तेल अवीव/वॉशिंग्टन : इराणमध्ये नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना इस्रायलने त्यावर हवाई हल्ला केला. वृत्तानुसार, वरिष्ठ धार्मिक नेते जिथे जमले होते, त्या तज्ज्ञांच्या बैठकीच्या इमारतीला यावेळी लक्ष्य करण्यात आले. देशाच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची जबाबदारी ८८ सदस्य असलेली तज्ज्ञांची सभा घेते. हल्ल्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी आत किती लोक होते, काय हानी झाली, याची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या मंगळवारी चौथ्या दिवशीही इराणवर अमेरिका व इस्रायलचे हल्ले सुरूच होते. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतच्या उपनगरात हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायली आर्मी रेडिओनुसार, या हल्ल्यांमध्ये त्या भागात बैठक घेत असलेल्या हिजबुल्लाहच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. लेबनॉनच्या सरकारी राष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, हे हल्ले कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले.
सौदीत दहरानमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्याचा धोका
पूर्व सौदी शहर दहरानमध्ये लवकरच क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याच्या भीतीने अमेरिकन दूतावासाने कडक सतर्कता जारी केली आहे. दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट केले की दहरानला क्षेपणास्त्र आणि यूएव्ही हल्ल्यांचा धोका आहे आणि नागरिकांना तत्काळ आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाने लोकांना अमेरिकन वाणिज्य दूतावासात जाऊ नये आणि पुढील सूचना मिळेपर्यंत तेथून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
इराणमध्ये १५८ विद्यार्थिनींवर अंत्यसंस्कार
इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १५८ शाळकरी मुलींवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहरीनने ७३ इराणी क्षेपणास्त्रे, ९१ ड्रोन केले नष्ट
बहरीनच्या हवाई संरक्षण दलांनी इराणने डागलेली ७३ क्षेपणास्त्रे आणि ९१ ड्रोन यशस्वीरित्या रोखून नष्ट केली. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वेळेवर ट्रॅक केल्यामुळे आणि रोखल्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
इराणविरुद्धच्या युद्धामुळे कला धोका - संरक्षण मंत्री
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी झिओनिझम हे मुस्लिम जगात अस्थिरतेचे मुख्य कारण असल्याचे वर्णन केले आणि ते मानवतेसाठी धोका असल्याचे म्हटले. त्यांनी इशारा दिला की, इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करते. पॅलेस्टिनी भूमीवर इस्रायलच्या स्थापनेपासून इस्लामिक जगाला भेडसावणाऱ्या सर्व प्रमुख समस्या आणि लादलेल्या युद्धांमध्ये झिओनिस्ट विचारसरणी आणि इस्रायल थेट सहभागी आहेत. इराण तडजोडीसाठी तयार होता, तरीही त्यांच्यावर युद्ध लादण्यात आले.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी फॉक्स न्यूजला मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिका अशा संघर्षात मुळीच पडणार नाही जे वर्षानुवर्षे सुरू राहिल. आम्हाला हा संघर्ष वर्षानुवर्षे मुळीच चालवायचा नाही.
भारताला तेल पुरवायला रशिया तयार
पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रशियाने भारताला तेल पुरवण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
इराण-इस्रायल युद्धात बिहारचे कॅप्टन आशिष बेपत्ता
इस्रायल-इराण युद्धात बिहार राज्यातील बेतियाचे कॅप्टन आशिष कुमार बेपत्ता आहेत. एजन्सीने कॅप्टनच्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली आहे. ओमानच्या आखातात 'स्कायलाइट' या तेलवाहू जहाजावर १ मार्च रोजी क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी जहाज खासब किनाऱ्याजवळ नांगर टाकून उभे होते. बहुतेक क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, परंतु कॅप्टन आशिष यांच्यासह इतर २ लोक अजूनही बेपत्ता आहेत. कुटुंबीयांनी ओमानमधील भारतीय दूतावास आणि शिपिंग कंपनीशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
इराण वाटाघाटींना इच्छुक, पण आता उशीर झालाय - ट्रम्प
इराणला आता वाटाघाटी करायच्या आहेत, पण आता खूप उशीर झाला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणची संरक्षण व्यवस्था आणि नेतृत्व जवळजवळ नष्ट झाले आहे, असा दावाही ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. ‘त्यांना बोलायचे आहे आणि मी बोलण्यास सहमत आहे. त्यांनी ते लवकर करायला हवे होते’, असे ट्रम्प यांनी सांगितले. इराणने सौदीतील अमेरिकन दुतावासावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरू झालेले युद्ध एक महिन्याहून अधिक काळ चालू शकते. आमचा सर्वात मोठा हल्ला अद्याप बाकी आहे. अमेरिका दीर्घकाळ युद्धासाठी तयार आहे. आम्ही युद्ध सुरू केले, तेव्हा चार आठवड्यांचा कालावधी निश्चित केला होता. आता, मात्र युद्ध दीर्घकाळ सुरू राहू शकते अशी स्थिती आहे. मात्र, इराणला चोख उत्तर दिले जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
लेबनॉनमधील ३०,००० लोक छावण्यांमध्ये
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीनुसार, इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून किमान ३०,००० लोक आपले घर सोडून लेबनॉनमधील मदत छावण्यांमध्ये पोहोचले आहेत. एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अनेक लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला रात्र काढावी लागली, तर काही लोक वाहतूककोंडीत अडकले. इस्रायलने सीमेला लागून असलेल्या लेबनॉनमधील ५९ भाग रिकामे केले आहेत.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या कारवायांवर बंदी
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या लष्करी कारवायांवर सरकारने तत्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष मिशेल आऊन यांनी सांगितले की, युद्ध आणि शांततेचा निर्णय आता पूर्णपणे लेबनॉन राज्याचा असेल. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, आऊन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिजबुल्लाहने आपली शस्त्रे सरकारला सोपवावीत आणि या निर्णयापासून मागे हटण्याचा कोणताही पर्याय नाही.
पुतिन करणार इराणशी चर्चा
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे इराणशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेतील देशांवरील हल्ले थांबवणे आणि वाढता तणाव कमी करणे हे त्यामागे उद्दिष्ट आहे. पुतिन यांनी आधीच सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी फोनवरून संभाषण केले आहे. दोन्ही नेत्यांनी संघर्षाच्या गंभीर परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.