वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या जुन्या टॅरिफ धोरणांना ‘बेकायदेशीर’ घोषित करून मोठा धक्का दिला होता. त्यानंतर लगेचच युरोपियन महासंघानेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जुन्या कराराची आठवण करून दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे आधीच संतप्त झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आता आणखी टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिला असून ट्रम्प म्हणाले की ‘जे देश अमेरिकेशी खेळण्याचा प्रयत्न करतील त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’.
अख्ख्या जगाला उघड धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ ध्यास कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. अलीकडेच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ बेकायदेशीर घोषित केल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी पळवाट शोधली आणि १५% जागतिक टॅरिफ लादला. त्यानंतर, युरोपियन महासंघाने अमेरिकेसोबत एक मोठ्या व्यापार कराराला ब्रेक लावला. त्यानंतर आता अस्वस्थ झालेल्या ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांना उघडपणे इशारा दिला आहे की, राजकीय फायद्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पूर्वीपेक्षाही जास्त दंड आणि टॅरिफला सामोरे जावे लागेल.
व्यापार धोरणात निर्माण झाली अनिश्चितता
ट्रुथ सोशलवर फक्त ‘BUYER BEWARE!!!’ असे लिहून ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही आपल्या अट्टाहासाच्या आड येऊ देणार नाहीत. अलिकडेच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लादलेले अनेक टॅरिफ रद्द केले त्यामुळे अमेरिकेसोबत व्यापार धोरणात अनिश्चितता निर्माण झाली. यादरम्यान, ट्रम्प यांनी आयातीवरील जागतिक शुल्क १५% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून वर्षानुवर्षे अमेरिकेला लुटणाऱ्या देशांना आता अलीकडील करारांपेक्षाही कठोर आर्थिक दंडांना सामोरे जावे लागेल असे ट्रम्प म्हणाले. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नावाखाली खेळ खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’.
ट्रम्प यांना युरोपियन महासंघाची वॉर्निंग
युरोपियन महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेला गेल्या वर्षीच्या व्यापार कराराच्या अटींचे पालन करायला सांगितले आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर वॉशिंग्टन कोणती पावले उचलणार आहे याबद्दल ‘पूर्ण स्पष्टता’ द्यावी अशी मागणी महासंघाने केली. एकूण २७ देशांच्या व्यापार हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपियन कमिशनने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नवीन १५% टॅरिफ आकारणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. युरोपियन संसदेने अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील टॅरिफ रद्द करणारा महत्त्वाचा करार गोठवण्याचा निर्णय घेतला. युरोपियन नेत्यांनी सांगितले की, अमेरिकेतील टॅरिफविषयक परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणत्याही करारावर मतदान करणार नाहीत. त्यांनी ट्रम्पच्या व्यापार धोरणाचे वर्णन अराजकतेसारखे केले. ट्रम्प यांचा हट्टीपणा आणि युरोपच्या सूडाच्या कृतींमुळे जागतिक बाजारात अस्थिरता पसरली असून हा संघर्ष असाच वाढत राहिला तर भविष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कारपर्यंत सर्व गोष्टींच्या किमती गगनाला भिडू शकतात.