चिनी कंपनीने आणला भावनिक सोबत देणारा रोबो (Photo-X/RoboHub)
आंतरराष्ट्रीय

चिनी कंपनीने आणला भावनिक सोबत देणारा रोबो

माणूस आणि कृत्रिम रोबोट यातील फरक आता कमालीचा पुसट झाला आहे. चीनमधील अग्रगण्य रोबोटिक्स कंपनी 'यूबीटेक'ने त्यांच्या 'यू१' या ह्युमनॉइड (हुबेहूब मानवासारख्या दिसणाऱ्या) रोबोट मालिका अधिकृतपणे व्यावसायिक विक्रीसाठी बाजारात आणली आहे.

Swapnil S

शेनझेन : माणूस आणि कृत्रिम रोबोट यातील फरक आता कमालीचा पुसट झाला आहे. चीनमधील अग्रगण्य रोबोटिक्स कंपनी 'यूबीटेक'ने त्यांच्या 'यू१' या ह्युमनॉइड (हुबेहूब मानवासारख्या दिसणाऱ्या) रोबोट मालिका अधिकृतपणे व्यावसायिक विक्रीसाठी बाजारात आणली आहे. या लाँचिंगमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, रोबोटिक्स तंत्रज्ञान आता केवळ कारखान्यांमधील कामापुरते मर्यादित न राहता थेट माणसाच्या घरात भावनिक सोबती म्हणून प्रवेश करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 'यू१' मालिका हा जगातील पहिला पूर्ण आकाराचा आणि अति-वास्तववादी रोबोट आहे, ज्याची निर्मिती प्रामुख्याने मानवी एकटेपणा दूर करण्यासाठी आणि घरगुती कामात मदत करण्यासाठी करण्यात आली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या घडामोडीवर प्रकाश टाकत म्हटले आहे की, कंपनीने या रोबोटचे मार्केटिंग एका 'नेहमी एकनिष्ठ राहणारा' आणि भावनिक आधार देणारा सोबती म्हणून केले आहे.

रोबोट वेगळा का?

भूतकाळातील थंड, धातूच्या आणि भावनाहीन रोबोट्सच्या तुलनेत 'यू १' पूर्णपणे वेगळा आहे. यात कंपनीने स्वतःचे खास 'इमोशनल लार्ज लँग्वेज मॉडेल' वापरले आहे. त्यामुळे हा रोबोट केवळ घरातील कामेच करत नाही, तर समोरच्या माणसाच्या २० वेगवेगळ्या भावना रिअल-टाइममध्ये ओळखू शकतो, समजू शकतो आणि त्यानुसार प्रतिसाद देऊ शकतो. त्याची शारीरिक ठेवणही थक्क करणारी आहे. या रोबोटवर अतिशय जिवंत वाटणारी सिलिकॉनची त्वचा बसवण्यात आली आहे, ज्यामध्ये त्वचेची छिद्रे आणि शरीराची ऊब जाणवते. माणसाच्या हातासारखा स्पर्श जाणवावा यासाठी त्याचे हात अत्यंत बारकाईने डिझाइन केले आहेत. हा रोबोट चेहऱ्यावर हुबेहूब मानवी भाव आणू शकतो, उत्तम संवाद साधू शकतो आणि घरातील दैनंदिन व्यवस्थापन हाताळू शकतो.

बोलण्याशिवाय ओळखणार गरजा

या रोबोटशी संपर्क साधण्यासाठी कोणत्याही 'वेक वर्ड'ची (उदा. अलेक्सा किंवा हे गुगल) गरज पडत नाही. आपल्या घरातील सेन्सर्स आणि स्थानिक बुद्धिमत्तेच्या जोरावर तो स्वतःहून घरातील वातावरण आणि गरजा समजून घेतो. औषध घेण्याची वेळ आठवण करून देणे, कॅलेंडरवरील अपॉइंटमेंट्स व्यवस्थापित करणे आणि घरातील इतर स्मार्ट उपकरणे नियंत्रित करणे, ही सर्व कामे तो अत्यंत सहानुभूतीपूर्वक आणि नैसर्गिक संवादातून करतो.

बाजारात प्रचंड मागणी

हा प्रकार जरी विज्ञापटासारखा वाटत असला, तरी बाजारातून याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. एका अहवालानुसार, चीनच्या 'जेडीडॉट कॉम' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ३,००० युआन अनामत रक्कम ठेवून याचे प्री-बुकिंग सुरू झाले होते. लाँचिंगच्या दिवसापर्यंत तब्बल १३,३६१ पेक्षा जास्त रोबोट्सची नोंदणी झाली असल्याची माहिती यूबीटेकचे संस्थापक झोउ जियान यांनी दिली. या रोबोट्सची पहिली मोठी डिलिव्हरी १६ सप्टेंबर रोजी ग्राहकांना पाठवली जाणार आहे.

किंमत किती

हा मानवी पर्याय खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याचे दोन मुख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. 'लाईट' व्हेरियंटची किंमत साधारण १७,६०० डॉलर (सुमारे १६.७६ लाख रुपये) पासून सुरू होते. यात मूलभूत भावनिक ट्रॅकिंग, संवाद क्षमता आणि एकसमान शारीरिक रचना मिळते. 'प्रीमियम' व्हेरियंटची किंमत थेट १ लाख ४५ हजार ७०० डॉलर (सुमारे १.३९ कोटी रुपये) पर्यंत जाते. यामध्ये ग्राहकाच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड फीचर्स मिळतात. ग्राहक अगदी एखाद्या विशिष्ट व्यक्तीसारखा किंवा सेलिब्रिटीसारखा हुबेहूब चेहरा आणि शरीररचना या रोबोटला देऊ शकतात.

आशेचा किरण

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' आणि 'चॅनेल न्यूज एशिया'सारख्या प्रादेशिक आर्थिक वृत्तवाहिन्यांनी या घडामोडीला पूर्व आशियातील घटत्या जन्मदराशी आणि लोकसंख्येच्या गंभीर समस्येशी जोडले आहे. 'सिक्सथ टोन'च्या अहवालानुसार, सध्या एकटे राहणारे तरुण आणि वृद्ध नागरिक या रोबोटचे मुख्य खरेदीदार आहेत. भविष्यात लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असताना, हे ह्युमनॉइड रोबोट्स केवळ चैनीची वस्तू न राहता समाजाची गरज बनण्याची शक्यता आहे. येत्या दशकात हे रोबोट्स आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी भूमिका बजावतील आणि केवळ गप्पा मारणारे सोबती न राहता, वृद्धांची काळजी घेणारे, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारे आणि वैद्यकीय आधार देणारे महत्त्वाचे सहाय्यक ठरतील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी