रसास्वाद
अक्षय वाटवे
‘साद-प्रतिसाद’ हा काव्य आणि चिंतनात्मक ललित लेखांचा एक सुंदर मिलाफ असून, माणसाला स्वतःचा अंतर्नाद ऐकायला शिकवणारा आणि जगण्याला नवी लय देणारा हा दर्जेदार संग्रह आहे.
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणवाटांवर वेगवेगळे प्रवासी भेटतात. या अनोख्या प्रवासाचा लेखाजोखा म्हणजे साद-प्रतिसाद. काव्य आणि चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. या संग्रहाचे लेखक दिलीप पाटील असं म्हणतात की,
साद-प्रतिसाद म्हणजे अंतर्मनातून उठणारा भावनांचा निनाद!
हा संग्रह गणरायाच्या वंदनेपासून ते भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानाला स्पर्श करणारा एक विस्तृत पट आहे. समरसून जगलेलं आयुष्य, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गोळा केलेले अनुभव, बऱ्यावाईटाचे केलेले चिंतन- या सगळ्यातून पाटील यांच्याकडे एक संचित गोळा झाले. त्या त्या वेळी त्यांनी जे शब्दात पकडले, ते पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा संग्रह वाचताना पाटील यांचा हा निर्णय निव्वळ योग्यच नाही तर अत्यंत उपयुक्तही ठरतो आहे याची जाणीव आपल्याला होते. या अनुभवसिद्ध लेखनात कविता आणि ललित या दोन्ही घाटदार साहित्याचा मिलाफ साधल्यामुळे चिंतनाची डूब असलेले सकस, पौष्टिक आणि रंजक लेखन एकाच संग्रहात वाचकांना अनुभवता येते.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांचा स्नेह लाभलेल्या पाटील यांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवा शक्तीतर्फे आयोजित एका उपक्रमादरम्यान झाला. परिचयाचे रूपांतर स्नेहात झाले आणि हा स्नेह गेली पंधरा वर्षे अव्याहत टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्याशी संवाद साधत असताना त्याचे मार्गदर्शन मिळते त्यावेळी त्यांचा स्वर वडीलकीचा जरूर असला तरी पोकळ उपदेशाचा अजिबातच नसतो. हा वैयक्तिक संदर्भ देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हे त्यांच्या संवादातील ममत्व त्यांच्या ललित लेखनातही सहजगत्या उतरलं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही संग्रह वाचायला सुरुवात केलीत की गणेश स्तवनाने मन प्रसन्न होतं, त्या पाठोपाठ दैनंदिन जीवनात आपण वाचलेली काही सुवचने, विचार धन, जगण्याची काही सूत्रे, निसर्ग, मानवी भावभावना या सगळ्यावर बेतलेलं एक मुक्त चिंतन तुमच्यासमोर या संग्रहाच्या रूपाने खुलं होतं. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या वैश्विक सुवचनावर आधारित मांडणी करताना मानवी जीवनातील साहित्याच्या स्थानाविषयी पाटील चर्चा करतात. साहित्य हे सौंदर्य, सृष्टीचा आत्मा, उच्च विचार, स्वातंत्र्याची भावना, जीवनातील सत्याचा प्रकाश आहे, असे नमूद करतात. मात्र तेवढ्यावर न थांबता पुढे ते साहित्याचे मानवी जीवनातील स्थान, साहित्यिकांची समाजाप्रति असणारी भूमिका याही विषयी निर्भीड टिपणी करतात. म्हणूनच हे लेखन निव्वळ रंजनात्मक न उरता आचरणात आणावीत अशी काही जीवनावश्यक सूत्रे सांगणारे भाष्य ठरते. साहित्याची कालातीतता, व्यापकता, सर्वसमावेशकताही ते अधोरेखित करतात आणि साहित्य निव्वळ करमणूक किंवा मनोरंजन नाही हेही ठामपणे सांगतात. बालवयापासून ते आजवर अनेक बोधवचने, तात्पर्य कथा आपण वाचल्या असतील, त्यांचा प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात उपयोग करायची वेळ आल्यावर काय होईल?
तम सो मा जोतिर्गमय या लेखात या परिस्थितीचा परामर्ष घेत पाटील एक वास्तवादी मांडणी करतात. हे करत असताना ‘प्रामाणिकपणे चांगलं काही करताना चुकांची पर्वा करण्याची गरज नाही.’ हेही नमूद करतात.
आयुष्याचा प्रवास, आठवणी, मैत्र या विषयी बोलताना पाटील काही हळवे पदर उलगडतात. जगण्यातली अव्यक्त काव्यात्मकता शोधतात.
पाटील यांनी आजवर प्रत्यक्ष अनुभवातून जीवन शिक्षणाचे जे धडे गिरवले असतील ते या लेखनातून अगदी सोप्या शब्दात मांडायचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. दोन ओळीत वास्तव मांडताना ते सहज लिहून जातात-
मुखवटे चेहऱ्यावरच नव्हते,
विचारांवरही चढले
स्वतःसाठी जगताना,
माणूसपण मात्र हरवले…
प्रेमाचे शब्द झाले
चॅटबॉक्समध्ये बंद
संवादासाठी जीव,
गोंधळून झालाय मंद.
मात्र निव्वळ निराशेचा सूर ते आळवत नाहीत तर पुढे याच कवितेत-
युवा शक्ती येईल,
नवे सूर नवकल्पना घेऊन
स्वप्नांना साकारण्याच्या,
निर्धाराने पेटून
त्यांच्या आवाजात असेल,
बदलाची चाहूल
विखुरलेल्या जगाला,
बांधण्याच्या शपथेची झूल.
असेही म्हणतात. मला वाटतं ही तरुणाईच्या पाठीवर पांघरलेली निव्वळ झूल नाही तर ती मायेची, विश्वासाची उबदार शाल आहे.
अशी टप्प्याटप्प्याने या लेखसंग्रहाच्या आशयची खोली गहिरी होत जाते, मात्र त्याचे दडपण न येता आपल्या आतला वैचारिक कल्लोळ हळूहळू शांत होण्यास मदत होते. तुम्ही गोंधळला असाल, एकटे वाटत असेल, नैराश्य येऊ घातलं असेल तर अवश्य हे पुस्तक वाचा. तुमच्या विचारांवर नकळत उत्साहाची फुंकर पडेल. तुम्ही कठोर बनत चालला असाल, नकारात्मकता तुम्हाला घेरू लागली असेल तर अशावेळी जरूर हे पुस्तक वाचा. तुमच्या स्वभावात स्नेहलता वाढू लागेल. हे पुस्तक निव्वळ सकारात्मक विचारांना चालना देत नाही, सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या तथाकथित सेल्फ हेल्फ बुक्ससारखं (सन्मान्य अपवाद वगळून) जगण्याचा किंवा यशाचा गुरुमंत्र किंवा गुरुकिल्ली देणारंही हे पुस्तक नाही, तर हे पुस्तक वाचल्याने तुमचा आतला आवाज कदाचित तुम्हाला ऐकू येईल. त्याचा प्रतिध्वनी तुमच्या मनात जागेल. साधेपणातली श्रीमंती तुम्हाला सापडेल. जगण्याचा अनावश्यक वेग आटोक्यात आणून त्याला छान लय प्राप्त करून द्यायची असल्यास हे पुस्तक नक्की वाचा.
व्यथा, वेदना, वास्तव याचं भान जागृत करतानाच तुमच्या तोंडी प्रेमाची ओवी कशी रुळेल याचेही अवधान लेखकाने ठेवले आहे. हे प्रेम, माया, ओढ जशी माणसामाणसातली असेल, शारीरिक असेल तशी ती कला, संस्कृती, निसर्ग आणि समाजाप्रतिसुद्धा जागृत व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न या लेखनात आहे.
पाटील आवर्जून म्हणतात की,
हितचिंतक सावली,
निंदक शेजारी
दोघेही उपकारी
मानव जीवनापरी||
मारायच्या आधी
जगणे शिकावे
परोपकार प्रेमे
जीवन सुशोभावे||
जसे अध्यात्मात एकेक टप्पा ओलांडत अंतिम उन्नयन प्राप्त होते असे म्हणतात, तसा रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्व-बोध घडण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल का? - या प्रश्नाचे उत्तर तुम्ही हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला सापडेल.
लेखक, अभिवाचक
akshay.watve@gmail.com
'साद प्रतिसाद' ललित काव्य संग्रह
अष्टगंध प्रकाशन, ठाणे
पृष्ठ संख्या : १४४
मूल्यः ₹ २५०/-
लेखक: दिलीप पाटील
संपर्क : ९८२०४०२१०६