रशिया : रशियाच्या तातार्स्तान प्रांतातील निझ्नेकाम्स्क (Nizhnekamsk) शहरात सोमवारी (दि. १०) युक्रेनने नागरी आणि औद्योगिक ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू, तर ३९ जण जखमी झाले आहेत. निझ्नेकाम्स्कचे महापौर रादमीर बेल्यायेव यांनी ही माहिती दिली.
नागरी आणि औद्योगिक ठिकाणांवर ड्रोन हल्ला
निझ्नेकाम्स्क हे तातार्स्तानमधील प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहरातील नागरी भागांसह औद्योगिक ठिकाणांवर ड्रोनने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू आणि ३९ जण जखमी झाल्याचे महापौर बेल्यायेव यांनी सांगितले.
TANECO तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही लक्ष्य
या हल्ल्यात तातार्स्तानमधील TANECO तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आल्याचे रशियन माध्यमांनी म्हटले आहे. हा रशियातील तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक मानला जातो. यापूर्वी जूनच्या सुरुवातीलाही या प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला करण्यात आला होता.
१.७ कोटी टन कच्च्या तेलावर प्रक्रिया
TANECO रिफायनरीने २०२४ मध्ये सुमारे १.७ कोटी टन कच्च्या तेलावर प्रक्रिया केली होती. त्यातून सुमारे २७ लाख टन पेट्रोल आणि ८५ लाख टन डिझेलचे उत्पादन झाले. त्यामुळे रशियाच्या इंधन व्यवस्थेत या प्रकल्पाला महत्त्वाचे स्थान आहे.
तातारस्तानमध्ये शोककाळ जाहीर
हल्ल्यानंतर तातार्स्तानचे प्रमुख रुस्तम मिन्निखानोव यांनी शोककाळ जाहीर केला आहे. दरम्यान, हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा तसेच जखमींच्या परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे.
रशियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांत वाढ
गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियाच्या काही भागांत इंधनाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, सुरुवातीला निर्माण झालेली बहुतांश टंचाई आता दूर झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.