वॉशिंग्टन : सरसंघचालक मोहन भागवत २९ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी आणि त्यांच्या नेत्यांना कोणत्याही प्रकारची राजनैतिक सन्मानाची वागणूक देऊ नये अशी आक्रमक मागणी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्यावरील सल्लागार संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
भागवत हे २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर यूएस सीआयआरएफकडून ही मागणी समोर आली आहे.
यूएससीआयआरएफचे अध्यक्ष असिफ महमूद यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे सदस्य आहेत. ही एक मुख्य संघटना असून त्यांच्याशी संबंधित इतर संघटना अल्पसंख्यांकांवर (मुस्लिम व ख्रिश्चन) होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सामील आहेत. की, आरएसएसचे नेते सरकारशी जोडलेले असले तरीही त्यांना उच्चस्तरीय बैठकांमध्ये स्थान देऊ नये किंवा विशेष राजनैतिक दर्जा दिला जाऊ नये, अशी मागणी आयुक्त जॉन मिल्स यांनी केली.
मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या वार्षिक अहवालात युएससीआयआरएफने भारतातील स्थिती चिंताजनक असल्याचे घोषित करण्याची आणि संघावर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती.
भारताचे प्रत्युत्तर
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी युएससीआयआरएफच्या अहवालावर तीव्र टीका केली. भारतावर टीका करण्याऐवजी यूएससीआयआरएफने अमेरिकेत हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले आणि तेथील भारतीय समुदायाला मिळणाऱ्या धमक्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असा टोला भारताने लगावला आहे.