वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डन्ट डिनरदरम्यान झालेल्या गोळीबारातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स बालंबाल बचावले आहेत. संशयित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव कोल टॉमस ॲॅलन आहे. तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असल्याचे समजते.
हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी हा प्रकार झाला. गोळीबार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवरून शनिवारी रात्री झालेल्या या गोळीबाराची माहिती दिली. मात्र ट्रम्प यांच्या आजूबाजूला इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना हल्लेखोर त्यांच्या इतक्या जवळ पोचू कसा शकला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
व्हाईट हाऊसमध्ये वृत्तांकन करणाऱ्या वार्ताहर संघटनेसाठीच्या मेजवानीचा हा कार्यक्रम दरवर्षी होतो व त्यात अमेरिकेचे अध्यक्ष सहभागी होऊन भाषण करतात. कालच्या कार्यक्रमाला ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि ट्रम्प यांच्या सरकारमधील महत्त्वाचे चेहरे यावेळी उपस्थित होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच गोळीबाराचा आवाज झाल्याने पळापळ झाली.
सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ट्रम्प यांना सुखरूप बाहेर काढले. बंदुकधारी सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांच्या दिशेने धाव घेतली. गोळीबार झाल्यानंतर अनेक लोक जीव वाचवण्याकरिता टेबलाखाली लपले. भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनाही सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले.
या हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित होता आणि सर्वांना एकत्र आणणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाआधी सुरक्षेच्या धोक्याबाबत आमच्या टीमकडे कोणतीही माहिती नव्हती. मात्र कार्यक्रम सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीने शस्त्रांसह सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. त्याला आपल्या सुरक्षा यंत्रणेनं वेळीच रोखलं. एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली असून बुलेटप्रुफ जॅकेट परिधान केलं असल्याने त्या अधिकाऱ्याचा जीव वाचला आहे. मी या अधिकाऱ्याशी बोललो असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
सर्व पाहुणे सुरक्षित
या डिनरला जवळपास सुमारे २,६०० पाहुणे उपस्थित होते. सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांच्या माहितीनुसार, “डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला, उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व कॅबिनेट मंत्री सुरक्षित आहेत. ट्रम्प यांनी कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याची सूचना केली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार तो थांबवण्यात आला. हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत पुन्हा आयोजित केला जाईल. हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून तपास सुरू आहे.”
दुसरा हल्ला, पुन्हा राजकीय चर्चा
यापूर्वी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारसभेत १३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्वानियामध्ये त्यांच्यावर गोळी झाडण्याचा कथित प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण होऊन निवडणुकीत त्यांना काहीसा फायदा झाला होता. त्यानंतरचा हा दुसरा हल्ला आहे. सध्या इराण युध्दावरून ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत चहूबाजूंनी टीका होत आहे. त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे खासदारही त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्याच वेळी अतिसुरक्षित परिसरात हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.
काश पटेल यांची उचलबांगडी?
व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर एफबीआय संचालक काश पटेल यांची लवकरच हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय वंशाचे काश पटेल हे ट्रम्प यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते विविध वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हकालपट्टीच्या चर्चा सुरू असताना, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी मात्र ‘राष्ट्राध्यक्षांचा अजूनही पटेल यांच्यावर विश्वास आहे,’ असे सांगत पटेल यांचे समर्थन केले आहे.