दुसरी बाजू
प्रकाश सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, 'युनेस्को'ने 'जागतिक वारसा हक्क' भूमी म्हणून गौरविलेल्या आणि 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'ने अधिसूचित केलेला कोल्हापूर येथील चांदोली अभयारण्य, राधानगरी अभयारण्य व गोवा दरम्यानचा व्याघ्रभ्रमण मार्गच धोक्यात आला आहे.
कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातील बुरंबाळ, पगुंद्रे, शिराळे तर्फ मलकापूर व सोनुर्ले, तसेच त्यांच्या पूर्वेकडील म्हालसवडे, आंबार्डे, पातवडे, माण, ओकोली, परखंदळे, मांडवकरवाडी, दरेवाडी, परळी, घुंगूर, पिशवी (केळेवाडी व खोतवाडी) आणि पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे, काणेरी, आंबेवाडी यांसारख्या जवळपास २२ गावांना जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी स्थानिक पुढाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रात समाविष्ट न करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. या परिसराच्या विकासाचा हवाला देत ही मागणी केली जात असली, तरी यामागील राजकीय आणि व्यावसायिक हेतू काही लपून राहिलेले नाहीत.
शाहुवाडी तालुक्याचा हा संपूर्ण पश्चिम भाग अतिशय दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील नागरिकांना अजूनही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. येथे उपजीविकेचे शाश्वत साधन नसल्यामुळे स्थानिकांचे पुणे, मुंबई व अन्य नागरी भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. याशिवाय, सद्यस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त भू-भाग हा आधीच अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमणमार्ग व 'संवर्धन राखीव' मध्ये समाविष्ट आहे. प्रस्तावित व्याघ्र संवर्धन योजना जर अंतिम झाल्यास त्यात तालुक्यातील ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भूभाग समाविष्ट होईल. त्याने वन्यजीव विषयक बंधने येतील आणि खाणकाम व्यवसाय तसेच औद्योगिक विकासासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने निर्देशित केलेला व्याघ्र भ्रमण मार्ग हा सह्याद्रीच्या माथ्यावरून जात असून तो उत्तर-दक्षिण दिशेने विविध अभयारण्यांना जोडणारा आहे. या भ्रमणमार्गाचा पश्चिमेकडील भाग हा सह्याद्रीच्या डोंगर उताराचा, चांगला दाट झाडोरा असलेला, वन्यजीवांचा वावर असलेला व विरळ लोकवस्तीचा आहे. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने सध्याच्या भ्रमणमार्गाचे पश्चिमेकडील तीन ते पाच किलोमीटरमधील क्षेत्र या योजनेत व प्रस्तावित भ्रमणमार्गात समाविष्ट करणे जास्त उचित ठरेल. त्यामुळे व्याघ्र संवर्धनाचा कार्यक्रम यथायोग्य रीतीने राबविणे शक्य होईल आणि आधीच विकासापासून वंचित राहिलेल्या क्षेत्रावर आणखी मर्यादा येणार नाहीत, असा युक्तिवाद स्थानिक पुढाऱ्यांमार्फत केला जात आहे.
स्थानिक नेत्यांचा हा युक्तिवाद आणि पर्यावरण संवर्धनाचा हा तथाकथित तोडगा ऐकायला जरी आकर्षक वाटत असला, तरी त्यांचे म्हणणे केवळ स्थानिक गावकऱ्यांनाच नव्हे, तर वन्यजीव तज्ज्ञांनाही अजिबात विश्वासार्ह वाटत नाही. गावकऱ्यांच्या व तज्ज्ञांच्या मते,
वाघांसारख्या मोठ्या प्राण्यांना संचार करण्यासाठी विस्तीर्ण आणि अखंडित अधिवासाची गरज असते. जर भ्रमणमार्गात केवळ तीन ते पाच किलोमीटरचा अरुंद पट्टा ठेवला, तर पट्टेरी वाघांचा मार्गच धोक्यात येईल आणि त्यांच्यात मानवी संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे राजकारण आणि विकासाच्या नावाखाली मांडण्यात येणारे हे मुद्दे केवळ व्यावसायिक फायद्यासाठी पुढे केले जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे अजिबात म्हणता येणार नाही.
विशेष म्हणजे, जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील 'मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्र,' 'विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र' आणि आजरा-भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्रात जवळपास अडीचशेहून अधिक पक्षी स्वच्छंदपणे विहरत आहेत. हा परिसर केवळ झाडे आणि डोंगरांनी वेढलेला नसून, तो अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. या ठिकाणी वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, भेकर, चौशिंगा, इटुकले पिसोरी हरीण, लेपर्ड कॅट आणि वाघाटी यांसारखे अनेक दुर्मिळ वन्य पशू-पक्षी आढळून येत आहेत. हा वनपट्टा केवळ एखादा जंगलाचा भाग नसून तो किमान पाच पट्टेरी वाघांचा भ्रमण मार्ग असल्याचे आढळून आलेले आहे. या भ्रमण मार्गावर मानवी हस्तक्षेप वाढला किंवा खाणकाम सुरू झाले, तर वाघांचे अस्तित्व धोक्यात येईल. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेला हा पट्टा निसर्गाचे एक अनमोल वरदान आहे. या हिरव्यागार वनश्रीची आणि वन्यजीवांची झालेली हानी म्हणजे केवळ एका परिसंस्थेचे नुकसान नाही, तर जीवसृष्टीलाच सुरुंग लावण्यासारखे आहे.
पश्चिम घाटाच्या या संवेदनशील परिसरात बॉक्साईटच्या खाणी आल्या तर एका रात्रीत मालामाल होता येईल अशी स्वप्ने रंगविणारा एक प्रभावी व श्रीमंत वर्ग या भागात सक्रिय झाला आहे. हा वर्ग खाणमाफियांचे मांडलिक झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, या ठिकाणी खाणकाम झाल्यास पश्चिम घाटातील जैवविविधता कायमची नष्ट होईल असे मानणारा सामान्य वर्गही इथे आहे. खाणकाम व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यातील ही वैचारिक व व्यावसायिक लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे वन विभागातील संवेदनशील अधिकारी नेमकी कशी भूमिका घेतात आणि त्याला राज्यकर्ते कसा प्रतिसाद देतात, यावरच या व्याघ्र भ्रमणमार्गाचे खरे अस्तित्व अवलंबून असेल. दोन-चार दिवसांच्या व मूठभरांच्या श्रीमंतीसाठी हजारो वर्षांची नैसर्गिक वनसंपदा पणाला लावणे अधिक घातक आहे. या भागात जर बॉक्साईटच्या खाणी आल्या तर काय होईल, यावर काही वन्यप्राणी तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी अतिशय धक्कादायक आणि गंभीर धोके मांडले आहेत. या ठिकाणी खाणकाम सुरू झाल्यास जड वाहने आणि डम्पर्सची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढेल. या सततच्या वाहतुकीमुळे आसपासची हवा उडणाऱ्या धूलिकणांनी प्रदूषित होईल. ज्या भागात खाणकाम होईल, त्या परिसरातील भूगर्भातील जलसाठे कायमचे दूषित होतील. पाण्याची पातळी झपाट्याने खालावेल आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. निसर्गाचे हे सुंदर जलस्रोत आटून जातील. खाणकामामुळे होणारा आवाज आणि धूळ यामुळे तेथील दुर्मिळ पशू-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होऊन ते कायमचे स्थलांतर करतील. खाणकामाच्या एका फटक्याने इथल्या जीवनदायिनी नद्या आणि झरे कायमचे कोरडे पडले, तर मानवी वस्त्यांचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही. सध्या राज्यात विकासाच्या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे.
कुंभमेळ्यानिमित्तानेही प्रचंड वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रखरखाट वाढला आहे. रस्ते, इमारतींच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटचे जंगल फोफावत चालले आहे. परिणामी, राज्यातील नागरिकांना कधी नव्हे एवढे तापमानवाढीचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. त्यातच, आता बॉक्साईट खाणींच्या निमित्ताने जंगलेच नष्ट केली जाण्याचा धोका आहे. या विनाशकारी योजनेचे परिणाम केवळ जंगलापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा मानवी जनजीवनावरही गंभीर परिणाम होईल. परिसरातील निसर्गरम्य आणि हिरवीगार गावे ओसाड व बकाल होतील. पैशांच्या हव्यासापोटी व विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याचा हा प्रयत्न म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. वाघांचा भ्रमणमार्ग जपणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून ती आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. जैवविविधतेने नटलेला सह्याद्रीच्या कुशीतील हा अनमोल वारसा जर आपण असाच संपवला, तर अस्तंगत झालेल्या 'डायनोसॉर' सारखे भारतीय वाघही उद्याच्या पिढीला केवळ चित्रातच पाहावे लागतील.
prakashrsawant@gmail.com