चेन्नई : भारताकडून ‘ऑस्कर २०२५’साठी किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अधिकृतपणे पाठवण्यात येणार आहे, अशी घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे.
भारताकडून ऑस्कर पाठवण्याच्या यादीत २९ चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचा हिट चित्रपट ‘ॲॅनिमल’, राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम सिनेमा ‘अट्टम’ आणि कान्स पुरस्कार विजेता ‘ऑल वी इमॅजिन ॲॅज लाइट’, ‘श्रीकांत’, ‘वझाही’, ‘थंगलन’, ‘उलोझुक्कू’ आदींचा समावेश होता. आसामी दिग्दर्शक जहानू बरुआ यांच्या नेतृत्वाखालील १३ सदस्य समितीने ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निवड एकमताने केली. अभिनेता आमिर खान व किरण राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
यंदा मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ या सिनेमाची सर्वच समीक्षकांनी प्रशंसा केली. ग्रामीण भागातील दोन वधूंची रेल्वे प्रवासात अदलाबदल होते. या चित्रपटाची कथा २००१ साली घडलेली आहे. ही कथा संपूर्ण व्यंगात्मक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शक किरण राव यांनी २०१० मध्ये ‘धोबी घाट’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर त्यांनी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.
‘लापता लेडीज’ चित्रपटात नीतांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम व गीता अग्रवाल-शर्मा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर २०२३ च्या ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’मध्ये करण्यात आला. या चित्रपटात भूमिका करणारे अभिनेता रवी किशन यांनी चित्रपटाचे संपूर्ण श्रेय किरण राव, आमिर खान, सहकलाकार व लेखकांना दिले आहे. या चित्रपटाची ‘ऑस्कर’साठी निवड होईल असे मला वाटले
नव्हते. आता संपूर्ण जगाला भारतीय समाजाचे विशेष करून ग्रामीण भारताचे दर्शन होऊ शकेल. कारण ८० टक्के भारत अजूनही गावात राहत आहे. भारतातील मुली कशा पुढे जात आहेत हे या चित्रपटातून पाहायला मिळेल, असे किशन म्हणाले.
आमच्या कठोर मेहनतीचे फळ - किरण राव
चित्रपटाच्या निर्मात्या व दिग्दर्शक किरण राव म्हणाल्या की, माझ्या चित्रपटाची निवड ‘ऑस्कर’साठी होणे हा मोठा सन्मान आहे. या चित्रपटाची निवड केल्याबद्दल मी निवड समितीचे आभार मानते. आमच्या संपूर्ण टीमने केलेल्या कठोर मेहनतीचे हे फळ आहे. आमच्या टीमने परिश्रम केल्याने ही कथा जिवंत झाली. सिनेमा हा कायमच माणसाला जोडणारा व सर्व सीमा पार करणारा व चर्चा सुरू करणारा ठरलेला आहे. हा चित्रपट भारताबरोबरच जगातील लोकांच्या पसंतीस उतरेल, असे राव म्हणाल्या.