व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध X | प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध

ओमान किनारपट्टीजवळ ‘जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर ११ भारतीय होते. त्यापैकी १० जणांना सुरक्षित वाचवण्यात यश मिळाले, तर एक भारतीय बेपत्ता झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ले सुरू केले आहेत.

Swapnil S

मस्कत : ओमान किनारपट्टीजवळ ‘जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर ११ भारतीय होते. त्यापैकी १० जणांना सुरक्षित वाचवण्यात यश मिळाले, तर एक भारतीय बेपत्ता झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ले सुरू केले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, मस्कतमधील भारतीय दूतावास हे ओमान सरकारसोबत बेपत्ता भारतीयाचा शोध आणि बचाव मोहिमेवर सतत लक्ष ठेवून आहे. भारताने या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारही मानले.

भारताने म्हटले की, या क्षेत्रातील व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे त्वरित थांबले पाहिजे. तसेच तणाव कमी करण्याचे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर कोणत्याही अडथळ्याविना जहाजांची वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत झाली पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

घरात राहा-अमेरिकन दूतावासाचे आवाहन

ओमानमधील अमेरिकन दूतावासाने डुकम शहर आणि मुसंदम गव्हर्नरेटमध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांना, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या घरात किंवा सुरक्षित इमारतींमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे.तसेच, अमेरिका पश्चिम आशियातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून वेळोवेळी सुरक्षेशी संबंधित माहिती देत राहील, असेही सांगितले. जे अमेरिकन नागरिक प. आशिया सोडू इच्छितात, त्यांना सरकार प्रवासाच्या पर्यायांची माहिती आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देईल.

अमेरिकन हल्ल्यात इराणी सैनिकाचा मृत्यू

‘अल जझीरा’ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यांत इराणचा आणखी एक सैनिक ठार झाला आहे.इराणच्या वृत्तवाहिन्यांनी अधिकाऱ्याचा हवाला देत सांगितले की, इराणी नौदलाचे लेफ्टनंट हमीदरेझा देहघानी यांचा जास्क बंदरावरील अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झाला.

अहवालानुसार, गेल्या चार दिवसांत अमेरिकन हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही सामान्य नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

इराण नागरिकांना लक्ष्य करतोय-बहरीन

बहरीनच्या सैन्याने आरोप केला की, इराण सतत क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले करत असून, ज्यात नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सैन्याने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले. देशाचे लष्कर सतर्क असून देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहेत.

अमेरिकेचे इराणला चोख प्रत्युत्तर

दुबई : सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर इराणने हल्ला केला असून, यामुळे जहाजाच्या इंजिन रूमचे मोठे नुकसान झाले आहे आणि एक नागरी कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली. दुसरीकडे, इराणच्या फोर्सने सांगितले की, अनेक जहाजांनी ‘मार्ग बदलण्याच्या आणि मंजूर मार्गावरून जाण्याच्या आमच्या इशाऱ्यांकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले.’ त्यापैकी एका जहाजावर इशारा म्हणून गोळीबार करण्यात आला.

२३ खलाशांना वाचवले

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले की, ‘जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावरील २३ खलाशांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. मात्र, एका खलाशाचा शोध अजूनही सुरू आहे.

होर्मुझ पुन्हा बंद : इराण

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) होर्मुझची सामुद्रधुनी ‘पुढील सूचनेपर्यंत’ बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने पश्चिम आशियातील आपला ‘हस्तक्षेप’ थांबवेपर्यंत हा धोरणात्मक जलमार्ग बंद राहील, असे यात नमूद करण्यात आले आहे, असे वृत्त प्रेस टीव्हीने दिले आहे. आयआरजीसीच्या माहितीनुसार, ‘परकीय शक्तींच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थितीचा विचार करून’ हा निर्णय घेण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ

आजचे राशिभविष्य,१३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पावसाळ्यात आवर्जून खा करटोलीची भाजी; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Monsoon Makeup Tips : पावसातही मेकअप राहील परफेक्ट; लक्षात ठेवा 'या' ७ गोष्टी

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार