इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू Photo : X
आंतरराष्ट्रीय

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मुलगी-जावई, सून-नातही ठार; खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणार - इराण

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या वृत्तसंस्थांनी याची पुष्टी केली असून, या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ इराणने घेतली असून त्यामुळे युद्ध चिघळण्याची शक्यता आहे.

Swapnil S

तेल अवीव/तेहरान

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या वृत्तसंस्थांनी याची पुष्टी केली असून, या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ इराणने घेतली असून त्यामुळे युद्ध चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य-पूर्वेतील या युद्धाचा फटका जगभरातील देशांना बसला असून अनेक देशांमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम धर्मीयांनी जोरदार निदर्शने केली.

इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर तेथील सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. रविवारीही तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि सरकारी इमारती असलेल्या परिसरात धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले. इराणी अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांत खामेनी यांच्यासह इराणच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला.

याआधी इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायल तसेच अमेरिकन तळ असलेल्या आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले. त्यावर इस्रायलने इराणच्या लष्करी व राजकीय नेतृत्वावर सातत्याने हवाई हल्ले सुरू ठेवण्याची घोषणा केली.

अमेरिकेचे तीन जवान ठार, ५ गंभीर जखमी

अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान तीन अमेरिकन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दूरदर्शनवरील संदेशात सांगितले की, खामेनी यांच्या मृत्यूनंतर नवीन नेतृत्व परिषद कामकाज सुरू करत आहे. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी एक-दोन दिवसांत नवीन सर्वोच्च नेत्याची निवड होईल, असे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना म्हटले की, कोणत्याही प्रतिहल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळेल, असे कृत्य त्यांनी करू नये. तसे केल्यास आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.

अबूधाबीत २ जणांचा मृत्यू

अबूधाबीमध्ये इराणी हल्ल्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मुख्य बंदर आणि प्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेलच्या बाह्यभागाचे मोठे नुकसान झाले. सौदी अरेबियाने रियाध आणि पूर्वेकडील भागांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला असून हे हल्ले निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. जॉर्डनने ४९ ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. कुवैत, बहरीन आणि कतार यांनीही क्षेपणास्त्रे अडवल्याचे म्हटले आहे.

इस्रायलने मुलींच्या शाळेवरील हल्ला नाकारला

दक्षिण इराणमध्ये एका मुलींच्या शाळेवर हल्ला झाल्याने किमान ११५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मात्र, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी या भागात कोणताही हल्ला केल्याचे नाकारले आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडनेही या वृत्ताची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

इराणी सैन्य राबवणार धोकादायक मोहीम

इराणी सैन्याने एका धोकादायक मोहिमेच्या सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. सैन्याने सांगितले की, हा हल्ला लवकरच सुरू होईल आणि प्रदेशातील व्याप्त क्षेत्रे तसेच अमेरिकेच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करेल.

भारतातून ८५४ विमानांचे उड्डाण रद्द

अमेरिका-इस्रायलचा इराणवर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी हल्ला सुरू आहे. युद्धाच्या दरम्यान मध्यपूर्वेतील परिस्थिती बिघडल्याने हवाई हद्द बंद झाल्याचा परिणाम दुबईपासून भारतापर्यंत दिसून येत आहे. भारतातून जगभरात उड्डाण करणाऱ्या सुमारे ८५४ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणी ड्रोन आदळला. या घटनेत ४ लोक जखमी झाले आहेत. भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू दुबईत अडकली आहे. सिंधू व्यतिरिक्त अभिनेत्री सोनल चौहान देखील दुबईत अडकली आहे.

बुर्ज खलिफा रिकामे करण्यात आले

दुबईतील प्रसिद्ध इमारत बुर्ज खलिफाजवळ ड्रोन हल्ला झाल्यानंतर खबरदारी म्हणून बुर्ज खलिफा रिकामे करण्यात आले असून त्याचे दिवे बंद करण्यात आले. तसेच हल्ल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम विमानतळावरील विमानांचे संचालन पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले.

इराणमध्ये 'डेथ टू अमेरिका' च्या घोषणा

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या रस्त्यांवर लोक शोक करताना दिसले. लोकांनी ‘डेथ टू अमेरिका’ आणि 'डेथ टू इस्रायल'च्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तरादाखल कारवाईची मागणी केली.

महाराष्ट्रातील ५० हजार मुस्लीम भाविक सौदीत अडकल्याची भीती

रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे भाविक तेथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुण्याचे ८४ विद्यार्थी दुबईत अडकले

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्याच्या एका नामांकित विद्यालयाचे ८४ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी एका शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते, मात्र तिथेच अडकून पडल्याने पालक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आखाती देशांवरील हल्ल्यांमुळे तेलाचे भाव भडकणार

इराणकडून इस्रायलसह अमेरिकन तळ असलेल्या आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाचा व्यापार होर्मूज सामुद्रधुनीच्या मार्गे केला जातो. त्यामुळे येथून होणारी तेल वाहतूक धोक्यात आल्यास तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

इस्रायलमध्ये ८ ठार, २८ जण जखमी

इस्रायलमधील तेल अवीव येथे क्षेपणास्त्रांचे स्फोट आणि ते निकामी करतानाचे मोठे आवाज ऐकू आले. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, बेइत शेमेश या मध्यवर्ती शहरातील एका सिनेगॉगवर झालेल्या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू आणि २८ जण जखमी झाले. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा १० वर पोहोचला आहे.

कराचीत अमेरिकन दूतावासावर हल्ला ; १० ठार

खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर रविवारी शेकडो निदर्शकांनी हल्ला केला. पोलिसांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर करून या जमावाला पांगवले. या चकमकीत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले.

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात निदर्शने

अयातुल्ला खामेनींच्या हत्येच्या निषेधार्थ जगभरासह भारतातही रविवारी मुस्लिमांनी जोरदार निदर्शने केली. मुंबईसह दिल्ली, लखनौ, हैदराबाद, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये खामेनींच्या मृत्यूनंतर निषेध निदर्शने करण्यात आली. मात्र, अमेरिका आणि इराणच्या काही भागांमध्ये लोकांनी या बातमीवर आनंदोत्सवही साजरा केला.

प्रबळ सत्ताधीश अयातुल्ला अली खामेनी

अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म १९ एप्रिल १९३९ रोजी इराणमधील धार्मिक शहर मशहद येथे एका मौलवी कुटुंबात झाला होता. ते इराणच्या शाहच्या धोरणांविरुद्ध होते आणि इस्लामिक शासनाचे समर्थन करत होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि शाहचे सरकार कोसळले. खोमेनी देशात परतले आणि त्यांनी नवीन इस्लामिक सरकार स्थापन केले. त्यावेळी खामेनी यांना क्रांतिकारी परिषदेत स्थान मिळाले आणि नंतर त्यांना उपसंरक्षण मंत्री बनवण्यात आले. १९८१ एका बॉम्बस्फोटात तत्कालीन राष्ट्रपतींचा मृत्यू झाला. यानंतर झालेल्या निवडणुकीत खामेनी प्रचंड बहुमताने निवडून इराणचे तिसरे राष्ट्रपती बनले. १९८९ मध्ये खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांना देशाचे सर्वोच्च नेते म्हणजेच 'रहबर' बनवण्यात आले. यासाठी संविधानात बदलही करण्यात आले.

खामेनींचा उत्तराधिकारी कोण?

१९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते असलेले खामेनी यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या धोरणांवरील अंतिम अधिकार होते. त्यांच्या मृत्यूमुळे सत्तेतील पोकळी निर्माण झाली असून त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ध्रुवीकरणाच्या राजकारणात हरवत चाललेले बंधुत्व

Holi 2026: यंदा होलिका दहनाचा मुहूर्त अवघा १२ मिनिटांचा; २ की ३ मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख अन् अचूक वेळ

मार्च महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, २ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!