वॉशिंग्टन : भारत हा रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून ते खुल्या बाजारात विकून मोठा नफा कमवत आहे. त्यामुळे भारतावर आणखी ‘टॅरिफ’ लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहे, याची भारताला पर्वा नाही. त्यामुळे भारतावर लावण्यात येणाऱ्या ‘टॅरिफ’मध्ये मी मोठी वाढ करणार आहे.
सोमवारी सकाळी व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी ‘फॉक्स न्यूज’ला मुलाखत दिली. मिलर म्हणाले की, भारत मुळात रशियन तेल खरेदी करण्यात चीनशी जोडलेला आहे. हे जाणून लोकांना धक्का बसेल. त्यांनी ही परिस्थिती आश्चर्यकारक असल्याचे म्हटले. त्यांनी भारतावर अमेरिकन वस्तूंवर "मोठ्या प्रमाणात शुल्क" लादण्याचा आणि इमिग्रेशन धोरणांवर फसवणूक करण्याचा आरोपही केला.
ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांना महत्त्व देतात, परंतु अमेरिकेला या युक्रेन युद्धाच्या अर्थपुरवठ्याबाबत वास्तववादी दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे, असे मिलर म्हणाले.
भारताने अमेरिकेच्या दबावाखाली व दरवाढ झाल्याने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र, ‘एएनआय’ने सांगितले की, भारतीय कंपन्या अजूनही रशियाकडून तेल विकत घेत आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे स्टीफन मिलर हे सल्लागार आहेत. मिलर म्हणाले की, भारत हा अमेरिकेसोबत ईमानदारीत वागत नाही. भारत हा स्वत: अमेरिकेला जवळचा देश मानतो. तरीही तो आमच्या मालाला मंजुरी देत नाही, तर अमेरिकन सामानांवर मोठी ‘टॅरिफ’ लावतो. तसेच भारत हा अमेरिकेच्या ‘स्थलांतरण’ धोरणाचा फायदा उचलतो. आता रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला तो अप्रत्यक्षरित्या निधी पुरवत आहे, असा आरोप त्यांनी केला.