फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल (Photo - X)
आंतरराष्ट्रीय

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

मोठ्या भूकंपानंतर काही मिनिटांतच सकाळी ५:१८ वाजता ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का नोंदवण्यात आला.

किशोरी घायवट-उबाळे

फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर सोमवारी (दि.८) सकाळी शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. ७.८ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपामुळे जनरल सॅटोस शहरातील अनेक इमारती कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. भूकंपानंतर फिलिपिन्स आणि इंडोनेशियासाठी त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या भूकंपामुळे निर्माण झालेल्या भीती आणि गोंधळाचे थरकाप उडवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

७.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५:०७ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र ९३ किलोमीटर खोलीवर फिलिपिन्समध्ये ५.६३५° उत्तर अक्षांश आणि १२५.१४७° पूर्व रेखांश येथे नोंदवण्यात आले.

९३ किलोमीटर खोलीवर झाल्यामुळे हा मध्यम-केंद्रित भूकंप मानला जात आहे. अशा प्रकारचे भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ७० ते ३०० किलोमीटर खोलीदरम्यान होतात.

काही मिनिटांतच पुन्हा भूकंपाचे धक्के

मोठ्या भूकंपानंतर काही मिनिटांतच सकाळी ५:१८ वाजता ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का नोंदवण्यात आला. त्यामुळे दक्षिण मिंदानाओ परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भूकंपाचे धक्के बसताच विद्यार्थी आणि शिक्षक घाबरून वर्गाबाहेर पळताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये जमिनीला कंप सुटताच अनेक मुले घाबरून रडताना आणि ओरडताना दिसत आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांना सुरक्षित मोकळ्या जागेकडे हलवत असल्याचेही पाहायला मिळते. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्हायरल झालेला हा व्हिडीओ दावाओ ऑक्सिडेंटलमधील मालिता येथील महायाहाय एलिमेंटरी स्कूलमधील असल्याचे सांगितले जात आहे.

३७ इमारतींचे नुकसान

माहितीनुसार, या भूकंपात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच ३७ संरचनांचे नुकसान झाले असून त्यामध्ये बहुतांश व्यावसायिक इमारतींचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

भूकंपानंतर अनेकजण घर, शाळा आणि कार्यालयांमधून बाहेर पडताना दिसले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि मदतकार्य सुरू करण्यासाठी आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

त्सुनामीचा इशारा कायम

शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा धोकाही निर्माण झाला आहे. फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांनी समुद्राच्या पातळीतील बदलांवर सतत लक्ष ठेवले असून त्सुनामीचा इशारा अद्याप कायम ठेवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या धक्क्यानंतरही काही तासांपर्यंत काही सेंटीमीटर उंचीच्या त्सुनामी लाटा नोंदवल्या जात होत्या.

१३८ मध्यम तीव्रतेच्या भूकंप धक्क्यांची नोंद

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजीने सकाळपर्यंत किमान १३८ मध्यम तीव्रतेच्या भूकंप धक्क्यांची नोंद केली आहे. या भूकंप धक्क्यांची तीव्रता १.३ ते ६.७ दरम्यान होती.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, नुकसानग्रस्त इमारतींपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन पथके संपूर्ण प्रदेशातील भूकंपीय हालचालींवर आणि त्सुनामीच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला