चुकून तयार झाले ‘पोटॅटो चिप्स!’ 
अक्षररंग

चुकून तयार झाले ‘पोटॅटो चिप्स!’

मुलांना बटाट्याचे वेफर्स खूप आवडतात, पण तुम्हाला माहीत आहे का की या चविष्ट चिप्सचा शोध एका शेफने चुकून आणि रागाच्या भरात लावला होता? जाणून घेऊया जगभर लोकप्रिय झालेल्या या ‘कुरम-कुरम’ चिप्सचा मजेशीर इतिहास!

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलरकर-सोनार

मुलांना बटाट्याचे वेफर्स खूप आवडतात, पण तुम्हाला माहीत आहे का की या चविष्ट चिप्सचा शोध एका शेफने चुकून आणि रागाच्या भरात लावला होता? जाणून घेऊया जगभर लोकप्रिय झालेल्या या ‘कुरम-कुरम’ चिप्सचा मजेशीर इतिहास!

उन्हाळा सुरू झाला की आई, मावशी, आत्या, काकू अशा सगळ्यांकडून ‘वाळवण करायचं आहे’ असं अनेकदा ऐकलं असेल. ते ऐकल्यावर तुमच्याही मनात, ‘अरे वा! आता आपली मज्जा येणार!’ असे विचार नक्कीच येत असणार. कारण, एखाद्या दिवशी घरी खूप सारे बटाटे येतात; मग कधी त्यांचा बारीक किस उन्हात वाळत ठेवला जातो, तर कधी त्याचे चिप्स केले जातात. ते कधी एकदा तळले जातात, याकडेच मग आपलं लक्ष असतं!

या घरगुती चिप्समुळे मजा येत असली, तरी बाजारात मिळणारे ‘कुरम-कुरम’ पोटॅटो चिप्स आपल्याला मनातून जरा जास्तच आवडतात; कारण हे पोटॅटो चिप्स अनोख्या चवीचेच असतात! किती पातळ आणि तिखट, आंबट, गोड, खारट असे चविष्ट! आणि गंमत म्हणजे याचं खरं कारण असं आहे की, हे पोटॅटो चिप्स काही ठरवून तयार केले नव्हते. ते तर एका रेस्टॉरंटच्या शेफने वैतागून मुद्दाम ‘बिघडवलेली’ एक रेसिपी होती!

तर झालं असं की, ही १८५३ च्या उन्हाळ्यातील गोष्ट आहे. न्यूयॉर्कच्या सारातोगा स्प्रिंग्समधील ‘मूनलाईट’ रेस्टॉरंटमध्ये जॉर्ज क्रम नावाचे शेफ काम करत होते. जरा जाडसर अशा बटाट्यांच्या ‘फ्रेंच फ्राईज’ची डिश, जी काट्या चमच्याने (Folk) खाल्ली जायची, ही त्यांची खासियत होती. लोक अगदी आवडीने त्या रेस्टॉरंटमध्ये येऊन ही डिश मागवत असत. एकदा मात्र एका कटकट्या ग्राहकाने फ्रेंच फ्राईज जास्तच जाड झाले आहेत असं म्हणून जॉर्जला ते परत पाठवले आणि पुन्हा करायला सांगितले.

जॉर्जने आपल्या ‘कस्टमर इज किंग’ या धोरणानुसार पुन्हा ती डिश तयार केली आणि नेऊन दिली. पण त्या कटकट्या ग्राहकाने ‘ही डिश अजूनही नेहमीसारखी झालीच नाही’ असं म्हणत पुन्हा परत केली. असं चक्क अजून दोनदा झालं! आता मात्र जॉर्ज चिडले! पण सांगणार कोणाला? ग्राहकाची मागणी पूर्ण करणं त्यांना भागच होतं.

त्यांनी रागारागाने बटाट्याचे इतके बारीक काप केले की विचारू नका! मग ते फ्राय केले आणि त्या कटकट्या ग्राहकाला नेऊन दिले. जॉर्जला मनातून वाटलं होतं की, हा ग्राहक आता रागाने इथून निघून जाईल आणि एकदाची आपली सुटका होईल! पण काय गंमत पहा! त्या ग्राहकाला तो नवीन पदार्थ प्रचंड आवडला! त्याने अधाशासारखे ते चिप्स पुन्हा दोनदा मागवले. आजूबाजूचे ग्राहकही, ‘हा नक्की काय खातो आहे?’ या उत्सुकतेपोटी जॉर्जकडे तोच पदार्थ मागू लागले आणि बघता बघता हे ‘पोटॅटो चिप्स’ प्रचंड लोकप्रिय झाले.

त्यावेळी ते ‘सारातोगा चिप्स’ म्हणून प्रसिद्ध झाले! फक्त तिथेच हा पदार्थ मिळत असे. अनेक शेफ तिथे हे चिप्स बनवायला शिकले आणि आपल्या भागातही जाऊन ते तयार करू लागले. पण हे बनवायला वेळ फार लागायचा, त्यामुळे ग्राहकांना आधीपासूनच याची नोंदणी (Booking) करावी लागायची.

पुढं १८९५ साली ओहायोच्या विल्यम टॅपेनडोनने आपल्या गोठ्याचं रूपांतर चिप्स तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये केलं आणि पहिल्यांदा ते बाजारात जाऊन विकायला सुरुवात केली. पण हाताने बटाटे सोलणं आणि ते कापणं यासाठी माणसं खूप लागायची. अखेर १९२० साली चिप्स तयार करण्याची मशीन्स तयार झाली आणि देशभरात पोटॅटो चिप्स लोकप्रिय झाले. या ‘कुरम-कुरम’ची ओढ मग जगभर पोहोचली आणि पोटॅटो चिप्स सिनेमागृहापासून पिकनिकपर्यंतच्या सगळ्या आनंदाचा अविभाज्य घटक बनले!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त

Mumbai : त्याने २७ वर्षांनंतर उगवला 'फिल्मीस्टाईल'ने सूड; कुख्यात गुंड सादिक कालियाच्या पुतण्याला अटक

मद्यधुंद तरुणाने पुण्यात पीएमपीएलची बस चालवली; VIDEO