दुबई : अमेरिका आणि इराणमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धबंदी कराराला सुरुंग लावत सोमवारी इस्रायल आणि इराणने एकमेकांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले. या ताज्या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील युद्ध पुन्हा एकदा पेटण्याची आणि संपूर्ण जग महायुद्धाच्या खाईत लोटले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, तणाव आणखी वाढू नये म्हणून इराणने आपल्या बाजूने लष्करी कारवाया तात्पुरत्या स्थगित केल्याचे जाहीर केले आहे.
ट्रम्प यांची मध्यस्थी
या नव्या संघर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून, "इस्रायल आणि इराणने तात्काळ गोळीबार थांबवावा," असे आवाहन केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणला आश्वासन दिले आहे की जर त्यांनी हल्ले थांबवले, तर इस्रायलकडून पुढील कारवाई होणार नाही. यावर इराणच्या लष्कराने सांगितले की, जर इस्रायल किंवा त्यांच्या समर्थकांनी (दक्षिण लेबनॉनसह) पुन्हा कोणतेही धाडस केले, तर यापेक्षा "अतिशय गंभीर आणि चक्काचूर करणारा" पलटवार केला जाईल. दुसरीकडे, इजिप्त, सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान आणि कतार या देशांनी अमेरिकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली असून, इस्रायलला हल्ले रोखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नक्की काय घडले?
इराणने इस्रायलच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने इस्रायलच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजले आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. प्रत्युत्तरात इस्रायलने मध्य आणि पश्चिम इराणवर थेट हवाई हल्ले केले. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलने इराणच्या 'माहशाहर' शहरातील पेट्रोकेमिकल कारखान्याला लक्ष्य केले, जेथे क्षेपणास्त्रांचे साहित्य तयार केले जाते. इराणने या सर्व प्रकारासाठी अमेरिकेला जबाबदार धरले असून, अमेरिकेच्या संमतीशिवाय इस्रायल असे पाऊल उचलूच शकत नाही, असा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.