'एआय'ने संपादित केलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

महाराष्ट्राची वन्य मानचिन्हे

महाराष्ट्राचा निसर्ग खूप सुंदर आणि रंगीबेरंगी आहे, ज्यात अनेक प्राणी, पक्षी आणि झाडांचा खजिना दडलेला आहे. चला, या खास वन्यमानचिन्हांची मजेदार ओळख करून घेऊया!

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

महाराष्ट्राचा निसर्ग खूप सुंदर आणि रंगीबेरंगी आहे, ज्यात अनेक प्राणी, पक्षी आणि झाडांचा खजिना दडलेला आहे. चला, या खास वन्यमानचिन्हांची मजेदार ओळख करून घेऊया!

रवशाली इतिहास आणि वैविध्यपूर्ण भूगोलाचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राला बहुविध निसर्ग संपदेचं वरदानही लाभलेलं आहे. विदर्भातील पानगळी रानांपासून ते कोकणाच्या किनारपट्टीवरील कांदळवनांपर्यंत महाराष्ट्रात सुमारे पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास आहेत त्यामुळेच वनस्पतींपासून ते किटकांपर्यंत आणि पक्ष्यांपासून ते जलचरांपर्यंत महाराष्ट्रात निसर्ग संपत्तीचा खजिनाच साठवलेला आहे. नुकताच आपण १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला, मग त्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनमोल जैवविविधतेमधील काही निवडक रत्नांची माहिती घेऊ या. महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या राज्याची वन्य मानचिन्हे घोषित केलेली आहेत. तामण किंवा जारुल हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे तर हरियल किंवा हरोळी हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. ब्लू मॉरमॉन अर्थात राणी पाकोळी हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे, मँग्रूव्ह ॲपल अर्थात चिपी हा महाराष्ट्राचा राज्य खारफुटी वृक्ष आहे. महाराष्ट्राला लांबलचक सागरी किनारा लाभलेला आहे, त्यामुळे ‘सिल्वर पापलेट’ हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे.

महाराष्ट्राच्या जैव विविधतेचा खरा खजिना दडलेला आहे तो पश्चिम घाट अर्थात आपल्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत.जगभरातल्या ३५ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी आपला सह्याद्रीसुध्दा एक आहे. तसं बघितलं तर संपूर्ण पश्चिम घाट हा भारताच्या भूभागावर फक्त ५% पसरलेला आहे, मात्र या लहानशा जागेत वनस्पतींच्या, प्राण्यांच्या, किटकांच्या शेकडो अशा जाती आढळतात ज्या एन्डेमिक म्हणजे फक्त याच भूभागावर पाहायला मिळतात. सह्याद्रीची पर्वत रांग अरबी समुद्राला खेटून उभी आहे, त्यामुळे या समुद्रातल्या पाण्याची वाफ होऊन जे ढग तयार होतात ते अडवून पाऊस पाडण्याचं काम पश्चिम घाटातील डोंगररांग करते. या पाऊसपाण्यामुळेही इथल्या जीवसृष्टीला मोठा आधार मिळाला आहे. म्हणूनच पश्चिम घाटात सुमारे १८१ प्रकारचे उभयचर पाहायला मिळतात आणि यातले ८०% उभयचर म्हणजे ॲम्फिबियन्स हे एन्डेमिक म्हणजे फक्त सह्याद्रीच्या रांगांमध्येच आढळतात.

या स्थानिक उभयचरांमध्ये सर्वात लक्ष्यवेधी आहे तो मलबार ग्लाइडिंग फ्रॉग म्हणतात. हिरव्यागर्द रंगाचा हा बेडूक काही पक्ष्यांसारखा उडत नाही तर याच्या पायाला जे कातडी पडदे असतात, त्यांच्या मदतीने हा तरंगत तरंगत सुमारे १०० फुटांचे अंतर सहज पार करतो. पश्चिम घाटातील बेडकांच्या प्रजाती या जवळ जवळ ४० दशलक्ष वर्षे जुन्या आहेत. डान्सिंग फ्रॉग आणि नाइट फ्रॉग या बेडकांच्या प्रजाती तर ६० दशलक्षवर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या आहेत. मध्यंतरी सह्याद्रीच्या रानात ‘पर्पल फ्रॉग’ ही बेडकाची नवी जातही संशोधकांनी शोधून काढली. अशीच विविधता सह्याद्रीमधल्या वनस्पती सृष्टीतही आढळते. सह्याद्रीच्या परिसरात ७००० पेक्षा अधीक सपुष्प वनस्पतींचे प्रकार आढळतात आणि त्यातल्या साडे पाच हजार जाती एन्डेमिक म्हणजे स्थानिय आहेत. सुरंगी, सोनकी, अंजनी, कारवी, कुंभा, कदंब, कौशी, वाघाटी, कळलावी अशी रानफुलं म्हणजे सह्याद्रीचे अलंकारच जणू.

आपल्या महाराष्ट्रात सुमारे एक हजार पेक्षा अधिक प्रजातींचे किटक आढळतात. किटकांमधील सर्वात आकर्षक गट आहे फुलपाखरांचा. महाराष्ट्रात दोनशे पेक्षा अधिक प्रकारची फुलपाखरे पाहायला मिळतात. या फुलपाखरांचे जवळचे भाईबंद म्हणजे पतंग अर्थात मॉथ. आपल्या राज्य फुलपाखराप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळणारा ‘ॲटलास पतंग’अतिशय लक्षवेधी असतो. हा जगातला सर्वात मोठा पतंग आहे. साधारण ९ ते ११ इंचांपर्यंत याच्या पंखांचा विस्तार असतो. तांबूस लाल, तपकिरी, पिवळा, काळा अशा रंगांनी याचे पंख रंगलेले असतात. त्यावर मधेच काहीशा पारदर्शक अशा खिडक्याही असतात. ज्यांच्या कोशांपासून सिल्क म्हणजे रेशमाचा धागा मिळतो त्या पतंगाच्या गटात ॲटलास मॉथ येतो.

महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेचा आढावा घेताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विचार करावाच लागेल. आपल्या राज्याला सुमारे सातशे किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यावर वाळूतल्या खेकड्यांपासून ते समुद्रातल्या देवमाशांपर्यंत सुमारे पंधराशे पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे जलचर नोंदवण्यात आले आहेत. यातील ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांच्या जीवनक्रमाची माहिती आपण याच लेख मालेत गेल्याच आठवड्यात घेतली आहेच. २०२० मध्ये महाराष्ट्राच्या वन्य मानचिन्हात समावेश झाला तो राज्य खारफुटी वृक्ष ‘चिपी’चा. चिपीचे झाड साधारण १५ फुटांपर्यंत वाढतं. त्याला चवरीसारखी अतिशय सुंदर शुभ्र पांढरी फुलं येतात आणि त्याची फळं सफरचंदासारखी दिसतात. ही फळे किनारपट्टीवरचे स्थानिक खातात. चिपीच्या झाडाचा पाला गुरांना खाण्यासाठी देतात.

महाराष्ट्राच्या पक्षी वैभवाची यादी करताना एका पक्षाचा उल्लेख करायलाच हवा आणि तो पक्षी म्हणजे रान पिंगळा अर्थात फॉरेस्ट आउलेट. या पक्ष्याची पहिली नोंद झाली होती ती १८७२ साली. त्यानंतर सुमारे ११३ वर्षे याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पुन्हा एकदा शोध मोहिम घेतल्यावर नंदुरबार जिल्ह्यात रान पिंगळा सापडला आणि मग अन्य ठिकाणीही दिसू लागला. विदर्भातील पानगळी अरण्यांपासून ते कोकणातील सदा हरीत रानांपर्यंत अरण्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळत असल्याने साहजिकच सस्तन प्राण्यांचेही अनेक प्रकार या जंगलांमध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या अधिवासात आढळणारे, भिन्न भिन्न पध्दतीचा आहार घेणारे आणि वेगवेगळ्य़ा कुळांमधले मिळून महाराष्ट्रात सुमारे पन्नास प्रकारचे सस्तन वन्यजीव पाहायला मिळतात. यांतला सर्वात अनोखा सस्तन प्राणी म्हणजे ‘पॅंगोलिन’ अर्थात ‘खवले मांजर.’ एखाद्या योध्याच्या अंगावर चिलखत असावे तसे याच्या अंगावर खवल्यांचे चिलखत असते.तोंडाचा भाग वगळता डोक्यापासून ते शेपटीपर्यंत एकावर एक बसवलेल्या खवल्यांनी हा प्राणी आच्छादलेला असतो.जमिनीत बिळ खोदून राहाणारा हा प्राणी आपल्या लांबलचक जिभेनं वारुळातील मुंग्या-वाळवी यांचा फडशा पाडतो.अंधश्रध्देतून या प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

२०१२ मध्ये युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा यादीमध्ये पश्चिम घाटातील अनेक जागांची नोंद करण्यात आली आहे,त्यात आपल्या महाराष्ट्रातील कास पठाराचा समावेश आहे.आपल्या महाराष्ट्राच्या या वैविध्यपूर्ण वन्य मानचिन्हांची जपणूक हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना