तेलअवीव : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी इस्त्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला चढवला. त्यानंतर तेहराननेही तातडीने प्रत्युत्तर देत पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वसूचनाही दिली होती. इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या भीषण स्फोटांमुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलने दिलेल्या इशाऱ्यानंतर ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. इराणने आपले धोरण न बदलल्यास कारवाई अटळ असल्याचे संकेत गेल्या अनेक आठवड्यांपासून वॉशिंग्टन आणि जेरूसलेममधून दिले जात होते.
इराणमध्ये आणीबाणी जाहीर
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असतानाच शनिवारी इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. असोसिएटेड प्रेस (एपी) च्या वृत्तानुसार, तेहरानमध्ये मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेनंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.
७ देशांमधील अमेरिकन तळांवर हवाई हल्ले
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ले केले आहेत. इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर इराणनेही इस्त्रायलवर प्रतिहल्ले केले आहेत. आता इराणने सौदी, कतार, कुवेत, यूएईसह ७ देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलं की युएईवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा जोरदार हल्ला झाला. ज्याचा सामना युएईच्या हवाई संरक्षण दलाने उच्च कार्यक्षमतेने केला आणि अनेक क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या रोखण्यात आली.
इस्रायलमध्ये शाळा-महाविद्यालयं बंद
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला केल्याचं इस्राइलकडून सांगण्यात आलंय. दुसरीकडे इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यात ४० शाळकरी मुलींचा मृत्यू दावा
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे. या दोन्ही देशातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असतानाच शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले. तेहरानमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली आहे. आता इराण देखील जोरदार प्रत्युत्तर देत असल्याने पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे.
इस्रायल, बहरीन, युएई, कतारवर इराणची क्षेपणास्त्रे
इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्याचा बदला म्हणून एकाच वेळी इस्रायल, बहरीन, युएई आणि कतारवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. वृत्तानुसार, युएईची राजधानी अबू धाबी येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर कतारच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने एक क्षेपणास्त्र हवेतच रोखले. अबू धाबी आणि कतारची राजधानी दोहा येथील अमेरिकन हवाई तळांवर प्रत्यक्ष हल्ला झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्या ठिकाणी सायरन वाजल्याची माहिती आहे.
संबंधित पक्षांनी संयम बाळगावा : भारत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालय यांनी इस्रायल-इराण संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींमुळे भारत अत्यंत चिंतित आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा, तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...अन्यथा मृत्यूला सामोरे जा: ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ल्याची अधिकृत पुष्टी करत स्पष्ट केले की, इराणला त्यांच्या अणुसुविधांची पुनर्बाधणी करण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. आपल्या सोशल मीडियाच्या खात्यावरून व्हिडीओ शेअर करताना ट्रम्प म्हणाले, "इराण कधीही अण्वस्त्र बाळगू शकत नाही आणि गरज पडल्यास अमेरिका त्यांच्या अणुसुविधांचा पूर्णपणे नाश करेल."
नेतन्याहूंचा इराणला इशारा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणे मानवतेसाठी धोकादायक ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इराणकडून दीर्घकाळ आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी जागतिक समूदायाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.
एअर इंडिया, इंडिगोची विमाने वळवली
पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आता विमान प्रवासासाठी डोकेदुखी ठरत आहे. इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र तातडीने बंद केल्यामुळे एअर इंडिया आणि इंडिगोच्या अनेक विमानांना मोठा फटका बसला आहे. इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. दरम्यान, यामुळे अनेक देशांतील हवाई क्षेत्रांवर परिणाम झाला असून एअर इंडियाचे विमान दिल्ली - तेल अवीव मार्गावरून मुंबईकडे वळवण्यात आले आहे.
इराणनेही इस्रायल-दुबईवर डागली ४०० क्षेपणास्त्रे
इस्रायलने शनिवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठा हल्ला केला. सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दावा केला आहे की, इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स कमांडर मोहम्मद पाकपूर यांचा मृत्यू झाला. यापूर्वी, इराणी वृत्तसंस्थांनी सांगितले की, दक्षिण इराणमधील एका शाळेत क्षेपणास्त्र पडल्याने ४० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि ४५ जण जखमी झाले. इस्रायलने अमेरिकेच्या सहकार्याने इस्रायलने १० इराणी शहरांवर हवाई हल्ले केले. हल्ल्यानंतर, ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी केला ज्यामध्ये म्हटले आहे की इराणवरील हल्ला अमेरिकन नागरिकांच्या संरक्षणासाठी होता. प्रत्युत्तरादाखल, इराणने इस्रायलवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आणि कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया आणि यूएईमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले. शिवाय, इराणने यूएईच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबईवरही हल्ला केला.