शून्य सावली 
अक्षररंग

शून्य सावली

सावलीचे रहस्य उलगडणारी ही विज्ञान कथा..

नवशक्ती Web Desk

गोष्ट

प्रेमा खांडवे

सावलीचे रहस्य उलगडणारी ही विज्ञान कथा..

अरे चिंटू, उठ लवकर, शाळेला जायला उशीर होईल!’ आईचा आवाज कानावर पडताच चिंटू दचकून जागा झाला. “हो आई, उठतोय, उठतोय,” असे म्हणत चिंटूने घाईघाईने आवरले आणि तो शाळेसाठी पसार झाला.

शाळेच्या मधल्या सुट्टीत चिंटू आणि त्याचे मित्र—त्यांची संपूर्ण चांडाळ चौकडी—डबा खाण्यासाठी एकत्र जमली. डबा खाऊन झाल्यावर त्यांच्या गप्पांना उधाण आले. आजच्या गप्पांचा विषय होता ‘भूत’. पम्या मोठ्या उत्साहाने म्हणाला, “अरे यार, काल रात्री मला माझ्या आजोबांनी भुताची एक सॉलिड गोष्ट सांगितली.”

“ए पम्या, आम्हाला पण सांग ना!” साऱ्या मुलांनी गलका केला. पम्याने ती गोष्ट ऐकवली. चिंटूने लक्षपूर्वक ऐकले आणि गंभीर स्वरात विचारले, “अरे पम्या, तुझ्या आजोबांना भुताची सावली दिसली नाही का?”

पम्या म्हणाला, “तीच तर भुताची स्पेशालिटी आहे. भूत आजोबांच्या खांद्यावर बसले होते, पण भूत दिसत नव्हते. कारण या भुतांना सावलीच नसते!”

गम्प्या उद्गारला, “अरे हो यार, ही भूत एकदम सॉलिड स्मार्ट असतात! आपला थांगपत्ता लागू देत नाही. क्षणात दिसतात आणि लगेच गायब होतात. एकदम सस्पेन्स!”

एवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि सारी मुले वर्गात गेली. सुट्टी झाल्यावर चिंटू ऑटोने घरी निघाला. आज ऑटोवाल्याने त्याला थोड्या अलीकडेच सोडले. “चिंटू बाबा, आज तुला येथेच सोडतो, मला थोडी घाई आहे.”

“होय दादा, इथून जाईन मी घरी. काय दोन मिनिटांचे अंतर आहे,” असे म्हणत चिंटू दप्तर खांद्यावर लटकावून रमतगमत निघाला. पण त्याच्या डोक्यात पम्याचे विचार चालू होते. तो स्वतःशी म्हणाला, “काय ही भूत? काय तर म्हणे त्यांची सावलीच दिसत नाही. माझी पहा बरं, केवढी मोठी सावली दिसते!”

असा विचार करत त्याने अभिमानाने मान वर केली, लेकिन तिथे सावलीचा पत्ताच नव्हता. चिंटूची टरकली. “अरे हे काय झालं? माझी सावली कुठे गेली?” त्याने वरपासून खालपर्यंत स्वतःला न्याहाळले, पण सावली दिसेना.

“अरे देवा! मी भूतबीत झालो की काय? पण असं कसं झालं?” त्याला आठवले की, काल क्रिकेट खेळताना पिंपळाच्या झाडाखाली बॉल शोधायला तो बराच वेळ थांबला होता. दुपारचे बारा वाजले होते. “अरे देवा! तेव्हाच ते लबाड भूत माझ्या मानगुटीवर बसलं की काय? तरीच आज मला सकाळी उठवत नव्हतं.”

विचारांच्या भेंडोळ्यातच तो घरी पोहोचला. दारातच त्याचा दादा उभा होता. “काय रे चिंट्या, तुझा चेहरा का असा पडला आहे? शाळेत काही मारामारी झाली का?” चिंटूने नकारार्थी मान हलवली. दादाच्या आश्वासनात विरघळलेल्या चिंटूने विचारले, “दादा, भुतांना सावली असते का रे?”

चिंटूचा घाबरलेला चेहरा पाहून दादाला मजा वाटली आणि त्याने फिरकी घ्यायचे ठरवले. “हा, असेल.” दादा गंभीर चेहरा करून म्हणाला. चिंटू पुरता जाळ्यात अडकला. “खरं सांगू का दादा, आज माझी सावली दिसत नाही, त्यामुळे मला संशय येतोय की मी भूत झालोय!”

चिंटूने पिंपळाच्या खाली बॉल शोधण्याची कहाणी ऐकवली. दादा अधिक गंभीर होऊन म्हणाला, “अरे चिंट्या, त्यावेळी ते भूत तुझ्या मानगुटीवर बसलं असणार! ही भूत दिवसा अदृश्य असतात आणि रात्री प्रकट होतात. आता हे भूत घालवणे फार अवघड आहे. मांत्रिकाला बोलवावं लागेल, तो तुला झाडाला बांधून सटासट मारेल.”

चिंटूने रडवेल्या स्वरात विचारले, “दादा, मग आता मी काय करू?”

दादा म्हणाला, “आता माझी क्लासची वेळ झाली आहे, मी रात्री सांगेन. बाय!” दादा हसत निघून गेला.

आईने त्याला जेवायला बोलावले, पण आज चिंटूला जेवण गेले नाही. दुपारी आई व आजी झोपल्यावर, तो स्वयंपाकघरात शिरला. आईने केलेले लाडू काढताना डबा निसटला आणि डब्यातील पीठ त्याच्या अंगावर उडाले.

पिठाने पांढराफटक झालेला चिंटू एखाद्या भुतासारखा दिसत होता. पकडले जाण्याच्या भीतीने तो शेजारील सुमीच्या घरी गेला. चिंटूला बघताच सुमी ओरडली, “अरे भूत आलं, भूत!” आणि तिने धावत जाऊन दार बंद केले. दिवसभर ‘भूत-भूत’ या शब्दांनी चिंटूचा मेंदू शिणला होता. त्याने कसेबसे चार घास पोटात टाकले आणि तो बिछान्यावर येऊन बसला. बारा वाजायला तीन तास राहिलेत, या विचाराने तो उशीत तोंड लपवून रडू लागला.

तेथेच अभ्यास करत असलेली त्याची बहीण अपर्णाताई चिंटूजवळ आली. तिने विचारले, “अरे चिंटू, काय झालं रे?” चिंटूने रडत रडत संपूर्ण हकीकत सांगितली. ताईच्या सर्व लक्षात आले. तिने चिंटूचा गैरसमज दूर करण्याचे ठरवले.

“चिंटू, भूतबीत काही नसतं! आपण विज्ञान युगात राहतो,” असे सांगत ताईने तिचे आजचे कॉलेजमधले फोटो दाखवले. त्यात दुपारच्या १२ वाजता कोणाचीच सावली दिसत नव्हती. “बघितलंस, आमच्यापैकी कोणाचीही सावली दिसत नव्हती. मग आम्ही सगळ्या जणी भूत झालो का?”

चिंटूला हसू आले.

“ताई, रोज तर सावली दिसते, मग आजच का नाही?” चिंटूने विचारले.

“आजचा दिवस हा ‘शून्य सावली दिवस’ (Zero Shadow Day) म्हणून ओळखला जातो. या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता सूर्य माथ्यावर येतो. त्यामुळे उभ्या वस्तूंची सावली पायाखाली जाते.” ताईने सोप्या शब्दांत या खगोलीय चमत्काराबद्दल सांगितले.

चिंटूचा जीव भांड्यात पडला. “वा ताई! शून्य सावली दिवस तर लय भारी आहे! नाहीतर त्या दादानं मला भूत म्हणून घाबरवून टाकलं होतं. आता मी त्याला सांगतो!” तो म्हणाला.

ताई हसत म्हणाली, “आता डोक्यातलं भूत पळालं की नाही?”

चिंटू उत्साहाने म्हणाला, “नाही ग ताई, उद्या मी माझ्या मित्रांना या शून्य सावलीच्या अद्भुत विज्ञान चमत्काराची गोष्ट नक्की सांगणार आहे!”

“भले, शाब्बास चिंटोबा! शाब्बास!”

premakhandwe8@gmail.com

Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के