बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका पबमध्ये सोमवारी (दि.१३) भीषण आग लागून २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही क्षणांतच संपूर्ण पबमध्ये आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळावरील धक्कादायक दृश्ये समोर आली असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
क्षणात पसरल्या आगीच्या ज्वाळा
उत्तर बँकॉकमधील 'ना लाडप्राओ' पबमध्ये मध्यरात्री आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण पबमध्ये आगीने भीषण रूप धारण केले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये पबमधून उसळणाऱ्या ज्वाळा, दाट काळा धूर आणि जीव वाचवण्यासाठी धावपळ करणारे लोक दिसत आहेत.
सर्किट ब्रेकरमधून धूर, त्यानंतर स्फोट
थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पबमध्ये कार्यक्रम सादर करणाऱ्या एका संगीतकाराने स्टेजजवळील सर्किट ब्रेकरमधून धूर निघताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला, मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापला.
स्वच्छतागृहात सापडले मृतदेह
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृतदेह पबच्या मागील बाजूला असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये आढळले. धुरामुळे बाहेर पडता न आल्याने अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
२२ जणांची प्रकृती गंभीर
बँकॉकचे राज्यपाल चाडचार्ट सित्तीपुंत यांनी सांगितले की, ६३ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी २२ जण गंभीर जखमी आहेत. काहींकडे ओळखपत्र नसल्याने तसेच अनेक जण बेशुद्ध अवस्थेत असल्याने मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाने सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत पबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घटनास्थळी नातेवाईकांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र नोंदणी केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
बँड सदस्याचा मृत्यू, एक बेपत्ता
गायिका सुकन्या वाँगवाँगवाई यांनी सांगितले की, त्यांच्या बँडमधील काही सदस्य त्या पबमध्ये कार्यक्रम सादर करत होते. त्यापैकी एका सदस्याचा मृत्यू झाला असून, तिघांवर उपचार सुरू आहेत. आणखी एक सदस्य अद्याप बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही घडल्या अशा दुर्घटना
थायलंडमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या भीषण दुर्घटना घडल्या आहेत. २०२२ मध्ये देशाच्या पूर्व भागातील एका म्युझिक पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी २००९ मध्ये बँकॉकमधील सांतिका नाईटक्लबमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला लागलेल्या आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.