आंतरराष्ट्रीय

चीनच्या हुनान प्रांतात फटाका कारखान्यात स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जण जखमी

मध्य चीनमधील हुनान प्रांतात एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

Swapnil S

हुनान : मध्य चीनमधील हुनान प्रांतात एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्फोट सोमवारी सायंकाळी सुमारे ४.४३ वाजता हुशेंग फटाके निर्मिती आणि डिस्प्ले करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात झाला. हा कारखाना हुनानची राजधानी चांग्शा येथील प्रांतीय स्तरावरील लियुयांग शहरात आहे. बचावकार्यासाठी पाच पथकांमधून ४८० हून अधिक बचावदल कर्मचारी पाठवण्यात आले असून तीन बचाव रोबोटही तैनात करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या परिसरात दोन ब्लॅक पावडरचे गोदामही आहेत. त्यामुळे बचाव पथकांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून दुसरा अपघात टाळण्यासाठी बफर झोन तयार केला आहे.

लियुयांग शहर फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध असून, अहवालांनुसार ते जगातील सर्वात मोठे फटाके उत्पादन करणारे शहर मानले जाते. चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये आणि दुकानांमध्ये यापूर्वीही स्फोटाच्या घटना घडल्या असून त्या अनेकदा जीवघेण्या ठरल्या आहेत.

लोकांना केले स्थलांतरित

बचाव पथकांना फटाका कारखान्याच्या ३ किलोमीटर परिसरातील सर्व लोकांना स्थलांतरित करावे लागले. बचावकार्यादरम्यान दुसरे अपघात टाळण्यासाठी परिसरात ओलावा कायम ठेवण्यासारखे उपायही करण्यात आले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अद्याप बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आणि जखमींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कारणांची चौकशी सुरू

मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत, बचाव पथकांनी पहिल्या टप्प्यातील शोध मोहिमेनंतर मृत आणि जखमींची संख्या निश्चित केली होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील शोधकार्य सुरू आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने बचावकार्यात मदत करण्यासाठी तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली आहे. न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रभारी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

Panvel : दहीहंडीच्या उत्सवादरम्यान ६-७ जणांना विजेचा शॉक; अचानक झालेल्या प्रकाराने उडाली धावपळ; VIDEO व्हायरल

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ