भारत-पाक संघर्षात ११ विमाने पडली: ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

भारत-पाक संघर्षात ११ विमाने पडली: ट्रम्प

गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात दोन्ही बाजूंची मिळून ११ लढाऊ विमाने पाडली गेली, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात दोन्ही बाजूंची मिळून ११ लढाऊ विमाने पाडली गेली, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच हा संघर्ष मिटवण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मात्र, भारताने या संघर्षात कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी किंवा हस्तक्षेप असल्याचा दावा नेहमीप्रमाणे फेटाळून लावला आहे.

बुधवारी 'एअर फोर्स वन' या अध्यक्षांच्या विमानात ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, भारत-पाकिस्तानमधील युद्धासह एकूण आठ युद्धे थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना "इतर कोणापेक्षाही जास्त" नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता.

अण्वस्त्र युद्ध

अधिक सविस्तर माहिती न देता ट्रम्प यांनी दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमधील हा वाद "अण्वस्त्र युद्धाच्या" उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता. या संघर्षात "११ विमाने पाडली गेली" असे त्यांनी सांगितले, परंतु ही विमाने नेमकी कोणत्या देशाची होती की दोन्ही देशांची मिळून होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

दरम्यान, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानची एफ-१६ विमानांसह किमान डझनभर लष्करी विमाने नष्ट किंवा उद्ध्वस्त झाल्याचे भारताने यापूर्वी म्हटले आहे.

प्राण वाचवले

ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संघर्ष रोखल्याबद्दल आणि ३ ते ५ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. ट्रम्प हे आपल्या मध्यस्थीमुळेच हा संघर्ष संपल्याचा दावा करत आहेत. मात्र, भारत सरकारने नेहमीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अमेरिकन मध्यस्थीशिवाय दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या थेट चर्चेनंतरच या लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या होत्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चेंबूर दुर्घटना काँक्रीटीकरणामुळेच; चौकशी समितीच्या अहवालात ठपका, आज पालिकेत निवेदन 

Mumbai : ‘के. रुस्तम’ आइस्क्रीम पार्लरचा परवाना एफडीआयकडून निलंबित

Mumbai : दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार; उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त, नागरिकांनाही त्रास

तुम्ही ‘गद्दारां’ना प्रतिष्ठा देताय; संजय राऊत यांची शरद पवारांवर थेट टीका

राम मंदिर देणगी घोटाळा : अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात