वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार; संशयिताला अटक, चौकशी सुरू 
आंतरराष्ट्रीय

वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार; संशयिताला अटक, चौकशी सुरू

प्राथमिक चौकशीत त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा हेतू असल्याचे सांगितल्याचे सीबीएस न्यूजने म्हटले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

वॉशिंग्टनमधील वॉशिंग्टन हिल्टन येथे शनिवारी (दि.२५) झालेल्या व्हाईट हाऊस कॉरस्पाँडेंट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. कोल टोमस अ‍ॅलन (Cole Tomas Allen) असे या संशयिताचे नाव असून तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा हेतू असल्याचे सांगितल्याचे सीबीएस न्यूजने म्हटले आहे.

ट्रम्प यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष्य?

संशयिताकडे शस्त्रे आढळल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आणि संशयिताला ताब्यात घेण्यात आले. या घटनेत एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला, मात्र मोठी जीवितहानी टळली.

गोळीबार 'स्टेज्ड' म्हणजेच पूर्वनियोजित

घटनेनंतर सोशल मीडियावर हा गोळीबार 'स्टेज्ड' म्हणजेच पूर्वनियोजित असल्याचे म्हटले जात आहे. काही सोशल मीडिया अकाउंट्सनी हा हल्ला मुद्दाम रचल्याचा आरोप केला. True Promise नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये संशयिताचे नाव घटनेच्या एक दिवस आधीच इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात सर्च झाल्याचा दावा करण्यात आला.

'गुगल ट्रेंड्स' स्क्रीनशॉट दिशाभूल करणारा

मात्र, पडताळणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दाखवण्यात आलेला गुगल ट्रेंड्स डेटा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे समोर आले. उपलब्ध माहितीनुसार, संशयिताचे नाव इस्त्रायलमध्ये गोळीबारानंतरच ट्रेंड होऊ लागले. त्यामुळे हल्ल्यापूर्वीच नाव सर्च होत होते हा दावा खोटा ठरला.

तपास सुरू, अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून हल्ल्यामागील नेमका हेतू शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती, स्क्रीनशॉट आणि अपुष्ट दावे शेअर करण्यापूर्वी नागरिकांनी पडताळणी करावी, असे आवाहन तपास यंत्रणांकडून करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार संशयिताला अटक झाली असली, तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कटकारस्थानाच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका