समाजचिंतन
जगदीश काबरे
धार्मिक परंपरा जपत असताना तरुणांचे जीव जाणे, ही अभिमानाची नव्हे तर चिंतेची बाब आहे. अपघातातील मृत्यूला बलिदानाचे स्वरूप देऊन भरपाई मागण्यापेक्षा तरुणांना रोजगार, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळणे अधिक महत्त्वाचे नाही का? संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली तरुणांचे प्राण जाण्यापेक्षा त्यांचे जीवन सुरक्षित ठेवणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.
तुळजापूरहून देवीची ज्योत आणण्यासाठी निघालेल्या चार तरुणांना कंटेनरने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर एका महाशयांनी अशी भूमिका मांडली की, दहीहंडीच्या थरावरून पडून गोविंदा जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याला जशी भरपाई मिळते, तशीच भरपाई देवीची ज्योत आणणाऱ्या तरुणांनाही मिळावी. कारण हे तरुण बेरोजगार असतात. त्यांच्या मागे असलेल्या वृद्ध आईवडिलांना तेवढाच आधार मिळेल. शिवाय, आपली संस्कृती टिकावी म्हणून त्यांनी बलिदान दिले आहे! या भूमिकेतील माणुसकीचा भाग समजण्यासारखा आहे. अपघातात कुटुंबातील कर्ता किंवा कमावता सदस्य गमावल्यामुळे निर्माण होणारे आर्थिक संकट गंभीर असते. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, या मदतीचे समर्थन करण्यासाठी मृत तरुणांनी संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान दिले, असा दावा करण्याची गरज काय?
अपघातात मृत्यू होणे आणि एखाद्या उद्दिष्टासाठी जाणीवपूर्वक प्राणार्पण करणे, या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे तरुण श्रद्धेने देवीची ज्योत आणण्यासाठी निघाले होते. वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. ही एक दुर्दैवी दुर्घटना आहे. त्यांच्या श्रद्धेचा आदर राखूनही या घटनेला संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणता येणार नाही. एखाद्या घटनेला धार्मिक महत्त्व देणे आणि तिचे वस्तुनिष्ठ स्वरूप समजून घेणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. समजा, हेच तरुण एखाद्या मित्राच्या लग्नाला जात असताना अपघातात मृत्युमुखी पडले असते, तर त्यांच्या मृत्यूला मित्रप्रेमासाठी दिलेले बलिदान म्हटले असते का? ते शेतावर कामाला जाताना मरण पावले असते, तर त्यांना कृषिसंस्कृतीचे रक्षक घोषित केले असते का? मग धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या तरुणांच्या मृत्यूला संस्कृतीच्या रक्षणाचे लेबल लावण्याची आवश्यकता काय? मृत्यूचे कारण बदलले, तरी मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे दुःख आणि त्यांच्यावर कोसळलेले आर्थिक संकट बदलत नाही. त्यामुळे भरपाईचा आधार मृत व्यक्तीची धार्मिक ओळख किंवा ती कोणत्या परंपरेत सहभागी होती, हा नसावा. झालेली हानी, कुटुंबाची परिस्थिती आणि लागू असलेले नियम यांच्या आधारे मदत मिळाली पाहिजे. देवीची ज्योत आणणारा तरुण असो, दहीहंडीत सहभागी झालेला गोविंदा असो, यात्रेला जाणारा भाविक असो किंवा रोजीरोटीसाठी कामावर निघालेला मजूर असो; प्रत्येकाच्या जिवाचे मूल्य समान आहे.
या युक्तिवादातील दुसरा मुद्दा अधिक विचार करण्यासारखा आहे की, हे तरुण बेरोजगार होते म्हणून त्यांच्या वृद्ध आईवडिलांना भरपाई मिळावी, असे म्हटले जाते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, ही रास्त अपेक्षा आहे. मात्र, बेरोजगारीचा उल्लेख केल्यामुळे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण किती आग्रही आहोत? त्यांच्या हाताला काम मिळावे, ते आर्थिक स्वावलंबी व्हावेत आणि त्यांच्या वृद्ध आईवडिलांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू नये, यासाठी आपण काय करतो? बेरोजगार तरुणाला रोजगार मिळावा, अशी मागणी करण्यापेक्षा त्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या आर्थिक मदतीची चर्चा अधिक होत असेल, तर आपल्या प्राधान्यक्रमांचा फेरविचार करायला हवा. अर्थात, कुणीही तरुण भरपाई मिळावी म्हणून मृत्यूला कवटाळत नाही. प्रश्न त्या तरुणांच्या हेतूचा नसून आपल्या सामाजिक दृष्टिकोनाचा आहे.
धार्मिक परंपरा जपण्याच्या नावाखाली तरुणांनी जीव धोक्यात घालावा आणि दुर्घटना घडल्यानंतर त्यांना संस्कृतीचे रक्षक घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांसाठी भरपाई मागावी, एवढाच आपल्या सामाजिक जबाबदारीचा आवाका आहे का? देवीची ज्योत आणण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे नाही का? या प्रवासाचे नियोजन कसे होते, आवश्यक खबरदारी घेतली होती का आणि दुर्घटना टाळण्यासाठी काय करता आले असते, याची चौकशी झाली पाहिजे. अपघाताची जबाबदारी कोणाची आहे, हे तपासाअंती कळेलच; मात्र, अशा घटनांमधून सुरक्षिततेचे धडे घेणे आवश्यक आहे. संस्कृती टिकवण्याचा अर्थ तिच्या परंपरांमध्ये सहभागी होणाऱ्या माणसांचे जीवन सुरक्षित ठेवणे हाही आहे. तरुणांनी श्रद्धा जपावी, सण-उत्सव साजरे करावेत, परंपरांमध्ये सहभागी व्हावे; पण या सगळ्यात त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूचे उदात्तीकरण करण्यापेक्षा अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे.
आपण अनेकदा तरुणांच्या मृत्यूला शौर्य, त्याग किंवा बलिदानाचे स्वरूप देतो. अशा गौरवोद्गारांमुळे दुःखी कुटुंबीयांना काही मानसिक आधार मिळत असेल; मात्र अपघातातील मृत्यूला बलिदान म्हणण्याची सवय लागली, तर त्या मृत्यूमागील परिस्थितीची चिकित्सा करण्याची गरजच आपण विसरून जाऊ. श्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या दुर्घटनेविषयी प्रश्न विचारणे म्हणजे श्रद्धेचा अपमान करणे नव्हे. उलट, श्रद्धेने सहभागी होणाऱ्या माणसांची सुरक्षितता महत्त्वाची मानणे हीच अधिक जबाबदार भूमिका आहे. दहीहंडीतील गोविंदा जखमी झाला किंवा मृत्युमुखी पडला, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, याला विरोध करण्याचे कारण नाही. पण धार्मिक कारणासाठी मृत्यू झाला म्हणूनच विशेष मदत मिळावी, असा निकष स्वीकारला तर इतर कारणांसाठी जीव गमावणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण होते. मदतीची व्यवस्था सर्वांसाठी सामान आणि न्याय्य असली पाहिजे.
म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो की, धार्मिक कार्यक्रमासाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरले, तर तो श्रद्धेचा उत्सव असतो; पण रोजगारासाठी तेच तरुण रस्त्यावर उतरले, तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ठरतो, अशी आपली सामाजिक मानसिकता तर झालेली नाही ना? तरुणांनी संस्कृतीच्या नावाने जीव गमावला, तर त्यांना बलिदानी म्हणायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबासाठी भरपाई मागायची; पण तेच तरुण जिवंतपणी रोजगार, शिक्षण आणि सुरक्षित भविष्य मागत असतील, तर त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, हा दुटप्पीपणा नाही का? संस्कृतीच्या रक्षणासाठी तरुणांनी प्राण गमावणे ही अभिमानाची गोष्ट मानण्यापेक्षा, संस्कृती जपत असताना त्यांचे प्राण जाऊ नयेत, अशी व्यवस्था निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या म्हणून मागणी करण्यापेक्षा तरुणांना जगताना रोजगार, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा, यासाठी समाजाने आग्रही असायला हवे.
शेवटी, संस्कृती माणसांसाठी असते की माणसे संस्कृतीच्या नावाने मरण्यासाठी असतात, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. कारण ज्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी तरुणांचे जीव जातात, त्या संस्कृतीला त्यांच्या जिवंतपणाची आणि सुरक्षिततेची किंमत कळते का, हाही प्रश्नच आहे.
लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com