिक वादळ शमवावे कसे या विवंचनेने त्यांच्या पोटात खड्डा पडला होता. भगव्यांच्या सौ. स्वयंपाकघरातून धावत बाहेर आल्या आणि म्हणाल्या की, माझा निर्णय पक्का झालाय. मी आजच सायंकाळी नव्या कारचे बुकिंग करणार म्हणजे करणार. जर कुणी या माझ्या निर्णयात खोडा घातला तर त्याचे अन्न-पाणी तोडून टाकणार. स्वयंपाकघरातून होर्मुझ खाडीचा प्रवाह वाहत असल्याचा भास बाबुरावांना झाला. भगव्यांच्या सौ. माघारी वळताच त्यांचा पुत्र लॅपटॉप घेऊन आला आणि थायलंडच्या विमानाची तिकिटे बुक झाल्याचे धमकीवजा स्वरात सांगून निघून गेला. बाबुरावांचा चेहरा ईडीचे अधिकारी छापा घालायला आल्यासारखा पडला. भगव्यांची सुपुत्री नट्टापट्टा करून तोंडावर दरवाजा आदळून निघून गेली. तीन-चार तास ती परतली नाही. नंतर तिचा व्हॉट्सअॅप मेसेज आला, मी कोपऱ्यावरच्या सोनाराच्या पोरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आता दररोज नवनवीन दागिने घालण्यापासून कुणी माय का लाल मला रोखू शकत नाही. सायंकाळी बाबुराव विमनस्क मनःस्थितीत गार्डनमध्ये पाय मोकळा करायला गेले. तेथे त्यांना भक्तानंद आंधळे भेटले. काकाजींच्या काटकसरीच्या पंचसूत्रीची भक्तानंदांनी तोंड फाटेस्तव स्तुती सुरू केली तेव्हा बाबुरावांच्या पोटात कालवाकालव सुरू झाली. बाबुराव घसा खाकरून म्हणाले की, भक्ता तू म्हणतोस ते मला पटतंय रे. पण सर्वसामान्यांना पटण्याकरिता जरा सबुरीने घ्यायला हवे होते. म्हणजे बघ एक लहान मुलगा दररोज चोरून गुळ खायचा. त्याला त्याची आई घेऊन तुकाराम महाराजांकडे गेली आणि त्या मुलाची सवय सांगितली. तुकाराम महाराज म्हणाले की, पंधरा दिवसांनंतर या मुलाला घेऊन ये.
मुलाच्या आईला आश्चर्य वाटले. पंधरा दिवसांनंतर गेल्यावर तुकाराम महाराजांनी त्या मुलाला सांगितले की, बाळा दररोज चोरून गुळ खात जाऊ नकोस. हेच तुम्ही पंधरा दिवसांपूर्वी का नाही सांगितले ? मुलाच्या आईने प्रश्न केला. महाराज म्हणाले की, गेले पंधरा दिवस मी स्वतः गुळ खाणे बंद केले. मग या मुलाला गुळ खाऊ नको हे सांगण्याचे नैतिक बळ मला प्राप्त झाले. भक्तानंद म्हणाला की, तुझा मुद्दा गैरलागू नाही. पण तुकाराम महाराज पुष्पक विमानातून सदेह वैकुंठाला गेले. तुझ्या-माझ्यासारख्या मर्त्य मानवाला हे शक्य आहे का? बाबुरावांनी मानेनं नकार भरला. मग काकाजी पण नॉन बायॉलॉजिकल आहेत हे विसरू नकोस. बाबुरावांच्या खांद्यावर थोपटत भक्तानंद निघून गेला. विदेश दौऱ्यावर निघालेले काकाजी विमानात बसताना बाबुराव टीव्हीवर पाहत होते...
किरटेंचा फस (फस) लेला विदेश दौरा
मंत्री मधुकरराव किरटे दोन्ही हात कमरेवर ठेवून विदेश दौऱ्याकरता नोकरांकरवी सुरू असलेले पॅकिंग बारकाईने पाहत होते. सध्याच्या महायुती-महाआघाडीच्या कोलाहलात मुळात तिकीट मिळणे कठीण. तिकीट मिळाले तर निवडून येण्याकरिता ६० ते ७० खोके खर्च करणे म्हणजे घामटं काढणारे. मग आमदार झाल्यावर मंत्रिपदाची दिल्लीत फिल्डिंग लावायची. म्हणजे परत 'मैं तो खाता हूं और खिलाता भी हूं' असा मामला. मंत्रिपद मिळाल्यावर मग मीटर सुरू... बदल्या, टेंडर, कॉन्ट्रॅक्ट, सेटिंग, हवाला, बेटिंग काही काही म्हणून सोडायचे नाही. एवढी यातायात केल्यावर मग थोडासा विरंगुळा म्हणून किरटेंनी एका अभ्यास दौऱ्याचा प्लान केला होता. मुळात किरटे यांच्या दौऱ्याचा मूळ हेतू अभ्यासबिभ्यास करणे हा नव्हताच. एका मैत्रिणीसोबत छान मौजमजा करण्याच्या गुप्त हेतूने त्यांनी नियोजन केले होते. मात्र 'गेंड्यांच्या शिंगाची चोरी रोखण्याकरिता एआयचा वापर' या विषयाचा अभ्यास करायला आपण जात असल्याची थाप किरटेंनी पत्रकारांना मारली होती. किरटेंची पत्नी मुलीचे बाळंतपण करायला अगोदरच अमेरिकेत गेली होती. त्यामुळे कुठे जाताय ? का जाताय ? कोण कोण बरोबर ? परत कधी येणार? मला काय आणणार? अशा असंख्य प्रश्नांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही या खुशीत किरटे होते. विमानतळावर जाण्याकरिता अवघे काही तास शिल्लक होते. मस् तयार होऊन किरटे बसले होते. विदेशातील त्या चिमुकल्या बेटावरील आलिशान बंगल्यात आपण आणि ती... किरटे मनात मांडे खात होते. तेवढ्यात किरटेंच्या फोनमध्ये व्हिडीओ कॉल सुरू झाला. साक्षात सौ. किरटे हसतमुखाने. तुमच्याकरिता एक सरप्राईज आहे... सौ. किरटे म्हणाल्या. अचानक बायकोने व्हिडीओ कॉल केल्याने किरटे मनातून नाराज झाले होते. पण नाराजी चेहऱ्यावर दिसू न देता म्हणाले की, सरप्राईज ? कसले सरप्राईज ? किरटेंच्या बायकोने मोबाईल कॅमेरा हळूच फिरवला तर समोर 'ती' जिच्यासोबत 'अमृतकालाची' स्वप्नं किरटेंनी मनात रंगवली होती. किरटेंनी आवंढा गिळला. ही माझी मैत्रीण तुम्ही चाललाय त्या कुठल्याशा देशातच चाललेय. जरा तिला तिकडं काही अडलं तर... तेवढ्यात धावत किरटेंचा पीए आला आणि त्यांच्या कानात कुजबुजला. काकाजींनी विदेश दौरे टाळण्याचा आदेश दिल्याचे समजताच किरटेंची संकटातून सुटका झाली. अग मीच दौरा रद्द करतोय. तसे आदेश झालेत ना ! पलीकडे सौ. किरटे आणि तिचा खळखळून हसण्याचा आवाज येत असतानाच किरटेंनी फोन बंद केला. किरटेंच्या या फजितीची हकिकत बाबुरावांना भक्तानंदाने सांगितली आणि म्हणाले की, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.
एका पुरुषा दोघी नारी। पाप वसे त्याचे घरीं।।
असत्य जे वाणी। तेथे पापाचीच खाणी।।
तुका म्हणे खळा। त्यासी नरक हा जिव्हाळा ।।
कळवळे आणि इलेक्ट्रिक मोटार
किरटेंनी काकाजींच्या आदेशावरून विदेश दौरा रद्द केल्याचे द्विट केले. शिवाय पत्रकारांना बोलावून बाईट दिला. काकाजींच्या आदेशाचे पालन करणारा मी पहिलाच असा डिंगोरा पिटला. यामुळे मंत्री दिवाकर कळवळे खट्ट झाले. त्यांनी आपल्या पीएला बोलावून आपणही काही काटकसरीचा बवाल करायला हवा, असा धोशा लावला. पीए म्हणाला की, साहेब, तुम्ही चिंता करू नका. मी सगळा बंदोबस्त करतो. दोनेक तासात चार-पाच महागड्या इलेक्ट्रिक मोटारींचा ताफा कळवळे यांच्या बंगल्याच्या दारात येऊन उभा राहिला. 'आता यापुढे नाही पेट्रोल, नाही डिझेल केवळ ईव्ही', असे द्विट कळवळे यांच्या द्विटर अकाऊंटवरून केले गेले. लागलीच मीडियाने ब्रेकिंग न्यूज चालवली. कळवळे खूश झाले. आपल्या ८६ इंच पोटावर हात फिरवत गदागदा हसले. तेवढ्यात न्यूज अँकर किंचाळली. आणखी एक ब्रेकिंग न्यूज... माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि व्हिसल ब्लोअर मंजिरीताई तुमानिया यांनी कळवळे यांच्या नव्या ईव्ही मोटारींवर सवाल केलेत. याकरिता कळवळे यांनी एवढा पैसा कुठून आणला? अलीकडेच त्यांनी एका इलेक्ट्रिक मोटार कंपनीला नाममात्र दरात जमीन दिली त्या बदल्यात या मोटारी त्यांना मिळाल्यात का ? तुमानिया ताईंनी आपली तुमान उतरवल्याचा भास कळवळे यांना झाला आणि ते कळवळले. त्यांनी सणसणीत शिवी हासडत पीएला हाक मारली... ही बातमी टीव्हीवर पाहून बाबुराव मनाशीच म्हणाले की, जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी हे तुकाराम महाराज सांगून गेलेत तेच खरे!