आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये इंधन दरात पुन्हा वाढ; इंधन संकट गडद होण्याची भीती

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने चीनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे.

Swapnil S

बीजिंग : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने चीनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाने (एनडीआरसी) मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली असून नवीन दर बुधवारपासून लागू होणार आहेत.

एनडीआरसीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति टन ४२० युआन (६१ डॉलर) आणि डिझेलच्या दरात प्रति टन ४०० युआन (५८ डॉलर्स) वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. यापूर्वी २३ मार्च रोजी चीनने इंधन दरात वाढ केली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या इंधन संकटाचा सामना करण्यासाठी ही तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील इंधनाचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी चीनमधील प्रमुख तीन तेल कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्याचे आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चीन पेट्रोलियम कॉर्पोरेशन, चीन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन आणि चीन नॅशनल ऑफशोअर ऑईल कॉर्पोरेशन या कंपन्यांनी बाजारपेठेतील स्थिरता राखण्यावर भर द्यावा, असे एनडीआरसीने स्पष्ट केले आहे.

चिनी सरकार इंधन दराबाबतच्या धोरणांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी बाजारपेठेतील देखरेख आणि तपासणी वाढवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून बाजारपेठेत सुसूत्रता राखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे.

चीनमध्ये तेलाची ७० टक्के आयात

चीन आपल्या गरजेच्या ७० टक्के कच्चे तेल आयात करतो, ज्यातील सुमारे ३० टक्के तेल पुरवठा हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे या भागात होणाऱ्या संघर्षाचा चीनच्या ऊर्जा सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा १०० कोटींच्या निविदा; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर देणार

घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू

सुनेत्रांविरुद्ध उमेदवार देण्याचा काँग्रेसला हक्क; संजय राऊत यांच्याकडून समर्थन; पार्थ पवारांवर टीका

वाढीव महागाई भत्त्यासाठी निवासी डॉक्टर आक्रमक; दोन दिवसांत परिपत्रक जारी करा; अन्यथा शुक्रवारपासून आंदोलन

यंदा पाऊसही रुसणार; 'स्कायमेट'चा अंदाज