माटवी : कोकणच्या निर्सगाशी जुळलेली नाळ 
अक्षररंग

माटवी : कोकणच्या निर्सगाशी जुळलेली नाळ

गणपतीच्या आगमनासोबत तळकोकणात निसर्गही देव्हाऱ्यात विराजमान होतो. रानफुलं, रानफळं, वेली, औषधी वनस्पती आणि पत्रींनी सजलेली ‘माटवी’ ही केवळ गणपतीची आरास नसून कोकणच्या समृद्ध निसर्गसंस्कृतीची आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या पारंपरिक ज्ञानाची साक्ष आहे.

नवशक्ती Web Desk

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

गणपतीच्या आगमनासोबत तळकोकणात निसर्गही देव्हाऱ्यात विराजमान होतो. रानफुलं, रानफळं, वेली, औषधी वनस्पती आणि पत्रींनी सजलेली ‘माटवी’ ही केवळ गणपतीची आरास नसून कोकणच्या समृद्ध निसर्गसंस्कृतीची आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या पारंपरिक ज्ञानाची साक्ष आहे.

तळकोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक सण नाही. तो आहे निसर्गाचा उत्सव. भाद्रपदात निसर्ग जेव्हा आपल्या समृद्धीच्या शिखरावर असतो, तेव्हा सृष्टीतील या सुंदरतेचे आणि संपदेचे आभार मानण्यासाठी तळकोकणात एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पाळली जाते, ती म्हणजे ‘गणपतीची माटवी’. काहीजण तिला ‘माटी’ म्हणतात, तर काही ‘माटयी’. गोव्यात तिला ‘माटोळी’ म्हणतात. रानफुलांनी-फळांनी ही माटयी सजवताना, लहानपणी आम्हा पोरांच्या आनंदाला उधाण यायचं. माझ्या एका माटवीवरच्या मालवणी गाण्यात म्हटलेलंच आहे :

फळा-फुलांनी कोकण सजलो

माटयेत आमी निसर्ग पुजलो

चारय बाजूंनी केसरा लावली

गणेशाच्या माथ्यार माटयेची सावली

कुडाच्या शेंगानी घराची शुद्धी

कांगला, हरणा, कवंडाळा आदी

सुवासिक केवडो आणि सोनटक्को

निरगुडी बांदा, कडुनिंब पक्को

अवषधी सगळे माटयेत एकठय

गणपती बाप्पा मोरया जय जय!

श्रीगणेशाच्या मूर्तीवर छतासारखा एक लाकडी किंवा बांबूचा सांगाडा टांगला जातो, त्याला ‘माटवी’ म्हणतात. या माटवीला कोकणातील रानभाज्या, जंगली फळं, फुलं, औषधी वनस्पती आणि रानवेली बांधून ती सजवली जाते. दिसायला अत्यंत नयनमनोहर असणारी ही माटवी केवळ सजावट नाही. ती निसर्गातील दुर्मिळ औषधी वनस्पतींची आणि जैवविविधतेची चालती-फिरती शाळा आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील जंगलं, रानं-वनं वेगवेगळ्या फळांनी आणि फुलांनी बहरलेली असतात. माटवी बांधण्यासाठी ऋतूंनुसार उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. यात प्रामुख्यानं रानफळ, रानफुलं, वेली आणि वनस्पतींची पानं (पत्री) यांचा समावेश असतो. माटवी सजवताना किमान ५० ते १०० प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती गोळा करून त्या विशिष्ट पद्धतीनं बांधल्या जातात. माटवीवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला एक विशिष्ट धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व आहे. यातील बहुतेक वनस्पती या आयुर्वेदाच्या दृष्टीनं अत्यंत गुणकारी मानल्या गेल्या आहेत.

माटवीला सर्वांत आधी मध्यभागी बांधला जातो आंब्याचा टाळ म्हणजे आंब्याची डहाळी. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आंब्याच्या डहाळीनं करण्याची कोकणात पद्धतच आहे. आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस दमा, घशाचा संसर्ग आणि पोटदुखीवर उपयुक्त मानला जातो. तसंच आंब्याच्या मोहराचा लेप त्वचेच्या विकारांवर (उदा. एक्जिमा) गुणकारी ठरतो. आंब्याच्या सालीचा काढा करून गुळण्या केल्यास तोंड येणं कमी होतं. अंगावर पांढरे जाणे किंवा रक्तस्राव यांसारख्या स्त्रियांच्या आजारांमध्ये सालीचा काढा उपयुक्त मानला जातो. माटवीला टांगली जाणारी कांगणं आणि कवंडाळं ही रानफळं पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. करांदे आणि माटकुळ या रानकंदांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि खनिजं असतात. हे कंद शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि ताकद वाढवण्यास मदत करतात. माटवीला कवठ आणि आवळेही बांधतात. कवठ हे पित्तशामक असून पोटाच्या विकारांवर उत्तम औषध आहे. आवळा हा त्रिदोषनाशक (वात, पित्त, कफ दूर करणारा) आणि व्हिटामिन-सी चा उत्तम स्रोत मानला जातो.

बोंडारा आणि ताडगोळे हे शरीराला थंड ठेवतात आणि उन्हाळ्याचा किंवा दमट हवामानाचा त्रास कमी करतात. त्वचाविकारांवर आणि सूज कमी करण्यासाठी जिचा वापर केला जातो ती नागली माटवीसाठी लागतेच.

माटवीला गोकर्णाची फुलं शोभून दिसतात. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं माटवीचं सौंदर्य वाढवतात. आयुर्वेदात गोकर्ण हे बुद्धिवर्धक (स्मरणशक्ती वाढवणारं) आणि चिंता-ताणतणाव कमी करणारं मानलं गेलं आहे. गणेशोत्सवात तेरड्याच्या फुलांना विशेष स्थान असतं. त्वचाविकार, पायांची जळजळ आणि सूज यावर तेरडा गुणकारी आहे. सोनचाफा आणि केवडा या फुलांचा सुगंध वातावरण शुद्ध करतो. केवड्याचा वापर मानसिक शांततेसाठी आणि डोकेदुखी थांबवण्यासाठी केला जातो. काही जणांकडे माटवीवर त्रिफळा वेली सोडल्या जातात. जंतुनाशक आणि मुखरोगांवर (दात व हिरड्यांच्या समस्या) अत्यंत उपयुक्त त्रिफळा अत्यंत उपयुक्त असतात.

माटवीला आणि गणपतीच्या पूजेत २१ प्रकारच्या पत्री (पाने) वापरल्या जातात. या प्रत्येक पत्रीमध्ये औषधी गुणधर्म असतात :

दुर्वा : दुर्वा ही अत्यंत थंड गुणाची असते. शरीरातील दाह (उष्णता), त्वचेचे विकार आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी दुर्वांचा रस वापरला जातो.

बेलपत्र : डायबिटीस (मधुमेह) नियंत्रण, पचनक्रिया सुधारणं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी बेलपत्र उत्तम औषध आहे.

अर्जुनाची पाने : अर्जुनाची साल आणि पानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाला बळ देण्यासाठी वापरली जातात.

धोत्र्याची पाने : सांधेदुखी आणि सूज असलेल्या जागेवर शेक देण्यासाठी या पानांचा वापर केला जातो.

तुळस : संसर्गजन्य आजार, सर्दी, खोकला आणि विषमज्वरावर तुळस उत्तम नैसर्गिक प्रतिजैविकाचं (Antibiotic) काम करते.

माका (भृंगराज) : केसांच्या आरोग्यासाठी, यकृत सक्षम करण्यासाठी आणि दृष्टी सुधारासाठी माका प्रसिद्ध आहे.

माटवीचं पर्यावरणीय महत्त्व मोठं आहे. तिला बांधलेल्या वनस्पतींमुळे वातावरण शुद्धी होते. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात हवेत सूक्ष्म जंतू आणि आर्द्रता जास्त असते. माटवीवर टांगलेल्या ताज्या वनस्पती, फुलं आणि पानांमधून सुटणारा नैसर्गिक सुवास आणि उरणारं बाष्प घरातील वातावरण जंतूमुक्त आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करतं. माटवीमुळे पारंपरिक ज्ञानाची जपणूक होते. माटवीच्या निमित्तानं घरातील नवी पिढी जंगलात जाते, विविध वनस्पती ओळखायला शिकते आणि त्यांचं नाव व उपयोग समजून घेते. यामुळे शतकानुशतके चालत आलेलं आयुर्वेदाचं पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतं.

माटवी उतरवल्यानंतर त्यातील अनेक रानफळं, कंद आणि भाज्या खाण्यासाठी वापरल्या जातात. पावसाळ्यानंतर येणाऱ्या आजारांपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी हे रानपदार्थ नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात.

कोकणातील गणपतीची माटवी म्हणजे केवळ एक कलाकुसर किंवा धार्मिक विधी नसून तो मानवाचा निसर्गाशी असलेला कृतज्ञतापूर्वक संवाद आहे. निसर्गातील प्रत्येक वनस्पती ही माणसाच्या आरोग्यासाठी वरदान आहे, हा संदेश माटवीच्या माध्यमातून दिला जातो. आधुनिक काळात जेव्हा आपण निसर्गापासून दूर जात आहोत, तेव्हा कोकणातील ही माटवीची परंपरा आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या आणि आयुर्वेदाच्या जवळ आणण्याचं महान कार्य करते.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

Mumbai : रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक संशयित अटकेत

कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

आठव्या आशियाई विजेतेपदाचे लक्ष्य! महिलांच्या टी-२० आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि श्रीलंका भिडणार