भारतीय संगीतविश्वातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अजरामर सुरांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या आशाताईंच्या जाण्याने केवळ संगीतसृष्टीच नव्हे, तर क्रीडा, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. सचिन तेंडुलकर, सायरा बानो, उषा उथुप, कैलाश खेर यांच्यासह अनेक नामवंतांनी भावुक शब्दांत आशाताईंना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
❝आशाजी आणि लताजींबरोबर आमच्या कुटुंबाचे घनिष्ठ नाते होते. ज्यावेळी गाण्याचे रेकॉर्डिंग मायक्रोफोनने होत असे त्यावेळी ऑर्केस्ट्रा संगीत वाजत असे आणि त्याचवेळी गायन केले जात असे. त्यावेळी रेकॉर्डिंगच्या दरम्यान आशाजी मला आत बोलवत असत आणि गाणे कसे गायचे ते सांगत असत. त्यांच्या आवाजाची जादू अद्भूत होती. आशाजींनी नेहमीच स्नेह आणि सन्मान दिला. त्यांच्यासारखे माणसे दुर्लभ असतात.❞ - सायरा बानो, अभिनेत्री
❝त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आता पंचमदा आणि त्यांची पुन्हा भेट होईल. त्यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांनी जो वारसा मागे ठेवला आहे तो अद्भूत आहे. निडर आणि सगळ्या भाषांमध्ये गाणारी गायिका म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांची गाणी सदैव आमच्याबरोबर राहतील.❞ - उषा उथुप, गायिका
❝आशाजी देशाच्या एक अनमोल खजिना होत्या. त्यांच्यासारखे मोठी माणसे खूपच कमी असतात. त्या आता आपल्या बरोबर नसल्या तरी त्यांचा आत्मा आणि आवाज सदैव आपल्याबरोबर राहील. त्यांची गायिकी, चेहऱ्यावरील हास्य आणि शिस्त येणाऱ्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन करत राहील.❞ - कैलाश खेर, गायक
❝नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, भक्तीसंगीत किंवा कॅबरे अशा सर्वच प्रकारांत त्यांनी गायकीचा आदर्श निर्माण केला.
त्यांचा आवाज केवळ अष्टपैलूच नव्हता, तर तो पाण्यासारखा प्रवाही आणि सहज होता. गाण्यातील त्यांनी व्यक्त केलेले भाव आणि भावना पुन्हा अनुभवणे कठीण आहे.❞ - राहुल देशपांडे, शास्त्रीय गायक
❝काही व्यक्ती अशा असतात ज्यांना आपण देवाच्या स्थानी मानतो आणि त्या अजरामर आहेत असे वाटते. आशाताई माझ्यासाठी नेहमीच अशा व्यक्तींपैकी एक होत्या. त्यांनी ९२ वर्षांचे वैभवशाली आयुष्य जगल्या तरी त्यांचे जाणे ही वस्तुस्थिती स्वीकारणे कठीण जात आहे.❞ - महेश काळे, शास्त्रीय गायक
❝आशा भोसले यांच्या निधनाने खरंच खूप मोठी हानी झाली आहेत. त्यांच्या सूरमयी आणि अनोख्या आवाजाला कोणीच कधी विसरू शकत नाही. मी लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आलो आहे. त्यांनी नेहमीच मला प्रेमाने वागवले आहे.❞ - अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
❝आशाताईंनी माझ्या 'जीवलगा' या चित्रपटात गाणी गायली आहेत. त्या आपल्यात आज नसल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांची गाणी आपल्या स्मृतीत कामय राहतील. आपण सगळे जण त्यांना कायम स्मरणात ठेवू.❞ - महेश कोठारे, दिग्दर्शक-अभिनेते
❝आशा भोसले यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला असून, हे केवळ चित्रपटसृष्टीचेच नाही तर संपूर्ण जगाचे नुकसान आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता असून ही अत्यंत दु:खद घटना आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार या दिग्गज गायकांच्या श्रेणीत भोसले यांचे स्थान आहे.❞ - आमीर खान, अभिनेता
❝आजचा दिवस भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशाताई म्हणजे कुटुंबच होत्या. आज या दुःखाचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. एका क्षणात हृदय निःशब्द होतं आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी दिलेल्या असंख्य सुरांमध्ये ते हरवून जातं.
असं वाटतंय जणू काळच थांबला आहे. पण त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या सदैव आपल्यासोबत राहतील. धन्यवाद ताई, आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही, आशा ताई.❞ - सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू