नवलनगरी
सोनाली कोलरकर-सोनार
पेन्सिलइतकंच तिचं ‘घर’ही एक भन्नाट आणि रंजक कथा सांगतं!
शाळेत रोज लागणारी पेन्सिल! किती वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल / पेन्सिली (हा खास आपला शाळेतला शब्द असतो!) वापरतो न ? रंगीबिरंगी , वेगवेगळ्या वापरासाठी वेगळ्या! कधी फक्त लिहायला वेगळी, कधी फिकट चित्र काढायला वेगळी, डार्क काळी आकृती काढायला तर कधी स्केच काढायला ! बापरे ! केव्हढं अफाट विश्व आहे हे पेन्सिलींचे ! प्राथमिक शाळेत तर पेन्सिल जीव की प्राण असते ! तिच्या दोन्ही बाजूनी टोक करण्यापर्येंत आपण तिला वापरत राहतो। आवडीची पेन्सिल हरवली तर भर वर्गात भोंगा काढायला आणि अगदी घट्ट मित्रमंडळाशी कट्टी घ्यायला पण कमी करत नाही! मग या पेन्सिलीला घर म्हणजे आपला बॉक्स किंवा केस ही कोणी बरं दिली असेल ?
मजाच आहे सगळी! मूळ जर्मनीचा फॅबर -कॅसल हा उत्तम पेन्सिलिंचा ब्रँड आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती झाला आहे. किती वैविध्यपूर्ण पेंसिली असतात. पार सतराशे, अठराशे काळात जर्मनीत फॅबर कुटुंबीयांनी पेंसिली तयार करायला सुरुवात केली. खाणीतून निघणारे ग्राफईट आपल्या कंपनीला मिळावं म्हणून अनेक ठिकाणी या कुटुंबाने फिरस्ती केली आणि पेन्सिलिंचा दर्जा उत्तम राखण्याचा प्रयत्न केला. त्या सोबतच त्यात वैविध्य कसं राहील हे पण पाहिलं. पेन्सिल टेबलवरून घरंगळत चटकन खाली पडू नये म्हणून षटकोनी पेन्सिल तयार करण्याची कल्पना यांनी राबवली आणि ती लोकांना प्रचंड आवडली! लोथर वोन फॅबर यांनी अठराशे साली आपल्या आजोबांनी सुरू केलेली ही कंपनी जेव्हा मालक म्हणून चालवायला घेतली, तेव्हा त्या काळात त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला.
व्यवसाय वृद्धीसाठी आताच्या काळात जसं पॅकेजिंग, प्रेझेन्टेशनला महत्व दिल्या जातं, ते त्यांनी त्या काळात ओळखलं आणि आपल्या पेंसिली अतिशय सुंदर अश्या हॅन्डमेड बॉक्स मध्ये ठेवून स्वतः सोबत मिरवायला, सन 1860 च्या आसपास सुरवात केली ! कधी चांदीचे तर कधी हस्तिदंती अश्या अनेक आकर्षक बॉक्सेस मध्ये या पेन्सिल ठेवून ते प्रवास करत तेव्हा त्यांची ही कल्पना युरोपात इतकी आवडली आणि लोकांना इतकी सोयीची वाटू लागली की पेन्सिल बॉक्स बाळगणे हा चक्क एक प्रतिष्ठेचा भाग झाला! फॅबर हे असे पेन्सिल बॉक्स चे जनक जरी असले तरी यांनी मात्र या बॉक्सेसचे पेटंट वगैरे काही घेतले नाही। पेन्सिल बॉक्स व्यावसायिक रित्या तयार करण्याचे श्रेय फॅबर यांना न जाता अमेरिकेच्या ‘वेनोरा पर्ल अमोथ’ यांना जातं! टोकदार पेंसिलीमुळे कपड्याना पडणारी छिद्रे आणि कधी कधी होणारी इजा टाळण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करताना वेनोरा यांनी सहा पेंसिली मावतील असा एक उभा बॉक्स तयार केला. यातून एक - एक पेन्सिल ओढून काढता येऊ शकायची. मग या डिझाइन मध्ये बरेच बदल करत त्यांनी आकर्षक बॉक्स तयार केले आणि 1946 साली ह्या पेन्सिल बॉक्स चे पेटंट घेतले! जगभर मग पेन्सिल, पेन ,रबर , शार्पनर , स्केल आणि बरच काही ठरवण्याचे विविध पाऊच तयार झाले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले! आता छोटा भीम , टॉम अँड जेरी, थॉर , आयर्नमॅन, हॅरी पॉटर पासून फास्टर फेणे पर्येंत अनेक पेन्सिल बॉक्स विकत घेण्यासाठी आई बाबांच्या मागे हट्ट धरावा लागतो, परंतु गंमत अशी आहे की फॅबर कॅसेल ने या सगळ्यावर वरकडी करत ड्रॉवर असलेले पेन्सिल सकटचे बॉक्सेस , छोट्या ब्रिफकेस मध्ये सुंदर मांडणी केलेले बॉक्सेस अश्या गोष्टींची निर्मिती करत त्याचे पेटंट घेतले आणि रंगीबेरंगी पेन्सिलिंना राजमहालच बहाल केला. असे गिफ्ट बॉक्सेस चिमुकल्यांना खुणावत राहतील असे बघितले ! सरतेशेवटी काय तर कुर्त्याला छिद्र पडू नये म्हणून वेनोरा ने तयार केलेले पेन्सिल बॉक्स आणि व्यवसाय वाढवा म्हणून आकर्षक बॉक्सेस मधून फॅबर ने विकायला काढलेल्या पेंसिली या दोन्हीचा परिपाक म्हणजे आपल्याला अचानक उपलब्ध झालेला पेन्सिल बॉक्स आहे! आहे ना गंमत?
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक sonalikolarkarsonar@gmail.com