वॉशिंग्टन : अमेरिकेत हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील (एटीसी) संप्रेषण आणि रडार यंत्रणेत अचानक बिघाड झाल्यामुळे मोठी विमान बंदी लागू करण्यात आली. गेल्या २५ वर्षांतील अशा प्रकारची ही राष्ट्रव्यापी विमान बंदी आहे. परिणामी, दोन हजारांहून अधिक विमाने रद्द करण्यात आली. या अनपेक्षित संकटामुळे लाखो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेशी जोडण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे जुन्या आणि कालबाह्य उपकरणांवर अधिक ताण आला. यामुळे संप्रेषण आणि रडार यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, चार तासांहून अधिक काळ विमानांचे उड्डाण पूर्णपणे थांबवण्यात आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास देशांतर्गत काही मोजकी विमाने रवाना झाली. मात्र, या बिघाडाचा परिणाम पुढील काही दिवस जाणवण्याची शक्यता आहे.
अमेरिकी काँग्रेसवर टीका
वाहतूक सचिव शॉन डफी यांनी नवीन तंत्रज्ञानासाठी अधिक निधी मंजूर न केल्याबद्दल अमेरिकी काँग्रेसला धारेवर धरले. तसेच, ही समस्या एफएएच्या नवीन एआय-संचालित प्रणालीमुळे झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या मंजुरीनंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या आधुनिकीकरणाच्या कामांतर्गत हजारो जुन्या तांब्याच्या तारा बदलून फायबर ऑप्टिक लाइन्स बसवण्यात आल्या असून, हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी ३० अब्ज डॉलरच्या निधीची मागणी केली जात आहे.
पर्यायी मार्गाचा अवलंब
या विमानबंदीमुळे प्रवाशांना प्रचंड मनः स्तापाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी प्रवासी तासन्तास विमानामध्ये किंवा विमानतळावर अडकून पडले होते.