झऱ्यांचं गाव असणिये 
अक्षररंग

झऱ्यांचं गाव असणिये

निसर्गाचे बदलणारे सोहळे पाहण्यासाठीही खास भटकंती करावी लागते. उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे होणारा सृष्टीचा प्रवास आणि तिथलं समृद्ध गावजीवन यांचा हा एक सुंदर अनुभव...

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

निसर्गाचे बदलणारे सोहळे पाहण्यासाठीही खास भटकंती करावी लागते. उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे होणारा सृष्टीचा प्रवास आणि तिथलं समृद्ध गावजीवन यांचा हा एक सुंदर अनुभव...

संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने होरपळत, पावसाच्या एका थेंबासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता; अगदी त्याचवेळी मी निसर्गाच्या एका अशा गुप्त कोपऱ्यात होते जिथे ऋतू बदलाचा सोहळा सुरू होता. 7 जूनला बाकी महाराष्ट्रात पावसाचा थेंबही नव्हता तेव्हा मी कोकणातल्या एका नितांत सुंदर गावामध्ये पावसात मनसोक्त भिजत होते. हिरव्यागार घनदाट वनराईची सोबत लाभलेलं, पाण्याने संपन्न आणि डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे टुमदार गाव आहे असणिये. दोडामार्ग आणि सावंतवाडी नजीक हे गाव आहे.

यावेळी भटकंती करण्याचा उद्देश हा होता की, उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे होणारा ऋतुपालट पाहणं. आणि ही गंमत मी या गावात भटकंती करताना पाहिली. असणिये गाव बघण्यासाठी मी त्याच्या जवळ असणाऱ्या झोळंबे गावातल्या फार्मस्टेमध्ये मुक्काम केला होता. तिथे मला पावसापूर्वीची पारंपरिक पद्धतीने केली जाणारी तयारी बघता आली. ऋतुपालट अनुभवत, त्याभोवती असणारं गावचं जीवन पाहत माझी अनुभवसंपन्न भटकंती सुरू होती. फार्मस्टेच्या समोरच माड बागायती होती. तिथे बाग झाकणी सुरू होती. बाग झाकणी म्हणजे काय ? तर माड सुपारीच्या बागेत उतरणीवर टप्पे केलेले असतात. हे टप्पे दगड आणि मातीचे असतात. त्यांना माग म्हणतात. उन्हाळ्यात सुपारी माडाच्या झावळ्या पडतात, त्या उचलून या मागावर झाकल्या जातात, जेणेकरून या मागांची माती वाहून जाणार नाही आणि ते झिजणार नाहीत. तर असं हे झावळी उचलून मागावर घालण्याचं, बाग झाकण्याचं काम त्या हिरव्यागार माड सुपारीच्या बागेत सुरू होतं. यालाच बाग झाकणी म्हणतात. मी सुद्धा या बाग झाकणीत सहभागी झाले होते. अजून एक काम तिथे सुरू होतं झडी बांधण्याचं. हा फार्मस्टे पूर्णपणे मातीमध्ये बांधला आहे. पावसाचे पाणी कौलावरून थेट भिंतीच्या जवळ पडते आणि त्याने ओल येते. त्यासाठी कौलांच्या पुढे दोन हात लांब झडी बांधली जाते. म्हणजे पाणी भिंतीपासून लांब पडते. इथे झडी बांधायला प्लास्टिकच्या ताडपत्रीचा वापर केला नव्हता तर नैसर्गीक गोष्टी वापरल्या होत्या. बांबू आणि काथ्या वापरून कौलांच्या पुढे झडीसाठी सांगाडा तयार केला. त्यावर विणलेली झावळी लावली. या पारंपरिक पद्धतीला झडी बांधणं असं म्हणतात.

मी हे झडी बांधणं बघतच होते तोच आकाशात ढगांची दाटी झाली, गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पाहते तर झडीमुळे पावसाचं पाणी भिंतीपासून बरंच लांब पडत होतं. बागेत मागावरून पाणी छान वाहत होतं. तिथे असणारा झरा मंदावला होता, त्याची खळखळ ऐकू येऊ लागली होती. हा पाऊस चांगला सात-आठ तास सुरू होता. सारा परिसर ओलवून टाकला होता. अंगणात असणाऱ्या झाडावर पक्षी आले होते. साऱ्यांनाच हा पाऊस दिलासा देणारा होता. उन्हाळ्यामुळे आलेलं मरगळलेपण दूर झालं होतं. ओलीचिंब झालेली सृष्टी पाहून मलाही पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही. मनसोक्त भिजले.

दुसऱ्या दिवशी असणिये गावाकडे जायला निघाले. डोंगरांच्या अगदी पायथ्याशी हे गाव आहे. जाताना वाटेत एक छोटासा पूल दिसला. या पुलाच्या खालून झऱ्याचं पाणी खळखळ करत वाहत होते. झऱ्याच्या काठी मोठी पाणथळीसारखी जागा होती. अगदी हिरवंगार मैदान वाटावं असंच होतं. या पाणथळीत अगदी मे महिन्यातही पाणी असतं. तिथल्या डबक्यात म्हशी अगदी मस्त डुंबत होत्या. बगळ्यांचे थवे इकडे तिकडे फिरत होते, उडत होते. अगदी डोळे सुखावणारं दृश्य होतं. पुलावर रेंगाळून पुढे असणिये गावात प्रवेश केला. या गावाची खास गोष्ट म्हणजे इथे इतके झरे आहेत की विहिरींची गरजच भासत नाही. ८० पेक्षा जास्त बारामाही वाहणारे झरे या गावात आहेत. गावात पुष्कळ माड सुपारीच्या बागा आहेत. हे झरे केवळ गावाची तहानच भागवत नाहीत तर या माड सुपारीला ओलावा देत गावात आर्थिक सुबत्ता आणत आहेत. तिथे एका स्थानिकांच्या कुळागरात गेले. तिथल्या झऱ्यावर मातीची तळी बांधली होती. पाट काढून हे पाणी झाडांपर्यंत पोहोचवल जातं होतं. असं पाणी इथे साठवलंही जातं. कुळागरात एका बाजूला सुपारी काढण्याचं काम सुरू होतं. तर दुसऱ्या बाजूला घरी सुकवलेल्या सुपारी सोलायचं काम सुरू होतं. तिथल्या आजोबांनी याच कुळागरात वाढलेली केळी खायला दिली. सेंद्रिय पद्धतीने वाढलेली, घडावर पिकलेली केळी अगदी गोड होती. केळीची चव इतकी अप्रतिम होती की, शहरात येणारी लांबुडकी केळी बेचव लागतील. ही केळी लोखंडी जातीची आहेत असं समजलं. गोव्यात यांना सालगर्द म्हणतात अशी माहिती मिळाली. आजोबांचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला.

आजोबांच्या कुळागराबाजूलाच दुर्मिळ अशी काविकला असणारे श्री माऊली देवीचं मंदिर आहे. काविकला म्हणजे काव या विशिष्ट प्रकारच्या मातीच्या रंगापासून साकारलेली कला. हा मातकट रंग तयार व्हायचा काव, चुना आणि आंबवलेला गूळ यांच्या कुजलेल्या मिश्रणातून. मंदिराच्या पांढऱ्या रंगाच्या भिंती, त्यावर मातकट रंगात साकारलेली आपल्या पुराणकथांमधील चित्रं याने हे टुमदार कौलारू मंदिर हिरव्यागार वनराईच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर दिसत होतं. मंदिरातील वातावरणही अगदी शांत शीतल आहे. गाभाऱ्यात माऊली देवी विराजमान होती. तिचं मनोभावे दर्शन घेतलं. गाभाऱ्यातल्या पांढऱ्या भिंतीवर मातकट रंगाच्या काविकलेतून दशावतार, पुराणकथेतील प्रसंग साकारले होते. गणपती, देवीचं चित्रही होते. मंदिराच्या बाह्यभिंतीवरही रामायणातील सीताहरण, ताटका वनातील ताटका राक्षसिणीचा वध असे प्रसंग साकारले होते. गजलक्ष्मीचं चित्रही होतं. ही सगळी चित्र पाहताना आपल्या पुराणकथांचं महाकाव्यांचं स्मरण होत राहतं.

खरंच निसर्ग कोंदणात असणारं हे असणिये गाव म्हणजे संस्कृती, निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असणारं स्थळ आहे. मी जेव्हा या गावात होते तेव्हा बाकी ठिकाणी पाण्याची टंचाई होती. त्यामुळे पाण्याने संपन्न असं हे गाव मला खऱ्या अर्थाने श्रीमंत वाटलं.

दरवेळी मी अशी अनवट वाटेवरची भटकंती करते. वेगवेगळी गावं पाहते. तिथल्या जीवनशैलीचा काही काळ का होईना पण भाग बनण्याचा प्रयत्न करते. पण या भटकंतीपासून मी ठरवलं की ऋतूंचे सोहळे बघण्यासाठीही खास भटकंती करायला हवी.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला

भिवंडीत भीषण अग्नितांडव! मुंबई-नाशिक महामार्गावरील टायर व लाकडी पॅलेटच्या गोदामाला आग, Video

Mumbai : सात टक्के पाणी शिल्लक; धरणातील पाणीसाठा तळ गाठतोय; पावसाची ओढ कायम

रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : 'जे. जे.'ची स्थिती पाहता पालिकेने सावध होण्याची गरज; पालिका विरोधी पक्षनेत्यांची सूचना