कोकणातील नवरात्रोत्सव 
अक्षररंग

कोकणातील नवरात्रोत्सव

भाताच्या पिवळ्याधम्मक लोंब्या, नवधान्यांची रुजवण, महालक्ष्मीचे पूजन आणि गावोगावी निघणाऱ्या देवतांच्या तरंगकाठ्या... कोकणातील नवरात्र म्हणजे केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नाही, तर कृषिसंस्कृती आणि लोकपरंपरांचा अनोखा आविष्कार आहे. शेतातील समृद्धीची आस, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या श्रद्धा यांची गुंफण या उत्सवात पाहायला मिळते.

नवशक्ती Web Desk

मुलखातले गजाली

डॉ. महेश केळुसकर

भाताच्या पिवळ्याधम्मक लोंब्या, नवधान्यांची रुजवण, महालक्ष्मीचे पूजन आणि गावोगावी निघणाऱ्या देवतांच्या तरंगकाठ्या... कोकणातील नवरात्र म्हणजे केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नाही, तर कृषिसंस्कृती आणि लोकपरंपरांचा अनोखा आविष्कार आहे. शेतातील समृद्धीची आस, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या श्रद्धा यांची गुंफण या उत्सवात पाहायला मिळते.

देवाजीने करुणा केली.. भाते पिकून पिवळी झाली...’ अशी एक कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती. दुष्काळाचा फार मोठा परिणाम झाला नाही, तर यंदाच्या वर्षी तळकोकणातली भातशेती चांगलं पीक देईल, असा अंदाज आहे. आता अश्विन महिन्यात आपण गावाकडं गेलो, तर भाताच्या लोंब्यांनी भरघोस झालेलं, पिवळ्या धम्मक समृद्धीची चाहूल लागलेला कोकण आपल्याला दिसेल. आणि म्हणूनच आज घटस्थापनेच्या दिवशी कोकणातले शेतकरी तसे आशावादी आहेत. त्या देवाजबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून कोकणात प्रतिकात्मकरीत्या नऊ प्रकारची धान्ये रुजवली जातात.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी (प्रतिपदेला) घराघरांमध्ये आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाती. या दिवशी 'पात्र भरणे' किंवा 'टोपलीत पेरणी करणे' ही कोकणातली कृषी-सांस्कृतिक परंपरा आहे. एका गोल मातीच्या पात्रात किंवा बांबूच्या टोपलीत (ज्याला कोकणात 'खांप' किंवा 'पात्र' म्हणतात) काळी माती आणि वाळू पसरवली जाते. यात प्रामुख्याने गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका, मूग, उडीद आणि तीळ अशी सात किंवा नऊ प्रकारची धान्ये पेरली जातात. या पेरलेल्या मातीच्या मध्यभागी पाण्याचा तांब्या (कलश) ठेवून त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवून देवीचे आवाहन केले जाते. गौरी-गणपतीची रुजवण अंधारात आणि हळदीचे पाणी घालून केली जाते, ज्यामुळे ती पिवळीधमक येते. परंतु, नवरात्रातील 'रुजवण' ही घटाशेजारी उघड्यावर वाढवली जाती. तिला दररोज पाणी घातले जाते, त्यामुळे नऊ दिवसांत ती अतिशय हिरवीगार, कोवळी आणि उंच बहरून येते. नऊ दिवस देवीच्या पूजेसोबत या धान्यांचीही काळजी घेतली जाते. दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला या रुजवणीचे (अंकुरांचे) विशेष पूजन केले जाते.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये महालक्ष्मीचे व्रत नवरात्रात केले जाते. घरातील आयाबाया लख्ख तांब्याच्या तीन तपेल्यांच्या उतरंडीला भरजरी साडी नेसवतात आणि अलंकार घालून सजवतात. पांढऱ्या तांदळाची उकड काढून देवीचा मुखवटा केला जातो. मुखवटा उतरंडीवर बसवण्याचा विधी गुप्त रीतीने आणि सोवळ्यात केला जातो. मणी-मंगळसूत्रादी अलंकारांनी ती महालक्ष्मी नटते, जणू भूमीवर अवतरल्याची खूण पटते. कोकणातील मुख्य अन्न असलेल्या तांदळापासूनच ती घडते; अन्नब्रह्म-परब्रह्माची केलेली ती पूजा असते. तसेच, देह मातीचा, म्हणून मातीच्या मडक्यात 'सोऽहम'ची फुंकर घालून घागर नाचवली जाती, ते आत्मरूप जागवावे म्हणून.

ठाकर जमातीत रुजवण वाहून दसऱ्याला अवजारांची पूजा करतात. रवळनाथाच्या देवळात जाऊन 'सोनं' लुटतात. वारली, मल्हार कोळी, कोकणा आदी आदिवासी जमातींमध्ये 'कणसरी माते'ची पूजा केली जाते. ही पिकांची देवता मानली जाती. वारली, मल्हार कोळी यांच्यात 'देवरुखे' नावाचा विधी केला जातो. तांदळाच्या पिठाने चौक काढून अनेक पाकळ्यांचे फूल काढले जाते. सर्वात वरच्या पाकळीमध्ये कुंकू भरतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारची झाडाची फांदी आणि अंडे सुपात ठेवून सूप चौकात ठेवतात. ही 'कणसरी पूजा' असते. अंड्यातील बलक हेच देवतेचे प्रतीक मानले जाते. या देवीला कोंबड्या-बकऱ्याचा नैवेद्य लागतो आणि हे सगळे विधी भगत करतो. कोकणातील डहाणू, जव्हार या भागातील डोंगरकोळी अनेक पाड्यांमध्ये राहतात. त्यांच्या देवीचे पारंपरिक पुजारी 'भोपे' म्हणून ओळखले जातात. मुसणेश्वराच्या डोंगरगुहेतली देवी ही यांची कुलदेवता मानली जाते. तांदळाच्या स्वरूपातील या देवीला 'महालक्ष्मी' हे अभिधान प्राप्त झाले आहे. हिची नवरात्रात पूजा होते. ठाणे जिल्ह्यातील वारली, कोकणा जमाती अश्विन महिन्यात नवरात्राच्या काळात समृद्धी नृत्ये करतात. 'मांदळ' (मायंदाळ - भरपूर) नृत्य हे मांदळ नावाच्या ढोलकीच्या तालावर केले जाते.

तळकोकणात अनेक गावकर कुटुंबांची तुळजाभवानी ही कुलदेवता आहे. ही घराणी दर तीन वर्षांनी तुळजाभवानीचा गोंधळ घालतात. खळं सारवून स्वच्छ करतात. गोधडी अंथरून तिच्यावर हिरवा खण, पाच शेर तांदूळ, नागवेलीची पाने, पाच फळे मांडून मध्यभागी तांब्याचा कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवतात. गोधडीच्या चार कोपऱ्यात उसाची चार ताटं उभी करतात. पदे म्हणत देवतेला गोंधळी आवाहन करतो. त्याच्या अंगात यजमानाच्या देवीचे वारं येते, असे मानले जाते. यानंतर वडेसागोतीचे गावजेवण घातले जाते. कोकणातील क्षत्रिय कुळातील घराणी शस्त्रपूजनाने खंडेनवमी साजरी करतात. तर दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबातील स्त्रिया तीन वेळा नैवेद्य करतात.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव कोकणात अनेक प्रकारांनी साजरा होतो, तसाच दसराही! दसऱ्याच्या दिवशी देवदेवता, इष्ट-आप्त यांना आपट्याची पाने 'सोनं' म्हणून दिली जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दसरा वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. मालवणी मुलखातल्या विविध देवस्थानांतून तरंग-काठ्यांची विजयमिरवणूक निघते. 'तरंग' म्हणजे स्थानिक देवतांचे प्रतीक रूप. दसऱ्याच्या आधल्या दिवशी तरंग सजतात. पाच-सहा फुटी सागवानी गुळगुळीत सोट्याच्या टोकाला त्या त्या देवतेचे (रवळनाथ, भूतनाथ, सातेरी, पावणाई, माऊली इत्यादी) प्रतीक म्हणून मुखवटा, हाताचा पंजा, कलश बसवले जातात. ही प्रतीके लाकूड, पितळ, चांदी, सोने यांची असतात.

दसऱ्याच्या सुमारास ढोलावर काठी पडली की तरंग-काठ्यांची परंपरागत मिरवणूक निघते. गावगाड्यातील सर्व देवतांना भेटी दिल्या जातात. श्री रवळनाथ आणि श्री पावणाई यांच्या तरंगांचे लग्न आपटा-कदंब या वृक्षाखाली लागते. याला 'शिवलग्न' म्हणतात. यानंतर त्या त्या देवतेचे 'वारं' तरंग घेतलेल्या मानकरी वर्गात येते, असे मानले जाते. त्याला 'अवसार येणे' असे म्हणतात. संचार झालेली काठी लयीत पुढे-मागे सुरेख हालचाल करते, म्हणूनच कदाचित त्याला 'तरंग' म्हणत असावेत. सामूहिकरीत्या साजरा होणारा हा तरंगोत्सव गोमंतकीय संस्कृतीशी साधर्म्य दर्शवतो. हा उत्सव काही गावांत कोजागरीपर्यंत त्या त्या गावच्या प्रथेप्रमाणे साजरा केला जातो.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!