निळाईतली 'हलचल'! 
अक्षररंग

निळाईतली 'हलचल'!

समुद्राच्या अथांग विश्वातली ही थरारक गोष्ट

नवशक्ती Web Desk

कथा

डॉ. मानसी राजाध्यक्ष

समुद्राच्या अथांग विश्वातली ही थरारक गोष्ट

क्लक क्लक! चला रे, पटकन ‘बीटा’च्या भोवती कडं करा! ‘मिसा’ तू पुढे हो. किरा, वेळप्रसंगी तू हल्ल्याची तयारी करायचीस. तो बहुतेक पळूनच जाईल, पण आपण तयारीत राहूया”. ‘मेगा’आजी आपल्या कळपातल्या प्रत्येकाला भराभर सूचना देत होती. आपल्या कळपाची सुरक्षितता हे तिच्या आयुष्याचं पहिलं उद्दिष्ट होतं. एकीकडे तान्हुल्या ‘बीटा’ला हे सर्व काय चाललंय हेच कळत नव्हतं. काही वेळापूर्वीचं ‘बीटा’चा जन्म झाला होता.

‘ओर्का’ ही देवमाश्यांच्या कुळातली एक प्रजात! ‘हत्यारी देवमासे’ म्हणून ओळखली जाणारी!! सागरातली सर्वात बुद्धिमान आणि म्हणूनच जैविक साखळीच्या सर्वात वरच्या भागात असणारी! म्हणजे खरतर ओर्काच्या वाट्याला जायला कोणताही समुद्रीय प्राणी धजावतच नाही. तरीही, मेगाआजीच्या ‘बीटा’वर आज कोणीतरी हल्ला करण्याची हिंमत केली होती.

जन्मत:च पाण्यावर जाऊन पहिला श्वास घेऊन आल्यावर, ‘बीटा’ची आई, ‘निरा’ने आपल्या लेकीसाठी, दुधाचा स्रोत पाण्यात सोडला होता. आईने फेकलेला जवळजवळ सात-आठशे मिलीलिटरचा तो स्रोत, ‘बीटा’ने ‘आ’वासून अलगद आपल्या मुखात झेलला. जवळजवळ ५० टक्के स्निग्धता म्हणजे माणसाच्या दुधापेक्षा जवळजवळ १० पट जास्त स्निग्धता असलेलं, एखाद्या टूथपेस्टएवढं दाट आणि काहीसं चिकट असलेलं हे दूध झेलणं, काही सोप्पं काम नव्हतं. दुधाचा पहिला हप्ता संपताच, ‘बीटा’ने किलकिल्या डोळ्यांनी पाण्यातल्या अंधुक प्रकाशात चौफेर नजर फिरवली.

प्रशांत महासागराचा खोल, पण तरीही त्यातल्या त्यात उथळ भाग! पाण्याच्या थरातून झिरपणारा अगदी अंधुकसा सूर्यप्रकाश, त्यामध्ये पाण्याबरोबर डोलणारी झुडपं, शेवाळ, प्लवक! निरव शांततेत, आपापल्याच आयुष्यात मग्न असलेले जीवजंतू, तळाशी शानदार वाळूचा गालीचा! आणि हे काय? पाण्यातून अचानक बुडबुडे आले. ‘हा पण खाऊचं आहे की काय?’ बीटा बुडबुड्यांना पकडायला झेपावली. पण पॉप, पॉप... प्रत्येक बुडबुडा फुटत होता. बुडबुडे पकडायच्या नादात बीटा आपल्या कळपापासून थोडी वेगळी झाली होती.

तेवढ्यात एक धीरगंभीर ‘नाद’ सगळ्या पाण्यात पसरला. हे काय आता आणखी नवीन? बीटा मोठ्या कुतूहलाने पहायला लागली. काही क्षणातच जणू सगळा समुद्रच अलगदपणे वाहतोय की काय असं वाटायला लागलं. बीटा डोळे विस्फारून बघत होती. जवळपास ८० फूट लांब आणि तब्बल १ लाख किलो वजनाची ‘अना’ बाजूने पुढे सरकत होती. ‘बापरे! किती प्रचंड हा प्राणी! आणि हे काय तिच्या बाजूने तिला चिकटून कोण आहे हा?’ बीटा निरीक्षण करत होती. शांतपणे पोहणारी ‘अना’ ही निळ्या देवमाश्याच्या कुळातली! आणि तिच्याबरोबर होता तिचा बछडा ‘निलय’! तोही नवजात अर्भक, पण तरीही २४ फूट लांब आणि ३५०० किलो वजनाचा! निळे देवमासे, या पृथ्वीतलावरचे सगळ्यात महाकाय प्राणी आणि तरीही शिकार ‘न’ करणारे!!

‘बीटा’ला असुरक्षित वाटायला लागलं. तिने थोड्या अंतरावर असलेल्या, निरा आणि मेगा, यांच्याकडे नजर टाकली. त्या दोघींचं लक्ष होतंच. पण तरीही त्या शांत होत्या. म्हणजे या भल्यामोठ्या प्राण्यापासून आपल्याला काही धोका नाही तर! बीटाही शांत झाली आणि पुन्हा तिने आपली नजर ‘निलय’कडे वळवली. बीटाची आणि निलयची नजरानजर होताच, निलयने पुन्हा आपले धीरगंभीर सूर पाण्यावर अलगद सोडले. बीटाने पण स्वत:शी गिरकी घेत क्लक क्लक आवाज करत प्रतिसाद दिला. एका अनोख्या मैत्रीची सुरुवात झाली होती.

पण..जवळच एका मोठ्या वाळूच्या टेकडीआडून ‘फँग’ हे दृश्य पहात होता. त्याने आपलं सर्व लक्ष कळपापासून थोडं दूर आलेल्या बीटावर केंद्रित केलं होतं... आणि तो एका संधीची वाट पहात होता. निलयला पाहून आनंदाने गिरकी घेणाऱ्या बीटाच्या शेपटीमुळे वाळूतल्या काही प्लवकांना धक्का लागला. ते निळ्याहिरव्या रंगाने चमकायला लागले. ते मोहक दृश्य पाहून बीटा अजून गिरक्या घ्यायला लागली, आपली शेपटी हलवायला लागली, स्पर्श होताच प्लवक चमकत होते. पाण्याच्या थरांमध्ये आता अंधाराचं साम्राज्य पसरायला लागलं. त्या विस्तीर्ण जलाशयातल्या, मनोरम्य वातावरणात बीटा आनंदाने विहरत होती. कित्ती सुंदर आहे हे सारं..म्हणत होती!

तेवढ्यात वाळूच्या डोंगरापलीकडे हालचाल झाली. कोणतरी दबा धरून बसलेलं होतं आणि बीटा आपल्या टप्प्यात येण्याच्या प्रतीक्षेत होतं. पण ही एवढी सावध आणि मंदशी हालचालही मेगाआजीने टिपली. संभाव्य धोका तिच्या लक्षात आला. तिने भराभर आपल्या कळपाला सूचना दिल्या. क्षणार्धात ‘बीटा’भोवती संपूर्ण ओर्का कळपाने गराडा घातला.

क्लक क्लक आवाज करत मेगाआजी, किरा आणि मिसा, वाळूच्या डोंगराच्या दिशेने पहायला लागल्या आणि तिथे लपलेल्या ‘फँग’ची.. एका शार्कची गाळण उडाली. ओर्काच्या वाटेला कधीही न जाण्याची, त्याच्या कळपाची शिकवण, आज तो काही काळ विसरला होता. मऊ, लुसलुशीत बीटाला पकडण्याच्या उद्देशाने त्याने स्वत:वरचं संकट ओढवून घेतलं होतं. आता त्याला मेगाचा कळप सोडणार नव्हता. क्लक क्लक करत सगळा ओर्का कळप फँगच्या दिशेने पोहायला लागला. बीटा भयभीत होऊन सारं पहात होती. काही मीटरच्या अंतरावर ओर्का कळप येऊन ठेपला, मात्र फँगने एक ‘यूटर्न’ घेतला आणि तो जिवाच्या आकांताने पोहत समोरच्या अथांग अंधारात गायब झाला. ,

आजच्या दिवसापुरतं तरी संकट टळलं होतं. जन्माला आल्यापासून काही तासांतच बीटाला अनेक धडे मिळाले होते. आकाराने प्रचंड असला तरी अजिबात त्रास न देणारा, जमल्यास मैत्रीचा हात पुढे करणारा एक प्राणी असू शकतो, तर कोणीतरी कुठेतरी लपलेला आपला शत्रूही असू शकतो. अतिशय रम्य असणारं हे सागराचं जीवन तेवढंच धकाधकीचं आहे, तेव्हा आता सावधतेने प्रत्येक गोष्ट करायला हवी, ‘बीटा’ने स्वत:लाच समजावलं!

विज्ञान लेखक आणि प्रसारक

manasi.milind@gmail.com

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

मराठा आरक्षणाचे आंदोलनस्थळ ११२३ दिवसांनंतर अखेर रिकामे; मंडप, व्यासपीठ हटवले

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष