आंतरराष्ट्रीय

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अमीर हमजावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार; लाहोरमधील जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी

अमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा नेता मानला जातो.

Krantee V. Kale

लाहोर : पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक म्होरक्या आणि संस्थापक सदस्यांपैकी एक अमीर हमजा गुरुवारी लाहोरमध्ये पेको रोड, टीव्ही चॅनेलच्या कार्यालयाजवळ झालेल्या एका जीवघेण्या हल्ल्यात जखमी झाला. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कारवर बेछूट गोळीबार केला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री मोहसीन नक्वी यांच्या मालकीच्या ‘२४ न्यूज एचडी’ या खासगी टीव्ही चॅनेलच्या वाहनावर हा हल्ला झाला. या वाहनात चॅनेलच्या धार्मिक कार्यक्रमाचे निवेदक जस्टिस (निवृत्त) नझीर अहमद गाझी आणि अमीर हमजा प्रवास करत होते.

दोन अज्ञात सशस्त्र इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारवर गोळीबार केला. या हल्ल्यात अमीर हमजाच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, नझीर गाझी सुदैवाने बचावले आहेत. हमजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमीर हमजा कोण?

अमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा नेता मानला जातो. त्याला अमेरिकेने ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी त्याने लष्करच्या ‘विशेष मोहीम’ विभागाचे नेतृत्व केले आहे. २०१८ मध्ये जेव्हा पाकिस्तान सरकारने जमात-उद-दावावर बंदी घातली, तेव्हा हमजाने लष्करसाठी निधी गोळा करण्यासाठी एक नवीन गट तयार केला होता.

राजकीय पडसाद आणि तपास

हाफिज सईदच्या बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा असलेल्या ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हाफिज सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद याने एका निवेदनात म्हटले आहे की, भरदिवसा झालेला हा हल्ला पंजाब सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असून प्रशासनाचे हे अपयश आहे. दरम्यान, लाहोर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Mumbai : एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणुकीच्या प्रस्तावित प्रक्रियेचा कालबद्ध आराखडा सादर करण्याचे निर्देश

राज्यात आणखी ८ स्वयंचलित वाहन चाचणी मार्ग; RTOमध्ये व्हिडीओ आधारित मूल्यांकन यंत्रणा

‘नारीशक्ती’ पणाला! ‘आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान, दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार