प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
आजच्या पिढीला दुधावरची साय पाहून नाक मुरडावंसं वाटतं; पण आमच्यासाठी ती म्हणजे दुधातलं सोनंच! सायीवरची कॉफी, लोण्यावरची पोळी आणि तुपाच्या धारेत न्हालेला वरणभात... या सगळ्या सुखांची सर विकतच्या बटरला आणि ब्रँडेड तुपाला येणार तरी कशी? चवीच्या या जुन्या आठवणींची गंमतच काही और आहे!
दुधावरची साय म्हणजे दाट, पांढराशुभ्र, मऊ लुसलुशीत, दिसताच क्षणी दोन बोटांनी कवळून गट्ट करावासा वाटणारा पदार्थ. साय कशी असते, तर पाळण्यातल्या अगदी लहानग्या अर्भकाच्या गालाला हळुवार हात लावल्यावर बोटांना जे फीलिंग येतं तशी.
मराठी संस्कृतीत ‘दुधावरची साय’ या शब्दांचा वापर एखाद्या प्रिय किंवा अतिशय लाडक्या व्यक्तीसाठी (उदा. नातवंडांसाठी) उपमा म्हणून केला जातो. त्यावरूनच कदाचित ‘नातू/नात म्हणजे काय? दुधावरची साय!’ हे वाक्य आलं असावं.
आजची पिढी साय म्हटलं की, उलटी आल्यासारखी रिॲक्ट होते. त्यांना दूध पितानासुद्धा तोंडात साय आलेली चालत नाही. काय बोलणार? ‘गा.गु.च.का.’ असं नाइलाजाने म्हणावं लागतं. अहो, विकतच्या प्रक्रिया केलेल्या बटरवर वाढलेली ही पिढी, यांना काय समजणार सायीचा महिमा? आम्ही लहानपणापासून पाव, साय किंवा घरच्या पांढऱ्याधोप लोण्याने माखून खाल्ला. गरमागरम पोळी, त्यावर मनमुराद पसरलेलं लोणी आणि पेरलेली साखर याची छान वळकटी करायची आणि तोंडात पहिला घास जाताच जिभेला पोळीचा खुसखुशीत, लोण्याचा मऊशार आणि साखरेचा कुरकुरीत स्पर्श होतो आणि ती वळकटी कधी संपून जाते कळतही नाही. मला तर पोळीसोबत सायीची वाटी असेल तर दुसरं काही नसलं तरी अगदी आजही चालतं.
वयानुसार साय कुणी देत नाही खायला, तो भाग वेगळा. कॉलेजमध्ये असताना मी दुपारी स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर अभ्यासाला बसायचो. अभ्यास नावालाच व्हायचा; पण झोप येतेय या सबबीवर मी कॉफी करायला घ्यायचो. दुधाचं भांडं ओट्यावर असायचं. उघडताच वर मस्त साय दिसायची. छान एक कप दूध गरम करायचं, साखर, इन्स्टंट कॉफी घालून ढवळायचं आणि शेवटी सायीचा जाडसर थर घालायचा आणि मस्त मिटक्या मारत ती कॉफी प्यायची. प्रत्येक घोटाबरोबर सायानंद घ्यायचा.
आता घरचं रवाळ तूप आणि विकतचं बटर यांची बरोबरी जरा तरी होऊ शकते का?
आजकाल पदार्थांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात, त्यात विकतचं बटर घालून आम्ही अमुक बटरमध्ये पदार्थ बनवतो, हे अगदी पुन्हा पुन्हा सांगत असतात. कुणी म्हणतात, ते ओरिजिनल नसतंच. कुणास ठाऊक! पण प्रक्रिया केलेल्या बटरमध्ये केलेली पावभाजी आणि घरच्या तुपात केलेली पावभाजी खाऊन बघा आणि मग मला सांगा. अहो, आजची पिढी उद्या वरणभातावरसुद्धा विकतचं बटर घालून खातील, काही सांगता येत नाही. भाताची मूद, त्यावर पिवळंधम्मक वरण आणि तुपाच्या धारेने अन्नशुद्धी झाली की आंबेमोहोर भाताचा सुगंध, त्यावर उन उन वरण आणि घरच्या तुपाचा एकत्रित सुगंध दरवळतो आणि पहिला घास मुखात अलगद उतरतो. विकतच्या तुपाला ना चव, ना स्वाद. माझ्या मामीकडे लहानपणी सुट्टीत राहायला जायचो. सकाळी बेकरी पावाच्या छोट्या छोट्या कापट्यांवर साय घालून मला खायला द्यायची. तब्येत खुश होऊन जायची.
अगदी काही वर्षांपर्यंत दोन-चार महिन्यांनी एकदा अर्धी वाटी दाट साय आणि मऊ लुसलुशीत पाव असा नाश्ता बायको मेहेरबान होऊन मला द्यायची. परम आनंदाचा दिवस असायचा तो. अगदी निवांत, शांतपणे कुठेही लक्ष विचलित होऊ न देता मी सायीची वाटी चाटून पुसून लख्ख करायचो. त्या दिवशी मी इतका खुश असायचो की त्या आनंदात बायको सांगेल ते काम करायला सिद्ध असायचो.
आता थालिपीठासोबत लोण्याचा गोळा नसेल तर काय उपयोग? आमच्याकडे एका हॉटेलमध्ये थालिपीठ आणि थालिपीठ लोणी अशा दोन प्रकारच्या डिश मिळतात. टोमॅटो ऑम्लेटवरसुद्धा मला लोणी घालून खायला आवडतं. थालिपीठ किंवा ऑम्लेटच्या मध्यावर लोण्याचा छोटा गोळा टाकला की तो वितळत सगळीकडे पसरतो आणि अवघं थालिपीठ लोणीमय करून टाकतो. मग तुकडा मोडायचा आणि तोडत टाकायचा.
गरमागरम उकडीच्या मोदकाला फोडून त्यात चमचाभर तूप सोडलं की उकड, चून आणि तुपाची अशी काही युती होते की तो खाल्ल्याशिवाय पर्यायच उरत नाही.
हल्ली काय झालंय सांगू का? कोणताही पदार्थ बाजारात अगदी सहज उपलब्ध असल्यावर थोडी चवीला मुरड घालायची आणि मेहनत वाचवायची, ही मानसिकता झालीय. एखादा पदार्थ करण्यासाठी साय लागणार असेल तर रेडिमेड विकत मिळते, लोणी तर खूप आधीपासून विकत मिळतंच आणि तूप अनेक ब्रँड्सनी भरमसाट किमतीसह बाजारात उपलब्ध केलेलंच आहे. त्यामुळे,
दत्त दत्त दत्ताची गाय,
गायीचं दूध, दुधाची साय,
सायीचं दही, दह्याचं ताक,
ताकाचं लोणी, लोण्याचं तूप
आणि तुपाची धार..
ही सगळी लेन्थी प्रोसेस कोण करत बसणार आणि त्यासाठी वेळ कोणाला आहे?
मग पुढची लहान पिढी यालाच यम्मी आणि टेस्टी म्हणतेय.
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com