चेन्नई : ज्येष्ठ तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे ८४ व्या वर्षी बुधवारी चेन्नई येथे निधन झाले. वृध्दापकाळाने उद्भवलेल्या विविध आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. भारतीराजा यांना सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार साऊथ फिल्मफेअर पुरस्कार, सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि एक नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. भारतीराजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत 'सोलवा सावन' , 'रेड रोज' आणि 'सवेरेवाली गाडी' यांसारख्या काही हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे.
भारतीराजा यांनी १९७७ मध्ये '१६ वयाथिनिले' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत ४० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तमिळ चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 'इयक्कुनर इमयम' ही पदवी देखील मिळाली.'रेड रोज' या चित्रपटात राजेश खन्ना आणि पूनम ढिल्लों यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'मींडम ओरु मारियाथाई' होता, जो २०२० साली प्रदर्शित झाला होता.