ओळख भूमिकेपलीकडची 
अक्षररंग

ओळख भूमिकेपलीकडची

शिक्षणाची वाट एक, करिअरची वाट भलतीच! पण स्वप्नांना ठराविक चौकटीत बांधून ठेवणं त्यांना मान्य नव्हतं. मेहनत, जिद्द आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या उर्मीने त्यांनी आखीव वाट सोडून स्वतःची नवीन ओळख निर्माण केली. शिक्षणाच्या सीमा ओलांडून करिअरला नवं वळण देणाऱ्या उर्मिला निंबाळकर, सई रत्नपारखी आणि प्रिया पाटील यांचा प्रवास म्हणजे...

नवशक्ती Web Desk

शिक्षणाची वाट एक, करिअरची वाट भलतीच! पण स्वप्नांना ठराविक चौकटीत बांधून ठेवणं त्यांना मान्य नव्हतं. मेहनत, जिद्द आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या उर्मीने त्यांनी आखीव वाट सोडून स्वतःची नवीन ओळख निर्माण केली. शिक्षणाच्या सीमा ओलांडून करिअरला नवं वळण देणाऱ्या उर्मिला निंबाळकर, सई रत्नपारखी आणि प्रिया पाटील यांचा प्रवास म्हणजे स्वतःला नव्याने शोधण्याची आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याची प्रेरणादायी गोष्ट!

पुण्यातल्या शाळेत मुली तिच्या बोलण्याची चेष्टा करायच्या. तिच्या बोलीभाषेमुळे त्यांना तिच्यासोबत डबा खायलाही संकोच वाटायचा. पण याच बोलीभाषेचा एक दिवस आपल्याला अभिमान वाटेल, हे तिला तेव्हा कुठे माहीत होतं! आज तीच भाषा तिच्या अभिनयाची ताकद आहे. ज्या क्षेत्रात काम मिळण्यासाठी दुसऱ्याच्या होकाराची वाट पाहावी लागते, त्या क्षेत्रातून बाहेर पडून स्वतःचं काम स्वतः उभं करण्यापर्यंतचा उर्मिला निंबाळकर यांचा प्रवास म्हणूनच वेगळा आहे. अभिनेत्री व्हायचं हे लहानपणी पाहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं; पण अभिनेत्री म्हणून मिळालेल्या यशावर समाधान मानून त्या थांबल्या नाहीत. स्वतःच्या कामावर स्वतःचा हक्क असावा, आपल्याला आवडेल तसं काम करता यावं आणि कलाकार म्हणून सतत शिकता यावं, या ध्यासातून त्यांनी डिजिटल माध्यमाची वाट धरली.

इंदापूर तालुक्यातील सणसर हे उर्मिला यांचं मूळ गाव. बारामतीत मराठी माध्यमातून आठवीपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, तो म्हणजे अभिनेत्री व्हायचं. गावात अभिनय शिकण्यासाठी खास वर्ग नव्हते, मोठी ग्रंथालयं नव्हती की कलाविश्वाची ओळख करून देणाऱ्या फारशा सोयी नव्हत्या. शाळेचं स्नेहसंमेलन आणि गणेशोत्सवातील कार्यक्रम एवढ्याच संधी होत्या. त्यातूनच त्या नाटकांकडे वळल्या. पु. ल. देशपांडे यांची नाटकं पाहून त्यांना या लेखनाचं वेड लागलं. ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक त्यांनी आपल्या शाळेत बसवलं. नाटकाचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना, दूरचित्रवाणीवर दिसणारे प्रयोग लक्षात ठेवायचे, संवाद लिहून काढायचे आणि आपल्या परीने नाटक उभं करायचं, असा त्यांचा खटाटोप असायचा. वयाच्या त्या टप्प्यावर दिग्दर्शन म्हणजे काय, याची शास्त्रशुद्ध माहिती नव्हती; पण नाटक करायचं होतं आणि ते करून दाखवायचं होतं.

नववीत पुण्यात आल्यावर मात्र वेगळाच संघर्ष सुरू झाला. ग्रामीण भागातून आलेली मुलगी, तिची बोलीभाषा आणि बोलण्याचा लहेजा यांवरून तिची चेष्टा झाली. सुरुवातीला या अनुभवांचा त्रास झाला. मात्र, जीवनविद्या मिशन आणि सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांतून त्यांना सकारात्मकतेची ताकद समजली. आपण आपल्या विचारांनी आयुष्य घडवू शकतो, हा विश्वास मनात निर्माण झाला. ज्या मुली आपल्या बोलण्यावर हसतात, त्यांनाच एक दिवस नाटक शिकवायचं, असा निश्चय त्यांनी केला. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी नाटक बसवताना त्या मुलींना संवादफेक, बोलण्याची पद्धत आणि अभिनय समजावून सांगू लागल्या. हळूहळू मुलीही शिकल्या आणि उर्मिला यांच्यातील दिग्दर्शिकाही घडत गेली. आज आपल्या ग्रामीण भाषेचा त्यांना अभिमान आहे. एखाद्या कलाकाराने स्वतःची मुळं विसरू नयेत, याचं महत्त्व त्यांना अनुभवातून समजलं आहे.

अभिनयाची आवड इतकी तीव्र होती की दहावीत चांगले गुण मिळूनही त्यांनी ठरवून फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. नाटकांच्या स्पर्धा करायच्या होत्या, प्रायोगिक रंगभूमीवर काम करायचं होतं आणि स्वतःला अभिनयात घडवायचं होतं. पुण्यातील ‘जागर’ नाट्यसंस्थेबरोबर त्यांनी जवळपास दहा वर्षे काम केलं. विविध नाटकांचे प्रयोग, जिल्हास्तरीय स्पर्धा आणि अमोल पालेकर यांच्या ‘जुलूस’ नाटकातील सहभाग यातून त्यांना अनुभव मिळाला. पृथ्वी थिएटरवरील प्रयोगांनीही त्यांच्या कलात्मक जाणिवांना समृद्ध केलं. अनिरुद्ध कुठवळ आणि जागर संस्थेमुळे वास्तववादी अभिनयाचे बारकावे शिकायला मिळाले. घरातूनही त्यांना मोठा पाठिंबा होता. कलाक्षेत्रात कोणी नसताना एका मुलीने अभिनयाचं स्वप्न पाहणं आणि त्यासाठी घरच्यांनी तिच्या पाठीशी उभं राहणं, ही त्यांच्या प्रवासातील महत्त्वाची बाब ठरली.

पुढे सात-आठ मालिकांमध्ये आणि आठ-दहा चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दोन हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. चित्रीकरणासाठी राजस्थानसारख्या ठिकाणी जाणं, मुंबईत नातेवाईकांकडे राहणं, चाळीत घर शोधणं, भाड्याच्या घरात संसार थाटणं आणि अखेरीस स्वतःचं घर घेणं, असा त्यांचा प्रवास झाला. बाहेरून पाहणाऱ्याला हा यशाचा प्रवास वाटेल; पण या सगळ्यात एक प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत होता. अभिनेत्री म्हणून ज्या दर्जाचं काम करावंसं वाटतं, ते आपल्याला मिळतंय का?

प्रेक्षक म्हणून त्यांना उत्तम चित्रपट, वेबमालिका आणि नाटकं पाहायला आवडत. मात्र, स्वतः काम करताना अनेकदा त्यांना समाधान मिळत नव्हतं. मालिकांच्या धावपळीत पटकन चित्रीकरण पूर्ण करणं, संवादांचं पाठांतर आणि वेळेत भाग तयार करणं यांना अधिक महत्त्व मिळत असल्याचं त्यांना जाणवलं. व्यक्तिरेखेचा अभ्यास, तिच्या भावनांमध्ये शिरणं आणि अभिनयाचे वेगवेगळे प्रयोग करणं यासाठी पुरेसा वाव मिळत नव्हता. कलाकार म्हणून आपली वाढ थांबली आहे, असं त्यांना वाटू लागलं. काम मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या लेखनावर, दिग्दर्शनावर आणि निर्मितीवर अवलंबून राहावं लागत होतं. कामाची अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि कधी कधी मिळणारी वाईट वागणूक यांमुळेही त्या अस्वस्थ होत्या. दुसऱ्याने संधी द्यावी म्हणून किती काळ वाट पाहायची, हा प्रश्न त्यांना पडला.

याच काळात त्या जगभरातील चित्रपट आणि वेबमालिका पाहत होत्या. इंटरनेट महाग असतानाही चांगल्या कलाकृती पाहण्याची त्यांची आवड कमी झाली नाही. ‘माइंडहंटर’, ‘नार्कोस’ यांसारख्या वेबमालिका आणि विविध जागतिक चित्रपट पाहताना आपल्यालाही असं काहीतरी निर्माण करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला. २०१२ मध्ये त्यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं; मात्र मालिकांच्या कामामुळे त्यावर काहीच प्रकाशित करता आलं नाही. अखेर मार्च २०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी पहिला व्हिडीओ टाकला. सुरुवातीला सातत्य राखणं जमलं नाही. डिजिटल माध्यमात काम करण्याची पद्धत वेगळी होती. केवळ अभिनय करून भागत नव्हतं; विषय निवडण्यापासून लेखन, कॅमेरा, चित्रीकरणाचं नियोजन आणि दिग्दर्शनापर्यंत सगळं शिकावं लागत होतं.

२०२० मध्ये त्यांचं चॅनेल कमाईसाठी पात्र झालं. त्यानंतर त्यांनी कामात सातत्य आणलं. जानेवारी २०२० पासून आजपर्यंत एकही शुक्रवार व्हिडीओ प्रकाशित न करता गेला नसल्याचं त्या सांगतात. ही गोष्ट साधी वाटू शकते; पण प्रत्येक आठवड्याला नवा विषय शोधणं, त्यावर अभ्यास करणं, लेखन करणं आणि व्हिडीओ तयार करणं यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, याची कल्पना यावरून येते. अभिनय करताना स्वतःची भूमिका साकारण्यावर लक्ष केंद्रित करता येतं; पण स्वतःचा आशय तयार करताना संपूर्ण निर्मितीची जबाबदारी घ्यावी लागते. उर्मिला यांनी हे सगळं शिकत शिकत केलं.

त्यांच्या आशयनिर्मितीचा पाया त्यांच्या शिक्षणात आहे. पदवी घेतल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंग, क्लोदिंग टेक्नॉलॉजी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्या प्रमाणित इमेज कन्सल्टंटही आहेत. व्यक्तीचं दिसणं, बोलणं आणि दृश्य सादरीकरण यामागील शास्त्रीय बाजू त्यांनी अभ्यासली आहे. लहानपणापासून असलेली नटण्याची आवड आणि फॅशनमधील शिक्षण यांचा उपयोग त्यांनी डिजिटल माध्यमात केला. त्यांना केवळ अधिक दृश्यसंख्या मिळवण्यासाठी विषय निवडायचे नव्हते. ज्या विषयाचं ज्ञान आहे, ज्याचा अभ्यास केला आहे आणि ज्याबद्दल मनापासून बोलता येतं, त्यावरच काम करायचं, अशी त्यांची भूमिका राहिली.

स्त्रियांच्या कपड्यांपासून अंतर्वस्त्रांच्या योग्य निवडीपर्यंत, तसेच पुरुषांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यापर्यंत त्यांच्या व्हिडीओंचे विषय विस्तारले आहेत. ब्रा आणि पँटीसारख्या अंतर्वस्त्रांबद्दल अनेक स्त्रियांना योग्य माहिती मिळत नाही, या जाणिवेतून त्यांनी याबाबत व्हिडीओ केले. योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी, अस्वस्थ कपड्यांमुळे काय त्रास होऊ शकतो आणि स्वतःच्या शरीराच्या गरजा समजून घेणं का आवश्यक आहे, याबाबत त्या माहिती देतात. त्यांच्या मते, अशा विषयांमध्ये गैर काहीच नाही. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मदत करण्याच्या भावनेतून ही माहिती दिली पाहिजे. पुरुषांच्या वर्तनावरील त्यांचा विनोदी कार्यक्रमही अभ्यासपूर्ण आहे. मुली एकत्र येऊन हसतखेळत पुरुषांच्या विचारांची चर्चा करतात; मात्र या विनोदामागे वैज्ञानिक माहिती आणि निरीक्षणं आहेत. एखाद्या रीलचा तुकडा पाहून संपूर्ण कार्यक्रमावर टीका करणाऱ्यांना त्या त्यामुळे महत्त्व देत नाहीत.

सोशल मीडियावरील प्रतिक्रियांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आशयातील त्रुटी दाखवून देणारी टीका त्या स्वीकारतात. आवाज, प्रकाशयोजना, लेखन किंवा सादरीकरणात सुधारणा करण्याची संधी अशा प्रतिक्रियांमधून मिळते. मात्र, रंग, शरीरयष्टी, ग्रामीण उच्चार किंवा स्त्रीने कसं राहावं यावरून होणाऱ्या वैयक्तिक टीकेकडे त्या दुर्लक्ष करतात. प्रसूतीनंतर शरीरात होणारे नैसर्गिक बदल यांवरूनही त्यांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी स्वतःच्या शरीराची किंवा भाषेची लाज बाळगली नाही. त्यांच्या मते, आशयावर टीका करणं वेगळं आणि एखाद्याला वैयक्तिकरीत्या दुखावणं वेगळं. प्रत्येक प्रतिक्रियेमागे आपल्या कामाशी संबंधित मुद्दा असेलच असं नाही.

आज उर्मिला यांची स्वतःची कंपनी आहे. संपादक, ग्राफिक डिझायनर आणि क्रिएटिव्ह प्रमुख अशी टीम त्यांच्यासोबत काम करते. दोन यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून त्या आशयनिर्मिती करतात. ‘उर्मी फेस्टिव्हल’सारख्या उपक्रमांसाठी त्यांनी कंपनीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याबरोबरच इतरांनाही डिजिटल माध्यमातील संधी समजावून सांगण्यासाठी त्या यूट्यूब मास्टरक्लास घेतात. ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील नायका या मंचाच्या भारतातील आघाडीच्या पाच क्रिएटर्समध्ये आपला समावेश असल्याचं त्या सांगतात. चांगल्या उत्पादनांचा वापर करून प्रामाणिक मत मांडणं आणि प्रेक्षकांचा विश्वास टिकवणं याला त्या महत्त्व देतात.

उर्मिला यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांनी करिअर बदललं; पण स्वतःची कला सोडली नाही. नाटकातून शिकलेला अभिनय, मालिकांमधून मिळालेला अनुभव, फॅशनचं शिक्षण आणि डिजिटल माध्यमातील प्रयोग या सगळ्यांचा त्यांनी एकत्रित उपयोग केला. त्यांना एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जायचं होतं, कारण तिथे स्वतःच्या कल्पनांना अधिक वाव मिळणार होता. “कुठल्याही माध्यमाच्या प्रेमात पडण्यापेक्षा कलेच्या प्रेमात पडा,” असं त्या सांगतात. उद्या रस्त्यावर नाटक करावं लागलं किंवा दीड मिनिटांची रील बनवावी लागली, तरी त्या आनंदाने काम करतील. कारण त्यांच्यासाठी माध्यमापेक्षा महत्त्वाचं आहे ते स्वतःला व्यक्त करणं.

सणसरमधून सुरू झालेला हा प्रवास आज स्वतःची कंपनी उभारण्यापर्यंत पोहोचला आहे. वाटेत बोलीभाषेची चेष्टा झाली, कामासाठी संघर्ष करावा लागला, अभिनेत्री म्हणून असमाधान वाटलं आणि नव्या माध्यमात पुन्हा शून्यापासून शिकावं लागलं. पण प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला नव्याने घडवलं. उर्मिला यांची कहाणी केवळ एका अभिनेत्रीच्या डिजिटल क्रिएटर होण्याची नाही; ती स्वतःच्या कामावर स्वतःचा अधिकार मिळवण्याची आहे. दुसऱ्याने दिलेल्या संधीवर अवलंबून न राहता स्वतःसाठी संधी निर्माण करता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आणि कदाचित त्यांच्या प्रवासाचं सर्वांत सुंदर वैशिष्ट्य हेच आहे की, अभिनेत्री होण्याचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी स्वतःला एका ओळखीपुरतं मर्यादित ठेवलं नाही.

(शब्दांकन : संदीप प्रधान)

......................

वकिली ते रेडिमेड ब्लाऊजचा व्यवसाय

आयुष्याची वाट ही नेहमीच आपण घेतलेल्या शिक्षणाच्या दिशेने आणि ठरवलेल्या मार्गाने जाईल असं अजिबात नाही. कधी एखादी लहानशी आवड, एखादा प्रसंग किंवा मनात अचानक निर्माण झालेली कोणतीही कल्पना माणसाच्या संपूर्ण आयुष्याला अगदी नवी आणि अनपेक्षित दिशा देऊन जाते. मात्र, त्यासाठी आपलं हक्काचं आणि परिचित क्षेत्र सोडून पूर्णपणे अनोळखी वाटेवर पहिलं पाऊल ठेवण्याचं धाडस, खंबीर मनाची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यावर अढळ विश्वास असावा लागतो. शिक्षण एका क्षेत्रात आणि प्रत्यक्ष करिअर दुसऱ्याच क्षेत्रात घडवणं म्हणजे मुळात एक वाट वाकडी करत चालण्यासारखंच असतं, परंतु प्रिया किरण पाटील यांनी आपल्या कर्तृत्वातून आणि प्रवासातून हाच धाडसी प्रवास अगदी यशस्वीपणे सिद्ध करून दाखवला आहे. एका सराईत वकिली व्यवसायातून थेट रेडिमेड ब्लाऊज निर्मितीच्या उद्योगापर्यंत मजल मारत त्यांनी ‘पिपा क्रिएशन’ या नावाने स्वतःचा स्वतंत्र आणि दर्जेदार व्यवसाय उभा केला आहे, ज्याची आजची वार्षिक उलाढाल ही सुमारे २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सध्या ४७ वर्षांच्या असलेल्या प्रिया पाटील (माहेरचं नाव प्रिया दत्तात्रय जाधव) यांनी आपले शिक्षण एम.एस्सी. आणि एलएल.बी.पर्यंत पूर्ण केले होते. कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर सन २००८ ते २०१४ या कालखंडात त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात एक ख्यातनाम फौजदारी वकील म्हणून अतिशय जबाबदारीने आणि निष्ठेने काम पाहिलं. दरम्यान, त्यांच्या घरगुती आयुष्यात त्यांचा मुलगा लहान असल्यामुळे त्यांना काही काळ वकिलीच्या व्यवसायातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेणं गरजेचं ठरलं. नेमक्या याच विश्रांतीच्या काळात त्यांच्या लहानपणापासूनच्या सुप्त आवडीला, म्हणजेच शिवणकामाला व्यावसायिक रूप देण्याचा एक विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. सन २०१४ मधील दिवाळीच्या सणासाठी त्यांनी बाहेरून शिवून घेतलेला एक ब्लाऊज ऐन सणाच्या वेळी नेमका अंगाला व्यवस्थित बसला नाही आणि त्याचं फिटिंग अजिबात बरोबर नव्हतं. बऱ्यापैकी पैसे खर्च करूनही बाजारात अपेक्षेप्रमाणे आणि मनासारख्या दर्जाचा ब्लाऊज मिळत नाही, ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. यावर केवळ तक्रार करत बसण्याऐवजी त्यांनी स्वतःच उत्तम दर्जाच्या कापडाचे, अचूक फिटिंगचे आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीतील रेडिमेड ब्लाऊज तयार करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. अशा प्रकारे ‘पिपा क्रिएशन’ या छोट्या व्यवसायाची अत्यंत हसतखेळत आणि जिद्दीने सुरुवात झाली.

स्वतःला आलेल्या एका छोट्याशा अडचणीचं त्यांनी अत्यंत सकारात्मकतेने एका मोठ्या संधीत रूपांतर केलं. ग्राहकांना नेमकी कोणती फॅशन आणि कसा दर्जा हवा आहे, याचा बारकाईने विचार करून आपल्या व्यवसायाची दिशा ठरवणं, हा त्यांच्या या संपूर्ण उद्योजकीय प्रवासातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा टप्पा ठरला. उत्तम आणि उच्च दर्जाचं कापड, डोळ्यांत भरणाऱ्या आकर्षक डिझाइन्स, शरीरावर चपखल बसणारं योग्य फिटिंग आणि खिशाला परवडणारी वाजवी किंमत ही ‘पिपा क्रिएशन’च्या प्रत्येक ब्लाऊजची अत्यंत प्रमुख आणि ठळक वैशिष्ट्यं आहेत. ग्राहकांकडून त्यांच्या ब्लाऊजच्या फिटिंगबाबत आणि गुणवत्तेबाबत भरभरून मिळणारे सकारात्मक अभिप्राय आणि त्यातून मिळणारं असीम समाधान यामुळे प्रिया पाटील यांना दररोज नव्याने काम करण्याची एक नवी ऊर्जा आणि उमेद मिळते. ग्राहकांचा अफाट विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आपल्या खऱ्या आयुष्याचं आणि व्यवसायाचं खरंखुरं यश असल्याचं त्या अत्यंत नम्रपणे सांगतात.

विशेष म्हणजे, त्यांच्या या छोट्या उद्योगाला ‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या माध्यमातून अत्यंत मोलाची आणि भक्कम साथ मिळाली. या प्रसिद्ध आणि विश्वासू व्यासपीठावरून त्यांच्या उत्पादनांची अगदी दिमाखात विक्री केली जाऊ लागली. एकेकाळी स्वतःच्या घरामधूनच अत्यंत संथपणे सुरू झालेला हा व्यवसाय आज विस्तारत असताना त्यांनी परिसरातील जवळजवळ सहा ते सात होतकरू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबीयांचं अतिशय मोलाचं आणि भक्कम सहकार्य नेहमीच त्यांना प्रेरणा देणारं होतं. स्वतःच्या लहानपणापासूनच्या आवडीला एका यशस्वी व्यवसायाचं रूप देता देता परिसरातील इतर गरजू महिलांसाठी रोजगाराची नवी दारं खुली करणं, हा त्यांच्या या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाचा अतिशय कौतुकास्पद भाग आहे.

वकिली क्षेत्रातील दांडगा अनुभव, शिवणकामाची निखळ आवड आणि व्यवसायात राखलेलं सातत्य यांच्या बळावर प्रिया पाटील यांनी समाजात आपली एक वेगळी आणि दबदबा असलेली ओळख निर्माण केली. एका पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाचा आणि अनुभवाचा प्रवास दुसऱ्या एका अनोळखी क्षेत्रातील यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्दीत कसा रूपांतरित होऊ शकतो, याचं त्या उत्तम आणि जिवंत उदाहरण आहेत. आता त्यांचं पाऊल आणखी पुढे पडत असून लवकरच नाशिक शहरात स्वतःचं एक भव्य बुटीक सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. स्वतःच्या आवडीला मेहनतीची जोड देऊन आर्थिक स्वावलंबन साधणं आणि सोबतच इतर महिलांनाही हक्काचा रोजगार मिळवून देणं हा विचार आजच्या काळात खरोखरच खूप मोलाचा आहे. ‘पिपा क्रिएशन’च्या माध्यमातून त्यांनी आपली अफाट जिद्द, अपार मेहनत आणि स्वतःवरील अतूट आत्मविश्वासाच्या बळावर एक यशस्वी उद्योजिका बनून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. शिक्षण आणि करिअर यांच्यातील सर्व पारंपरिक चौकटींना बाजूला सारून स्वतःसाठी एक नवी आणि अनोखी वाट तयार करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी त्यांचा हा संपूर्ण प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरतो. आयुष्यात नेहमीच योग्य आणि सोप्या संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्याच्या आणि कष्टाच्या जोरावरच हव्या त्या संधी कशा निर्माण कराव्यात, हा एक मोलाचा संदेश त्यांच्या या यशातून संपूर्ण समाजाला मिळतो.

......................

सॉफ्टवेअर इंजिनिअर ते फॅशन डिझायनर

आयुष्यातील वाटा आणि वळणं ही माणसाला नेहमीच एका नव्या पर्वाकडे घेऊन जातात, पण त्या अनाकलित वाटेवर पाऊल ठेवण्याचं धाडस मोजकेच जण दाखवू शकतात. संगणकाच्या कोड, अल्गोरिदम आणि तांत्रिक जगात रमून प्राध्यापक व सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली मोहर उमटवणारी एक प्रतिभावंत महिला, जेव्हा संसाराच्या व्यापातून पुन्हा स्वतःच्या अंतर्मनातील कलाकाराला साद घालते, तेव्हा एक नवा इतिहास घडतो. सई रत्नपारखी यांची ही गोष्ट संगणकाच्या पडद्यापासून सुरू होऊन थेट फॅशनच्या रंगीबेरंगी आणि तेजाळलेल्या विश्वात येऊन पोहोचते. लहानपणी कागद आणि पेन्सिलशी मैत्री करणारी ही तरुणी आज ‘आबंध आर्ट्स’ या आपल्या ब्रँडच्या माध्यमातून लाखोंच्या उलाढालीची शिल्पकार ठरली आहे, जी कोणत्याही व्यावसायिक पार्श्वभूमीशिवाय केवळ जिद्दीच्या जोरावर यशाची नवी शिखरं सर करत आहे.

मूळच्या पुणेकर असणाऱ्या सई रत्नपारखी यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये बी.ई. आणि एम.ई.पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलं. तांत्रिक ज्ञानाची शिदोरी पाठीशी असल्यामुळे त्यांनी पुण्याच्या नामांकित वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन वर्षं प्रयोगशाळा प्रशिक्षक म्हणून, त्यानंतर एका सॉफ्टवेअर कंपनीत आणि पुढे एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून दोन वर्षं महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. संगणक क्षेत्रात तब्बल सहा वर्षांचा हा यशस्वी अनुभव गाठीशी असतानाच, संसाराच्या वाटेवर लग्नामुळे त्यांच्या कारकीर्दीत सुमारे दहा वर्षांचा मोठा खंड पडला. या काळात त्यांनी पूर्णपणे मुलांच्या संगोपनाला आणि संसाराला प्राधान्य दिलं. एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे करिअरला दिलेली विश्रांती, यामुळे अनेकांच्या आयुष्यातील कला व महत्त्वाकांक्षा मागे पडतात; मात्र सई यांच्यातील कलावंत आतून जिवंत होता. २०१६ मध्ये मुलांच्या शाळेच्या वेळेत त्यांनी आपल्या सुप्त गुणांना पुन्हा उजाळा देण्याचं ठरवलं. त्यांनी रंग आणि कुंचल्याशी पुन्हा नातं जोडत टी-शर्ट आणि स्टोलवर सुंदर कलाकृती साकारण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कल्पकतेला आणि वेगळ्या शैलीला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळू लागला आणि इथूनच त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचे खरे बीजरोपण झाले.

छंदाचं रूपांतर व्यवसायात करताना सुरुवातीला अनेक आव्हानं होती, कारण मूळची तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या सई यांच्याकडे कोणतीही व्यावसायिक किंवा व्यापारी पार्श्वभूमी नव्हती. कापडाची प्रत ओळखणं, अचूक डिझाइन तयार करणं, फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं आणि बाजारपेठेचे बदलणारे प्रवाह समजून घेणं, या सर्व गोष्टी त्यांनी स्वतःच्या अनुभवातून शिकल्या. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, नाशिक, गोवा, बेंगळुरू आणि अगदी दुबईपर्यंतच्या विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी आपला ग्राहकवर्ग तयार केला. कोविड काळातील दोन वर्षं सोडली, तर २०२३ पर्यंत त्यांनी प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संवाद साधला आणि आजही त्यांचे ते ग्राहक अत्यंत आदराने व विश्वासाने त्यांच्याशी जोडलेले आहेत. पारंपरिक भारतीय कला आणि आधुनिक फॅशन शैली यांचा सुवर्णसंगम, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स आणि प्रत्येक उत्पादनातील नावीन्य हेच ‘आबंध आर्ट्स’चं सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरलं. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तो त्यांचा परिवार. विशेषतः त्यांचे पती हरीश यांनी मुलांच्या शाळेपासून ते घराच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांपर्यंत सर्व काही स्वतः सांभाळलं, जेणेकरून सई यांना त्यांच्या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता आलं. कुटुंबाची ही साथ आणि स्वतःच्या कष्टांवर असलेला दृढविश्वास याच्या जोरावर त्यांनी यशाचा मार्ग सुकर केला.

या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून २०२३ मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूडमधील वर्दळीच्या करिष्मा चौक परिसरात स्वतःचं स्वतंत्र दुकान सुरू केलं. त्यानंतर आता २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील मुख्य आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या कापड बाजारपेठेतील कुमठेकर रस्त्यावर एका भव्य शोरूमचा शुभारंभ करण्याची त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. या नव्या विस्ताराच्या माध्यमातून तब्बल दोन ते तीन कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचे मोठे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवलं आहे आणि भविष्यात पुण्यासह महाराष्ट्रातील अन्य प्रमुख शहरांमध्येही आपल्या ब्रँडच्या शाखा विस्तारण्याचा त्यांचा स्पष्ट मानस आहे. आज त्यांची वार्षिक उलाढाल ७५ लाख रुपयांच्या टप्प्यावर पोहोचली असून, संगणकाच्या स्क्रीनमागे कोड लिहिणाऱ्या एका प्राध्यापिकेचे फॅशनविश्वातील हे कर्तृत्व थक्क करणारे आहे. “आपली आवड जोपासायची असेल, तर प्रचंड काम करण्याची आणि झोकून देण्याची मानसिक तयारी हवी असते. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना उंबरठा ओलांडताना अनेकदा संकोच वाटतो किंवा भीती वाटते; परंतु विचारांमध्ये कमालीची स्पष्टता आणि मनाशी काहीतरी करून दाखवण्याचा पक्का निर्धार असेल, तर जगातली कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही,” असा प्रेरित करणारा संदेश त्या महिलांना देतात. संगणकाच्या यांत्रिक युगातून फॅशनच्या सर्जनशील विश्वात त्यांनी घेतलेली ही झेप केवळ एका करिअर बदलाची गोष्ट नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवर अतूट विश्वास ठेवून शून्यातून विश्व कसं उभं करावं, याच्या त्या दीपस्तंभ ठरल्या आहेत.

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड