न्यूयॉर्क : अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या ११ भारतीय नागरिकांवर व्हिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींनी दुकानांमध्ये बनावट सशस्त्र दरोडे घालण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संशयितांनी बनावट दरोड्यांची योजना आखली होती.
यामागचा उद्देश असा होता की, दुकानातील कर्मचारी इमिग्रेशन अर्जामध्ये खोटा दावा करू शकतील की, ते एखाद्या गुन्ह्याचे बळी ठरले होते, ज्यामुळे त्यांना ग्रीन कार्ड मिळवणे सोपे होईल, असा यामगील उद्देश होता. या प्रकरणातील आरोपींची नावे जितेंद्रकुमार पटेल (३९), महेशकुमार पटेल (३६), संजयकुमार पटेल (४५), दीपिकाबेन पटेल (४०), रमेशभाई पटेल (५२), अमिताभहेन पटेल (४३), रौनककुमार पटेल (२८), संगीताबेन पटेल (३६), मिंकेश पटेल (४२), सोनल पटेल (४२) आणि मितुल पटेल (४०) अशी असून यांच्याविरुद्ध व्हिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर वास्तव्य
हे सर्व आरोपी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स, केंटकी आणि ओहायो या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे राहात होते. मॅसॅच्युसेट्समधील वेमाउथ येथे बेकायदेशीररित्या राहात असलेल्या दीपिकाबेन यांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. तर जितेंद्रकुमार, महेशकुमार, संजयकुमार, अमिताबेन, संगीताबेन आणि मितुल यांना मॅसॅच्युसेट्समध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना बोस्टन येथील संघीय न्यायालयात शुक्रवारी पहिल्यांदा हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. रमेशभाई, रोनककुमार, सोनल आणि मिंकेश यांना अटक करण्यात आली असून त्यांची पहिली सुनावणी केंटकी, मिसौरी आणि ओहायो येथे झाली. पुढील तारखेला त्यांना बोस्टन येथील फेडरल न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बनावट दरोडा
आरोपपत्रानुसार मार्च २०२३ मध्ये रामभाई आणि त्याच्या साथीदारांनी मॅसॅच्युसेट्ससह इतर काही ठिकाणी किमान ६ दुकाने, दारूची दुकाने आणि फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये शस्त्रांच्या धाकावर दरोडे घातले. मात्र, हे दरोडे खरे नसून यू नॉन-इमिग्रेशन स्टेटस (यू व्हिसा) मिळवण्यासाठी आखलेले बनावट प्रकार असल्याचा आरोप आहे. यू व्हिसा हा काही विशिष्ट गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या आणि तपास किंवा खटल्यात कायदा अंमलबजावणी संस्थांना मदत करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या व्हिसामुळे स्थलांतरितांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. तसेच ५ ते १० वर्षांत ग्रीन कार्ड मिळवण्याचा मार्गही खुला होतो.
असा रचायचे दरोड्याचा बनाव
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कथित बनावट दरोड्यांमध्ये 'दरोडेखोर' दुकानातील कर्मचारी किंवा मालकांना शस्त्रासारखी दिसणारी वस्तू दाखवून धमकावत असे. त्यानंतर तो कॅश रजिस्टरमधील पैसे घेऊन पळून जात असे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड होत असे. दरोड्यानंतर कर्मचारी किंवा मालक पोलिसांना माहिती देण्यापूर्वी किमान ५ मिनिटं थांबत असत कारण 'दरोडेखोर' सुरक्षितपणे निघून जाईल. या कटात सहभागी होण्यासाठी कथित पीडितांनी दरोडेखोर रामभाईला पैसे दिल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात रामभाईने दुकानमालकांना त्यांच्या दुकानांचा वापर बनावट दरोड्यांसाठी करू दिल्याबद्दल पैसे दिले होते.
तुरुंगवास, दंड
या प्रकरणातील रामभाई आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चालकावर यापूर्वीच आरोप ठेवून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी ज्या ११ जणांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्यावर प्रत्येक दरोड्याची योजना आखण्यात मदत केल्याचा किंवा स्वतःला, कुटुंबातील सदस्यांना पीडित म्हणून दाखवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. व्हिसा फसवणुकीच्या कटाचा आरोप सिद्ध झाल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा २,५०,००० अमेरिकन डॉलरपर्यंत दंडाची तरतूद आहे.